>> दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक; ओव्हरटेकच्या नादात गमावला जीव
पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात करमळीवाडी-कळणे, दोडामार्ग येथील 25 वर्षीय तरुणी सुजाता सुरेश सातार्डेकर हिचा जागीच मृत्यू झाला. दुसरा दुचाकीचालक फैझर फ्रान्सिस मास्कारेन्हास (22 वर्षे, रा. हसापूर) हा जखमी झाला. येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.
सविस्तर माहितीनुसार, सुजाता सुरेश सातार्डेकर ही मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआरएल कंपनीत कामाला होती. या ठिकाणी दिवसा व रात्री ड्युटी लावली जाते. सुजाता सातार्डेकर ही मंगळवारी रात्री कामावर होती. बुधवारी सकाळी ड्युटी संपूवन सुजाता ही दुचाकी (क्र. एमएच-07-एटी-1150) ने घरी जात होती. ती कासारवर्णे येथे पोहोचली असता अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिच्या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या फैझर फ्रान्सिस मास्कारेन्हास याच्या दुचाकी (क्र. जीए-11-जे-2128) ला बसली. सुजाता सातार्डेकर तोंडाने खाली पडली, त्यात तिच्या तोंडाला मार लागून जखमी होऊन रक्तस्त्राव झाल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. तिने हेल्मेट घातले होते; पण उपयोग झाला नाही. फैझर मास्करेन्हास हा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या हातापायांना मार लागला, त्याला उपचारासाठी इस्पितळात हलविण्यात आले. सुजाता हिच्या अपघाती निधनामुळे कळणे करमळीवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मोपा-पेडणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. तसेच सुजाता सातार्डेकर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळीत गोमेकॉ इस्पितळात पाठवला. या अपघात प्रकरणी अधिक तपास मोपा पोली करत आहेत.
3 महिन्यांपूर्वीच घेतली होती दुचाकी
सदर युवतीने तीन महिन्यांपूर्वीच मनोहर विमानतळावर कामावर ये-जा करण्यासाठी नवीन दुचाकी खरेदी केली होती. तिच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच गावातील अनेक जण घटनास्थळी दाखल झाले. सुजाता हिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.