काश्मीरसाठी एकता, ममता प्रभावी मंत्र : पंतप्रधान मोदी

0
111

काश्मीरात शांती प्रस्थापनेसाठी एकता व ममता हा जुळा मंत्र प्रभावी मार्गदर्शक ठरू शकतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले. त्याचवेळी काश्मीरमधील युवकांना जे लोक चिथावणी देतात त्यांना त्याचा जाब द्यावा लागेल असा इशाराही मोदी यांनी यावेळी दिला.

काश्मीरप्रश्‍नी आपण सर्वपक्षीय बैठकीतून नेत्यांशी जो संवाद साधला त्यातून एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट झाली ती म्हणजे एकता व ममता हे या प्रश्‍नी मूलमंत्र ठरू शकतात. सर्व पक्षीय नेत्यांची हीच भावना होती असे मोदी म्हणाले. काश्मीरमधील एखाद्या युवकाला असो किंवा सुरक्षा जवानाला त्याचे जीवन संपवावे लागले तर ते आमचे नुकसान आहे. काश्मीरप्रश्‍नी जीएसटी विधेयकाप्रमाणेच सर्व पक्षांचे एकमत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व राजकीय पक्षांनी जगाला, विभाजनवाद्यांना व काश्मीरी जनतेलाही एकच संदेश दिला आहे असे ते म्हणाले. काश्मीरमधील विरोधी पक्षांचे नेते तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी यांची भेट घेऊन या प्रश्‍नावर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही दिवसांनीच पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री मुफ्ती व विरोधक दोघांनीही चर्चेचा मार्ग सुचवला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने टीका केली आहे. या धगधगत्या विषयावर बोलण्यासाठी पंतप्रधानाना ५१ व्या दिवशी वेळ मिळाला आहे. यावरून या प्रश्‍नी केंद्र सरकार किती गंभीर आहे ते स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रवक्ते सूरजेवाला यांनी व्यक्त केली.