काश्मीरींनी दैनंदिन व्यवहार सुरू करावेत

0
125

>> काश्मीर प्रशासनाचे वर्तमानपत्रातील जाहिरातीतून आवाहन

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा रद्द ठरविणारे घटनेतील कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर या प्रदेशातील ठप्प झालेले जनजीवन काल ६८ व्या दिवशीही कायम राहिल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य प्रशासनाने काल येथील विविध वर्तमानपत्रांमधून जाहिरातींद्वारा लोकांना आवाहन केले. पूर्ण पानाच्या या जाहिरातींमध्ये प्रशासनाने लोकांना आवाहन केले आहे की दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता लोकांनी आपली दैनंदिन काम चालू ठेवावीत.

या सरकारी जाहिरातीत पुढील नमूद केले आहे – ‘आपण दहशतवाद्यांच्या धमक्यांना बळी पडणार काय? गेल्या ७० वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या लोकांची दिशाभूल केली गेली. काश्मीरी लोक नेहमी अपप्रचाराच्या जाळ्यात सापडले. परिणामी ते दहशतवाद, हिंसाचार, विध्वंस व दारिद्य्र अशा दुष्टचक्रात खितपत राहिले आहेत.’
काश्मीरमधील विभाजनवादी स्वतःच्या मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांना उत्तम शिक्षण देतात, त्यांच्या रोजगाराची व आर्थिक मिळकतीची व्यवस्था करतात. मात्र सर्वसामान्यांच्या मुलांना हिंसाचार करण्यास लावले जाते, दगडफेक करण्यास लावले जाते, हरताळ आंदोलनात ढकलले जाते से या वर्तमानपत्रांमधील निवेदनात म्हटले आहे.

लोकांची दिशाभूल करण्यासाठी विभाजनवाद्यांनी दहशतवाद्यांच्या धमक्यांची भीती सर्वसामान्यांना दाखवली. आज हीच युक्ती दहशतवादी वापरत आहेत. आम्ही हे सहन करणार आहोत काय? असा सवाल जाहिरातीत केला आहे. अशा धमक्यांना घाबरून व दिशाभूल करणार्‍या माहितीचा धसका घेऊन आपण आपली दैनंदिन कामे, व्यवसाय बंद ठेवणार आहोत काय?
काश्मीर राज्याच्या हिताचा विचार काश्मीरी जनतेने करायचा आहे. हे आपले घर आहे. आपल्या घराच्या हिताचा व समृद्धीचा विचार आपणाला करावा लागेल असे या जाहिरातीत म्हटले आहे.