१० लाखांच्या मुद्देमालासह वास्कोत चोरटा गजाआड

0
148

नवेवाडे, वास्को येथे नाताळाच्या पूर्वरात्री झालेल्या घरफोडी प्रकरणी वास्को पोलिसांना हवा असलेला नवेवाडे येथील संशयित आरोपी अस्पाक दादापीर शेख (२९) याला मुद्देमालासह गजाआड करण्यास वास्को पोलिसांना काल यश आले. त्याने चोरीनंतर चिखली येथे एका निर्जन स्थळी मातीत पुरून ठेवलेले सुवर्णालंकार व रोख रक्कम मिळून १० लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.

नाताळाच्या पूर्वसंध्येला रविवार दि. २४ रोजी हनुमान मंदिराशेजारी असलेल्या जॅक फर्नांडिस यांच्या घरात या सराईत चोरट्याने प्रवेश करून जॅक यांच्या घरातील कपाटातून सहा लाखांचे सोने तसेच चार लाखांची रोकड मिळून दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. चोरी झाली त्यावेळी फर्नांडिस आपल्या कुटुंबीयांसह रात्री पावणे बाराच्या सुमारास नाताळाच्या पूर्वसंध्येला प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. रात्री दीडच्या सुमारास घरी परत आल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी त्याच रात्री पंचनामा करून श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली होती. यानंतर पोलीस चोरट्याच्या मागावर होते. या घरफोडीत चार बांगड्या, तीन सोनसाखळ्या, दोन ब्रेसलेट व एक अंगठी मिळून सहा लाख रुपये किंमतीचे सुवर्णालंकार तसेच सुमारे चार लाख रुपयांची रोख रक्कम मिळून दहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता.

दरम्यान, वास्को पोलिसांनी या चोरीच्या तपासाला सुरुवात करून चोरट्याची माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांनी काल संशयित म्हणून नवेवाडे येथील अस्पाक दादापीर शेख (२९) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरी त्याने एकट्यानेच केल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरलेला ऐवज त्याने चिखली येथे एका निर्जनस्थळी मातीत पुरून ठेवलेला होता. तो त्याने दाखवल्यानंतर तेथून हस्तगत करण्यात आला. आरोपीला प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.