कुलूप-किल्ली

0
20

क्षणचित्रं… कणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

आजच्या सुरक्षित जीवनामुळे आणि आपल्या मालमत्तेच्या अतिरेकी मोहामुळे कुलूप-किल्ली हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलाय. खरं तर आणखी एक कुलूप महत्त्वाचं आहे. तोंडाला किंवा जिभेला लावण्याचं. खाणं आणि बोलणं या दोघांवर मर्यादा असण्यासाठी संयमाचं, निग्रहाचं ‘लॉक’ लावायला नको का?

महाभारतातील श्रीकृष्णाच्या जीवनाला किती पदर नि किती पापुद्रे! म्हणूनच त्याच्या चरित्रात आख्यायिका वाटणाऱ्या अनेक उद्बोधक प्रसंगांचं दर्शन होतं. हेच पाहा ना, एक दिवस बाजारातून फेरफटका मारत असताना श्रीकृष्ण एका लोहाराच्या दुकानासमोर थांबला. एरव्ही ढाल-तलवार, बाण-भाला बनवणाऱ्या त्या लोहाराला एक छोटीशी विचित्र वस्तू घडवताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. “लोहारदादा, काय बनवताय हे? त्याचा उपयोग काय?” यावर तो लोहार नम्रपणे म्हणाला, “मी कुलूप बनवतोय. घराचं संरक्षण करायला याचा उपयोग होईल. विशेष म्हणजे याला उघडण्यासाठी नि बंद करण्यासाठी मी आणखी एक याच्यापेक्षा लहान वस्तू बनवणार आहे- किल्ली!” श्रीकृष्ण मनातल्या मनात हसत स्वतःशीच उद्गारला, “म्हणजे कलियुगाची चाहूल ऐकू यायला लागली तर! घरांचं चोरांपासून संरक्षण?”

