सूचना सेठच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ

0
11

>> बाल न्यायालयाचा आदेश; सूचनाकडून तपासकामात सहकार्य नाही

स्वतःच्या 4 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या सूचना सेठ हिच्या पोलीस कोठडीत बाल न्यायालयाने काल आणखी पाच दिवसांनी वाढ केली. संशयित सूचना सेठ तपास कामाला सहकार्य करीत नसल्याचा दावा कळंगुट पोलिसांनी न्यायालयात केला.

कळंगुट पोलिसांनी सूचना सेठ हिला स्वत:च्या मुलाच्या खून प्रकरणी 8 जानेवारीला अटक केली होता. त्यानंतर तिला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला होता. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे कळंगुट पोलिसांनी सूचना सेठ हिला पाटो-पणजी येथील श्रमशक्ती भवनातील बाल न्यायालयासमोर सोमवारी हजर केले. तपास अधिकाऱ्यांनी सूचना सेठ पोलीस चौकशीला सहकार्य करत नाही. तसेच या प्रकरणी आणखी पुरावे गोळा करायचे आहेत. त्यामुळे सूचना हिच्या पोलीस कोठडीत आणखी आठ दिवसांनी वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने सूचना हिच्या मानसिक आरोग्य अहवालाबाबत विचारणा पोलिसांकडे केली. तिचा मानसिक आरोग्य अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली.

पती-पत्नी यांच्या वादातून झालेल्या चार वर्षांच्या मुलाच्या खूनाचे प्रकरण देश पातळीवर गाजत आहे; मात्र सूचना सेठ हिने मुलाच्या खुनाबाबत अजूनपर्यंत कबुली दिलेली नाही. तिचा पती व्यंकटरमण याची जबानी पोलिसांनी नोंदवून घेतली आहे, तरीही या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळालेली नाही. त्यामुळे कळंगुट पोलिसांनी सूचना सेठ हिच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.