>> कारचा चेंदामेंदा; एक जण गंभीर जखमी; जखमीवर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू
कुचेली-म्हापसा येथे रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान एका भरधाव कारची धडक रस्त्याबाजूच्या झाडाला बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बेळगाव-कर्नाटक येथील तिघा पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील चार पर्यटक केए-२२-एमए-३८१३ क्रमांकाच्या कारने गोव्यात पर्यटनासाठी आले होते. हणजूणहून म्हापशाकडे येत असताना पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ते कुचेलीला पोहचले असता, कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार कुचेली येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने तेथील स्थानिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारच्या पाठीमागील, पुढील आणि वरील भागाचे अपघातात नुकसान झाले.
या अपघातात नायर अंगोलकर (वय २८), रोहन गडग (वय २६) व सनी अणवेकर (वय ३१, सर्व रा. बेळगाव) हे तिघेजण जागीच ठार झाले, तर विशाल कारेकर (वय २७) हा गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पर्यटकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले. तसेच अपघाताचा पंचनामा करून तिन्ही पर्यटकांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिले.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलीस उपनिरीक्षक रिचा भोसले व विभा वळवईकर करीत आहेत.
ज्या ठिकाणी अपघात घडला, तो भाग अरुंद आणि वळणाचा असल्याने कारचालकास वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पहाटेची वेळ असल्याने कारचालकास झोप आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडला असावा, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. नायर अंगोलकर हा कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.