कुशल मनुष्यबळासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल

0
17

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; ‘कन्वर्ज 2024′ द्वारे उद्योग व शिक्षण क्षेत्रातील लोकांना आणले एकत्र

राज्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे, यासाठी गोवा सरकार शैक्षणिक अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. फार्मा, पर्यटन, आयटी व सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी राज्यात आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उद्योगांना आवश्यक ते मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या उद्योगांना जे काही अपेक्षित आहे, त्याचा आम्ही अभ्यासक्रमात समावेश करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय साखळी येथे उच्च शिक्षण संचालनालय, गोवा उच्च शिक्षण मंडळ आणि ऋचा आयबीएम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कन्वर्ज 2024′ कार्यक्रमात ते बोलत होते. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी मंचावर राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, साखळी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एफ. एल. जर्वासियो मेंडिस, कन्वर्ज 2024 चे समन्वयक डॉ. नियॉन मार्शेन, प्रमुख पाहुणे आयबीएमचे मणी मधुकर आणि डॉ. गुरुप्रसाद नाईक उपस्थित होते.

आजच्या काळात पदवीबरोबरच उद्योगधंद्यांशी निगडित कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी युवकांमध्ये उद्योगधंद्यांशी निगडित कौशल्ये विकसित करणारी वेगळी यंत्रणा उभारावी लागेल. कन्वर्ज 2024 हा त्याचाच एक भाग आहे. कारण कन्वर्ज 2024 म्हणजे उद्योग आणि शैक्षणिक बाबींचा संगम होय, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कन्वर्ज 2024 अंतर्गत 60 कंपन्या कार्यरत

मोपा विमानतळावर राज्यातील 1900 तरुणांना रोजगार दिला आहे. कन्वर्ज 2024 अंतर्गत 60 कंपन्या कार्यरत असून, प्रत्येक महाविद्यालयात 10-12 कंपन्या जातील. विद्यार्थ्यांना विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगार मिळेल इतकी व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतील, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

साखळी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एफ. एल. जर्वासियो मेंडिस यांनी स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि माहितीपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. डॉ. नियॉन मार्शेन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘कन्वर्ज 2024′ मध्ये मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अलिशा डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुरुप्रसाद नाईक यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विठ्ठल तिळवी, डॉ. जनार्थनम आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक बाबी

आयबीएमशी करार करून तरुणांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे.
पर्यटन इंडस्ट्री बरोबरच गोव्यात शिपयार्ड इंडस्ट्री विकसित होत आहे. त्यासंदर्भातील व्यावसायिक कोर्सची माहिती गोव्यातील तरुणांनी करून घेतली पाहिजे.
केवळ पदवी शिक्षण घेण्यापुरते मर्यादित राहू नका. जीपीएससी,
युपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यास करा.

ही तर चिंतेची बाब : मुख्यमंत्री

केंद्रीय लोकसेवा आयोग व गोवा लोकसेवा आयोग या स्पर्धात्मक परीक्षांविषयी राज्यातील बऱ्याच युवक-युवतींना काहीही माहिती नाही ही चिंतेची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आणि अशा प्रकारच्या परीक्षांसाठीचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी आवाहन केले.