किनारी भागात अमली पदार्थांचा सुळसुळाट सुरूच

0
21

>> कडक कारवाईचा सरकारचा दावा फोल; गोवा पोलिसांचा अपयशी तपास

राज्यात अमली पदार्थाला थारा दिला जाणार नाही. अमली पदार्थाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला आहे. तरीही किनारी भागात अमलीपदार्थाचा सुळसुळाट कायमआहे.
राज्यातील अंमली पदार्थांच्या अति सेवनामुळे १९ नोव्हेंबर रोजी वागतोर येथे घडलेल्या ताज्या प्रकरणाने राज्यातील अमली पदार्थांविरुद्धच्या कारवाईच्या दाव्यांतील पोकळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

भाजपच्या नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगट यांचा अमलीपदार्थांचे अति सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोवा पोलिसांनी अमली पदार्थाच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. किनारी भागातील पार्टीचे आयोजन करणारे शॅक, हॉटेल यांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आगामी काळात अमली पदार्थाच्या अति सेवनाचे प्रकरण घडणार नाही, अशी अपेक्षा नागरीक बाळगून होते. तथापि, ही अपेक्षा नुकत्याच उघडकीस आलेल्या वागातोरमधील अति सेवनाच्या प्रकरणामुळे फोल ठरली आहे.

गोवा पोलिसांना अमलीपदार्थ विक्री करणार्‍याची पाळेमुळे खणून काढण्यास यश प्राप्त झालेले नाही. मात्र दुसर्‍या बाजूने हैदराबाद पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणात गुतंलेल्या गोव्यातील दीडशेपेक्षा जास्त जणांच्या नावांची यादी तयार करून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरूवात केली आहे. हणजूण येथील कर्लिस शॅक एडवीन नुनीस याला हैदराबाद पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणी दुसर्‍यांदा अटक केली आहे. यापूर्वी आणखी एका हॉटेलच्या मालकाला अटक करून जामिनावर सुटका केली आहे. तसेच, अमलीपदार्थ प्रकरणात हणजूण येथील बाल मुरूगन नामक व्यक्तीला अटक केली आहे.
कळंगुट या किनारी भागातील आमदार मायकल लोबो यांनी अमलीपदार्थ प्रकरणात परराज्यातील युवकांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे.

वागातोर येथील अमली पदार्थांचे अति सेवन केल्याप्रकरणी दोघा पर्यटकांबरोबर अज्ञात अमलीपदार्थ पुरवठादाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंगुट पोलीस त्या अमली पदार्थ पुरवठादाराचा शोध घेत आहेत. किनारी भागात अमली पदार्थाबरोबरच रात्रभर रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. मोठ्याने संगीत वाजवून नियमाचे उल्लंघन केले जात आहे, अशीही तक्रार नागरिक करत आहेत.