कुंकळ्ळी उठावाचा धडा आता पाठ्यपुस्तकात : मुख्यमंत्री

0
10

>> अकरावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

कुंकळ्ळी येथे पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या उठावासंबंधीचा एक धडा अकरावी इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

सासष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी ह्या गावात १५ जुलै १५८३ हा दिवशी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध तेथील क्षत्रियांनी जो उठाव केला होता, तो दिवस राष्ट्रीय युद्ध स्मृती दिवस जाहीर करण्यात यावा. तसेच या उठावाची नोंद ही ऐतिहासिक घटना अशी केली जावी, अशी मागणी करणारा कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव यांनी काल गोवा विधानसभेत मांडलेला खासगी ठराव एकमताने संमत करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले की, आम्ही हा दिवस राष्ट्रीय युद्ध स्मृती दिन म्हणून पाळण्याचे ठरवले असून, शुक्रवारी राज्यात गोवा सरकारतर्ङ्गे कुंकळ्ळी येथील स्मारकस्थळी हा दिन पाळण्यात आला. त्याचबरोबर दिल्लीतही तो पाळण्यात आला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीला झालेल्या कार्यक्रमाला हजर होते, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत युरी आलेमाव, उल्हास तुयेकर, सुभाष ङ्गळदेसाई, दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आल्टन ङ्गर्नांडिस आदींनी भाग घेतला.

कुंकळ्ळीच्या महानायकांकडून धर्म-संस्कृतीचे रक्षण
धर्मरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेले १६ वीर हेच गोवा मुक्तीसंग्रामाचे व धर्मरक्षणाचे खरे महानायक आहेत. त्यामुळे गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षी त्यांना राज्य पातळीवर सन्मानित करणे व १५८३ च्या लढ्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याचे भाग्य आमच्या सरकारला मिळाले. कुंकळ्ळीतील या महानायकांनी पोर्तुगीज काळात धर्मांतर रोखत राज्यातील मंदिरे, धर्म व संस्कृतीचे रक्षण केले. यापुढे गोव्यात धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

कुंकळ्ळी येथील पोर्तुगीज राजवटीविरुद्धच्या प्रथम लढ्याच्या स्मृतीनिमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या कुंकळ्ळी महानायक हुतात्मा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष ङ्गळदेसाई, आमदार युरी आलेमाव, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक, चिपटन्स ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन उपस्थित होते.
४३९ वर्षांपूर्वी कुंकळ्ळीकरांनी धर्मरक्षण, स्वराज्य व संस्कृती रक्षणासाठी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे राज्यात धर्मांतराला लगाम बसला. यापुढे धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच सर्व स्मारकांचे संवर्धन केले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.