काश्मीरात बस दरीत कोसळून ३५ मृत्युमुखी

0
132

जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात काल सकाळी डोंगराळ भागातील रस्त्यावरून घसरून खच्चून भरलेली बस खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान ३५ जण मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती राज्याच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिली. तसेच या अपघातात अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

सदर बस केशवान येथून किश्तवार येथे जात होती. किश्तवारचे पोलीस उपायुक्त ए. एस. राणा यांनी सांगितले की सदर २८ आसनी मिनी बसमध्ये ५२ प्रवासी भरण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. अपघातात ३५ जण मृत्युमुखी पडले असून १७ जण जखमी झाल्याचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक शक्ती पाठक यांनी सांगितले. अपघाताच्या ठिकाणी पोलीस, सुरक्षा दले व स्थानिक यांनी मदतकार्य हाती घेतले. चॉपर विमानांस पाचारण करून काही जखमींना जम्मूतील इस्पितळांत नेण्यात आले.

राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या निकटवर्तियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. प्रशासनाच्या बैठकीत या दुर्घटनेबद्दल चौकशी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.