किनारा स्वच्छतेसाठी नवे धोरण

0
12

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती; पर्यटन विकासासाठी दोन्ही जिल्ह्यांत दोन आदर्श शॅक

राज्यातील समुद्र किनार्‍यांवरील विविध प्रश्‍न आणि समस्या हाताळण्यासाठी नवे एकात्मिक किनारी स्वच्छता धोरण तयार केले जाणार आहे. या धोरणामध्ये समुद्रकिनार्‍यांवरील स्वच्छता, सुरक्षा, जीवरक्षक, निगराणी आणि पथदीपांची सोय आदींचा समावेश असणार आहे, अशी माहिती पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. विधानसभेत पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

पर्यटन व माहिती-तंत्रज्ञान खात्याच्या माध्यमातून महसूल व रोजगार उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. राज्याच्या पर्यटन विकासाला गती दिली जात असून, राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी २ आदर्श शॅक उभारण्यात येणार आहेत, असे खंवटे म्हणाले.

राज्यातील खनिज बंदीमुळे महसुलाचा प्रमुख पर्याय म्हणून पर्यटन व्यवसायाकडे पाहिले जात आहे. कोरोना महामारीमुळे पर्यटकांची संख्येत घट झाली आहे. राज्यात कनेक्टिविटीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना हाती घेतली आहे. कनेक्टिविटीचे जाळे वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मनोरे उभारण्यात येणार आहेत. ङ्गायबरच्या माध्यमातून घरोघरी जोडण्या दिल्या जाणार आहेत. येत्या २ वर्षांत ही योजना मार्गी लावली जाणार आहे. आमदारांना दोन ठिकाणी मोङ्गत वायङ्गाय सेवा उपलब्ध केली जाणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

गोवा हे आयटी डेस्टीनेशन बनविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. दोनापावला, चिंबल, पर्वरी येथे आयटी उद्योगांसाठी जागा उपलब्ध आहे. तुये येथे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू करण्यात येत आहे. माहिती-तंत्रज्ञान खात्याकडून नवीन तंत्रज्ञानाचा अबलंब केला जात आहे. राज्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याने परराज्यात जावे लागत आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञानाला चालना आयटी धोरण, स्टार्टअप योजना सुरू केली आहे. आत्तापर्यत १४६ स्टार्टअप नोंद झाले आहेत. स्टार्टअपसाठी २.७७ कोटी रुपये वितरित केले असून, आणखीन ४३ लाख वितरित केले जाणार आहेत. महिला स्टार्टअपसाठी १० लाखांचे अनुदान ठेवण्यात आले आहे. छापखाना खात्याकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, असे खंवटे यांनी सांगितले.

‘को-वर्किंग’साठी तीन समुद्र किनार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यात बाणावली, करंजाळे आणि मोरजी समुद्र किनार्‍याचा समावेश आहे, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

टॅक्सीचालकांसाठी ऍप निर्मितीस तयार : खंवटे
पर्यटकांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने या विधानसभा अधिवेशनात ऍपआधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत सुतोवाच केले होते. त्याचबरोबर स्थानिक टॅक्सीचालकांनी ऍप टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना सरकारकडून सर्व सहकार्य केले जाईल, असेही स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर काल रोहन खंवटे यांनी स्थानिक टॅक्सीचालकांसाठी माहिती-तंत्रज्ञान खाते ऍप निर्मितीस तयार आहे, असे सांगितले.

२०२३ मध्ये गोव्यात
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

२०२३ मध्ये गोवा ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवेल. त्याबाबत नुकताच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडून आपल्याला ई-मेल प्राप्त झाला आहे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.