  • एकप्रकारे हा कुलूप-किल्लीचा जन्मच म्हणायला हरकत नाही. असो.
  • असं म्हणतात की अशी काही गावं आहेत (उदा. शनिशिंगणापूर) जिथं अजूनही घरांना कड्याकुलपं लावत नाहीत. चोरी सोडाच; दुसऱ्याची वस्तू चोरण्याची भावनाच कुणाला होत नाही. कोकणात- आपल्या गोव्यातही- बोडगेश्वर, आजोबा, सीमेपुरुष अशा ग्रामरक्षक देवतांच्या मंदिरांना कुलपं लावत नाहीत. त्यांना कसलं चोरीचं भय?
  • एका घरात घडलेला प्रसंग. बाबा मोठ्या आवाजात घरभर फिरत ‘भीमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती’ हे स्तोत्र म्हणायचे आणि रात्री रामरक्षा स्तोत्र म्हणायचे. यावेळी अर्थातच छोटा योगी (योगेश) त्यांच्याबरोबर असायचाच. त्याला हनुमानाबद्दल विलक्षण प्रेम नि कुतूहल. एक दिवस त्यानं बाबांना विचारलं, “हनुमत्‌‍ कीलकम्‌‍ म्हणजे काय हो?” बाबा अडखळले. त्यांना कुठं कीलकम्‌‍ या शब्दाचा अर्थ माहीत होता! साहजिकच योगीनं आपला मोर्चा आजोबांकडे वळवला. “हनुमत्‌‍ कीलकम्‌‍ म्हणजे काय हो आजोबा?” आपल्या शांत स्वरात आजोबा म्हणाले, “अरे, कीलकम्‌‍ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तुला समजेल असा अर्थ आहे किल्ली. आपण म्हणतो ना- ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्रीसीतारामचंद्रोदेवता सीताशक्तिः श्रीमत्‌‍ हनुमान कीलकम्‌‍…॥’ याचा अर्थ या मंत्ररूप असलेल्या श्रीरामरक्षा स्तोत्राचे रचयिता बुधकौशिक नावाचे ऋषी; याची देवता सीतारामचंद्र; या स्तोत्राची शक्ती सीता नि त्या शक्तीच्या खजिन्याची किल्ली (कीलकम्‌‍) म्हणजे हनुमान!” आजोबांच्या त्या उत्तराने योगीचे डोळे चकाकले, कारण हनुमान त्याचा सुपरमॅन होता ना! असो.
  • दासबोधात समर्थ रामदासांनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी अनेक उपासना-सूत्रे सांगितली आहेत. हेच बघा ना-
    भांडारे असती भरली। परी असती आडकिली।
    कारण- हाता न ये किली (किल्ली)
    कोणती किल्ली? -गुरुकृपा हेचि ते किली… म्हणजे ज्याप्रमाणे धनधान्याची भांडारे (कोठारे) भरलेली असतात, दागदागिन्यांचे कोश (हल्लीच्या भाषेत लॉकर्स) किंवा तिजोऱ्या भरलेल्या असतात; पण जोपर्यंत त्या उघडण्याची किल्ली हातात येत नाही तोपर्यंत काय उपयोग? हा झाला प्रपंचातला अर्थ. परमार्थात उपासना-साधना करून गुरुदेवांची कृपा संपादन करण्यासाठी म्हणजेच त्यांनी शक्तिपात करण्यासाठी किल्ली हवी. गुरुकिल्ली! पू. गोंदवलेकर महाराज आवर्जून सांगायचे- ‘नाम ही ती गुरुकिल्ली आहे.’ असो.
  • पूर्वी एक गाजलेलं हिंदी चित्रपटगीत होतं-
    बडा ये सीआय्‌‍डी है वो नीली छत्रीवाला।
    हर ताले की चाभी रख्खे, हर चाभी का ताला॥
    असा हा सीआय्‌‍डी अर्थातच परमेश्वर आहे. याच गाण्यात पुढे जे वर्णन येते ते व्यवहार आणि उपासना या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. या सीआय्‌‍डी अधिकाऱ्याकडे- ‘ना कोई बिल्ला, ना कोई नंबर, दफ्तर उसका नीला अंबर’- असं असूनही ‘नोट है उसकी पाकिट बूक में सबका- मालमसाला…’ म्हणूनच आपण म्हणतो ना की ‘किस्मत की चाभी उसके (भगवान के) हाथ में है।’
  • आजच्या सुरक्षित जीवनामुळे आणि आपल्या मालमत्तेच्या अतिरेकी मोहा (लोभा)मुळे कुलूप-किल्ली हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलाय. घराला सोडाच, ऑफिसला, दुकानाला, गाडीला, एवढंच नव्हे तर लॅपटॉप-मोबाईललासुद्धा लॉक लावलं जातं. आणि दूरचित्रवाणी (टीव्ही)वरील अनेक कोड्यांवर आधारित (क्विझ्‌‍) कार्यक्रमाच्या उत्तरांनासुद्धा ‘लॉक किया जाय?’ असं म्हणून लॉक केलं जातं. खरं तर आणखी एक कुलूप महत्त्वाचं आहे. तोंडाला किंवा जिभेला लावण्याचं. खाणं आणि बोलणं या दोघांवर मर्यादा असण्यासाठी संयमाचं, निग्रहाचं ‘लॉक’ लावायला नको का?
  • बाजारात अनेक छोटी-मोठी दुकानं असतात. त्यामुळे आपल्याला अनेक पर्याय असतात. पण जेव्हा घराची किल्ली हरवते तेव्हा एकाच सत्पुरुषाला शरण जावे लागते. चावीवाल्याला! तो एखाद्या स्थितप्रज्ञासारखा सर्वांना एकाच भावानं नवी चावी (डुप्लिकेट) बनवून देतो. मग समोरचं गिऱ्हाईक घराचा मालक असो की ते लुटणारा चोर असो. चावीवाल्याला काय त्याचे?
  • ‘उघडले स्वर्गाचे द्वार’ असं अनेकदा म्हटलं जातं. एरव्ही हे कुलूपबंद द्वार कुणासाठी उघडतं? युद्धात बलिदान केलेल्यांसाठी. म्हणून कौरवांना (सर्वजण युद्धात मेल्यामुळे) काहीकाळासाठी स्वर्गात प्रवेश मिळाला होता. पुण्यात्मा युधिष्ठिर मात्र सदेह स्वर्गात गेला.
  • येशू ख्रिस्त तळमळीनं सांगतो, ‘पाप तुमच्याकडून होणारच, कारण ती मानवाची सहजप्रवृत्तीच आहे. पण पाप केल्यानंतर मनापासून पश्चात्ताप करा. मग स्वर्गाची दारं खास तुमच्यासाठी उघडली जातील.’ महत्त्वाची कुलपं ही बऱ्याच वेळी अदृश्य असतात. आता तर आपली प्रतिमा म्हणजे प्रत्यक्ष देहाकृती, आपले डोळे, हस्तस्पर्श इ.नी अशी कुलपं उघडली जातात. त्यांनाही ‘सेन्सर’ प्रकारची चावी असतेच. पण अशी कुलपं उघडण्यासाठी आपण संवेदनक्षम (सेन्सिटिव्ह) असायला हवं ना!
  • शेवटी, कृष्णजन्माच्या वेळी कंसाच्या कारागृहाला लावलेली अनेक कुलपं एकदम उघडली गेली. कारण ही सारी कुलपं मायेची-मोहाची-सत्तेच्या भोगाची अशी होती. कृष्णाच्या अस्तित्वाच्या प्रभावानं माया हटली. कुलपं उघडली. अशा अनेक कुलपांत आपण अडकलेले आहोत. यातून मुक्त होण्यासाठी- जीवनमुक्तीचा अनुभव घेण्यासाठी एकच किल्ली आहे कृष्णाच्या नामबासरीची! बघा विचार करून.