किचन क्लिनीक

0
443

– वैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा )

भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण ब-याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो.आपली भारतीय आहार पद्धती इतकी विशाल आणि समृद्ध आहे.आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी ब-या करण्याकरीता करु शकतो.
चला तर मग किचन क्लिनीक या आपल्या सदरामार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करुन घेऊया. मग सुरवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण ‘आले’ आणि ‘सुंठी’ची ‘वैद्य’ ही नवी ओळख पाहूया तर!
आपण सर्वचजण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा, चटण्या आणि आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनीखाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरं का. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघा ना, आले अधिक प्रमाणात खाल्ले तर ऍसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली ऍसीडीटी कमी करते.

आले
१) भुक लागत नाही का मग दररोज जेवणापूर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैंधव मीठासोबत खा आणि मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.
२) सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ चमचे ओल्या हळदीचा रस+१ चमचा मध हे मिश्रण घ्यावे.
३) आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी, खोकला, भुक न लागणे, तोंडास रुचि नसणे यावर रामबाण उपाय.
४) वाढलेले कोलेस्टरोल सतावतेय का?… मग सकाळी उपाशीपोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमित खा आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवा.

 

सुंठ

१) सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.
२) शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज, मुरगळणे, मार लागणे, यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.
३) गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणि सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.
४) पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.

 

कांदा

आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक. खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो. हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे. याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल. पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.
कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही. औषधे पोटात घ्यायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.
चला तर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा
वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!
१) मुळव्याधीमध्ये बर्‍याच जणांना संडासला घट्ट होते. त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.
२) जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.
३) कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात. प्रत्येक चकतीवर खडीसाखर घालून एका वर एक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी, खोकला ह्यात कफ सुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.
४) खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाजदेखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.
५) मार लागणे, मुरगळणे, सुज यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करुन कोमट करुन दुखणार्‍या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.

 

हिंग

मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंगपणा आणण्याचे काम उत्तम बजावतो. फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्यास खमंग वास येतो व त्या वासाने जेवणाची लज्जत देखील वाढते.
व्यवहारात देखील ‘हिंग लावणे’ हा वाक्प्रचार जेवणात आणि व्यवहारात दोन्हीकडे उपयोगी पडतो.
चला तर मग करुन घेऊया ना या हिंग रावांची एक वेगळी ओळख. हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव. याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात, त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास ‘हिरा हिंग’ म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो. हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणि उष्ण असतो. त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अति वापराने पित्त मात्र वाढवू शकतो. हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा. तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१) अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२) भूक लागत नसल्यास अथवा तोंडास रूची नसल्यास १/४ चमचा हिंगपूड +२ चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासासोबत घ्यावे.
३) १/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापूर्वी चावून खावे. याने जीभेवर साचलेला मळ आणि तोंडास दुर्गंध येणे या समस्या कमी होतात.
४) जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणि हिंग यांची पेस्ट जखमेवर लावणे. (कृपया डायबेटिसमुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५) गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणि सूज कमी होते.

 

लसुण

मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो. हा कंददेखील जमीनीखालीच उगवतो.
आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. यात आंबट सोडून बाकीचे पाचही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.
चला तर मग ही लसूण आपले बारीक सारिक आजार बरे करुन आपली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.
१) नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा, काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!
२) ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो- साधा सोपा उपाय म्हणजे लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात. त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.
३) लसुण ही डोळयांचे आरोग्यदेखील उत्तम राखते बरे का? त्याकरीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.
४) सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या. बघा… गॅस कुठल्याकुठे पळुन जाईल.
५) सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणार्‍या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा. या उपायाने निश्चित फायदा होईल.
६) ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.
तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.