कुंकळ्ळीतील दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

0
7

>> मृतांत दोघा चुलत भावांचा समावेश; अतिवेग बेतला जीवावर

सारझोरा-कुंकळ्ळी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची धडक झाडाला बसल्याने दोघा चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी पहाटे हा अपघात घडला. सर्फराज बेपारी (27) आणि नझील बेपारी (23) अशी मृत तरुणांची नावे असून, ते कुलसाभाट-चांदर येथे राहत होते. कुंकळ्ळीतच काल दुपारी झालेल्या दुसऱ्या एका अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला.
सर्फराज व नझील हे वार्का येथे हॉटेल चालवत होते. आपले हॉटेल बंद करून सोमवारी पहाटे दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी सर्फराज हा दुचाकी चालवत होता. गुडीपारोडा मार्गावरून जात असताना सारझोरा येथील होलीक्रॉस कपेलाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना इस्पितळात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी हाकल्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे वाहनावरील ताबा गेला व वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.
कुंकळ्ळीतच काल दिवसभरात दुसरा अपघात घडला, त्यात एक जण ठार झाला, तर एकजण जखमी झाला. चिंचोणे-असोळणा, कुंकळ्ळी येथे भरधाव दुचाकीची धडक सायकलला बसून झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. हा अपघात काल दुपारी 2 वाजता घडला. सिरुस पेरेरा (19) असे मृत दुचाकीचालकाचे असून, तो दुर्गा-चिंचणी येथील रहिवासी होता.
सिरुस पेरेरा हा कावासकी या दुचाकीने भरधाव वेगाने चिंचोणे येथून असोळणे येथे निघाला होता. तो चिंचोणे येथील बालाजी हार्डवेअर दुकानाजवळ पोहोचला असता, त्याची धडक सायकलने रस्ता ओलांडणाऱ्या राजपाल ओरान धनाय (24, मूळ रा. झारखंड) या मजुराला बसली. त्यात ते दोघेही जखमी झाले. कुंकळ्ळी पोलिसांनी दोघांनाही जिल्हा इस्पितळात नेले असता, त्या ठिकाणी सिरुस पेरेरा याला मृत घोषित केले, तर राजपाल याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले.