काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद

0
101

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर काल पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानातून आलेल्या चार दहशतवाद्यांनी जवानांच्या बंकरवर ग्रेनेड फेकल्याने जवानांचा होरपळून मृत्यू झाला. सुमारे तीन तासांच्या चकमकीनंतर चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. काश्मीरमध्ये १९९० नंतर लष्कराच्या एखाद्या मुख्यालयावर झालेला हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे.

सर्व दहशतवादी झेलममार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसले होते. जवान ड्युडीची अदला-बदली करत असतानाच कुंपणाची तार कापून दहशतवादी आत घुसले. दहशतवाद्यांनी नियंत्रण सीमारेषेजवळ पहाटे साडेपाच वाजता हल्ला केला. मुख्यालयाच्या आत प्रवेश केल्यावर दोन-दोनच्या गटात वेगळे होऊन त्यांनी मुख्यालयावर बेधुंद गोळीबार केला. उरीतील हे मुख्यालय सीमारेषेजवळ आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या बंकरवर ग्रेनेड फेकले. त्यावेळी जवान ड्युटी करून बंकरमध्ये विश्रांती करत होते. ग्रेनेडचा स्फोट होताच बंकरमध्ये आग लागली. त्या आगीत १७ जवानांचा होरपळून मृत्यू झाला. काही जवान जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करून इस्पितळामध्ये हलविण्यात आले आहेत.
या हल्ल्यानंतर परिसराला सुरक्षा दलाच्या पथकांनी वेढा घातला. अडीच ते तीन तास सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. हल्ला करणार्‍या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सध्या सुरक्षा दलाचे पथक परिसराची कसून तपासणी करत आहेत.
जबाबदार असलेल्यांना
धडा शिकवणार : मोदी
उरीतील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणारच असा इशारा दिला आहे. हल्ल्या शहीद झालेल्या जवानांना वंदन करत संपूर्ण देश शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
चोख प्रत्युत्तर द्या : पर्रीकर
उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल संध्याकाळी भेट देऊन लष्करप्रमुखांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करा असा आदेश लष्करप्रमुखांना दिला. यानंतर पर्रीकर यांनी जखमी जवानांवर उपचार सुरू असलेल्या इस्पितळाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी सर्वोत्तम उपचार करण्यासाठी अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. दहशतवादी हल्ला भ्याड असल्याचे सांगून जवानांचे प्राणार्पण व्यर्थ जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.