काश्मीरमध्ये आयसिसचा प्रवेश…

0
145

 

  • शैलेंद्र देवळाणकर

दक्षिण काश्मीरमधील जकुरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. त्यामुळे आयसिस आता उंबरठ्याशी नसून घरात आली आहे. ही धोक्याची घंटा असून आयसिसचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र रणनीती तयार करावी लागेल…

दक्षिण आशियामध्ये काही महिन्यांपूर्वी इस्लामिक स्टेट किवा आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने दस्तक दिल्याचे समोर आले. त्यानंतर या भागामध्ये आयसिस आपले जाळे विस्तारत असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली. भारतामध्ये मागील काळात अनेक तरुण या संघटनेमध्ये भरती होण्यासाठी जात असताना पकडले गेले. जम्मू-काश्मीरमध्ये काही वेळा आयसिसचा झेंडा ङ्गडकावला गेला, मात्र तरीही आयसिसकडून भारताला धोका नाही, असे मत मांडले जात होते. या मताला आता छेद गेला आहे. काश्मीरमधील जकुरामध्ये पोलिस ठाण्यावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे, ही धोक्याची घंटा आहे.

आयसिसच्या ‘अहमाक’ या अधिकृत संकेतस्थळावर अरबी भाषेत लिहिलेल्या मजकुरातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या हल्ल्यातील दहशतवादी मुगीस अहमद मीर याला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर त्याला पारंपोरा येथे दङ्गन करण्यात आले. त्याचा मृतदेह आयसिसचा झेंडा असणार्‍या काळ्या कापडात झाकण्यात आला होता. मीर हा अंसार गजवातुल हिंद या संघटनेचा सदस्य आहे. त्याच्या अंत्ययात्रेवेळी जमलेल्या समुदायाने इस्लामिक स्टेट आणि झाकीर मुसा याचे समर्थन करणारे नारे दिले. मीर हा अल् कायदाचा कमांडर झाकीर मुसाचा निकटवर्तीय हस्तक होता. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आयसिसने पहिल्यांदाच काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवसांपूर्वीच आयसिसकडून भारतातील धार्मिक मेळ्यांना लक्ष्य करण्यात येणार असल्याची आणि काही तीर्थस्थळे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

मध्यंतरी गुप्तहेर संघटनांचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालाचे नाव होते ‘द स्प्रेड ऑङ्ग इस्लमिक स्टेट आयडियॉलॉजी इन जम्मू अँड कश्मीर.’ या अहवालात जॅक मुसाच्या नावाचा उल्लेख होता. या जॅक मुसाने आपल्या ट्विटर हँडलरवरुन ‘बयाह ङ्ग्रॉम काश्मीर’ नावाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने इस्लामिक स्टेटची विचारसरणी काश्मीरमध्ये पसरवण्याचा उल्लेख केला होता. २०१५ नंतर हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये ङ्गूट पडली. त्यातून दोन कमांडर बाहेर पडले. यापैकी एक म्हणजे झाकीर मुसा. या मुसाने अंसार गजवातुल हिंद नावाचा एक गट स्थापन केला. हा गट अल् कायदाशी बांधिलकी सांगणारा असला तरी तो आयसिसशीही बांधिल असल्याचे सांगितले जाते. दुसरा कमांडर होता अब्दुल कयम नगर. त्याने हिज्बुल मुजाहिद्दीनमधून बाहेर पडून लष्करे इस्लाम नावाचा गट स्थापन केला. हा गटही आयसिसशी बांधिलकी सांगणारा आहे. त्याचवेळी आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने एक गट स्थापन केला असून त्याचे नाव आहे युनायटेड जिहाद कौन्सिल. या गटाकडून हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद आणि लष्करे तैय्यबा यांना पैसा पुरवला जात असून सय्यद सलालुद्दीन हा या गटाचा प्रमुख आहे. हा गट आणि हिज्बुलमधून ङ्गुटून तयार झालेले दोन गट असे एकूण तीन गट सध्या कार्यरत आहेत. २०१९ पर्यंत युनायटेड जिहाद कौन्सिल या गटाचे महत्त्व कमी होत जाऊन अन्य दोन गटांचे महत्त्व वाढत जाणार आहे, असे सांगितले जात आहे.
आता प्रश्‍न उरतो तो आयसिस किंवा इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी का घेतली? गेल्या पाच- सहा महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी १९० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील भारतीय लष्कराची आणि एकंदरीतच तपास यंत्रणांची सध्याची मोर्चेबांधणी अत्यंत मजबूत आहे. एका बाजूला दहशतवादी मारले जात आहेत तर दुसर्‍या बाजूला त्यांान घुसखोरी करणेही अवघड होत आहे. परिणामी, या दहशतवादी संघटनांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याचा प्रयत्न आयसिस करीत आहे. भूतकाळात डोकावले तर इस्लामिक स्टेटचा उदय आणि विस्तार अशाच परिस्थितीतून झालेला दिसतो. अङ्गगाणिस्तानातही अमेरिकन ङ्गौजा माघारी ङ्गिरल्यानंतर निर्माण झालेली पोकळी व्यापण्यासाठी आयसिसने तेथे हल्ले सुरू केले आहेत. तसाच प्रकार आता ही संघटना काश्मीरमध्ये करू पाहत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेेटला मोठ्या प्रमाणात माघार घ्यावी लागली आहे. त्यांनी बळकावेले बरेचसे भाग त्यांच्या ताब्यातून निसटून गेले आहेत. आयसिसने कब्जा केलेली शहरे सरकारी ङ्गौजा जिंकून घेत आहेत परिणामी या भागांमध्ये त्यांचा प्रभाव संपत चाललेला आहे. त्यामुळे या संघटनेने त्या भागातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आपली सत्ता दुसरीकडे स्थापन कऱणे अपरिहार्य बनले आहे. त्यांनी दुसरीकडे पाय पसरण्यासाठी जागा शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आयसिसला आपला विस्तार करण्याच्या आणि दहशतवाद पसरवण्याच्या दृष्टीने सुपीक जमीन काश्मिरच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणूनच आयसिसचा प्रभाव काश्मीरमध्ये वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत,

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडील काळात आयसिसला विविध दहशतवादी कृत्ये करण्यासाठी योद्धे मिळणे कठीण झालेले आहे. आजवर त्यांना युरोपीय देशांमधून लोक मिळत होते; मात्र युरोपने त्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. परिणामी, आयसिसने आपला मोर्चा दक्षिण आशियाकडे वळवला आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे, आयसिसचा विस्तार आणि प्रचार-प्रसार हा प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्येे विशेषतः बुर्‍हान वाणीला ठार केल्यानंतर काश्मिरमध्ये लष्करे तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटना तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू लागल्या आहेत. ङ्गेसबुक, ट्वीटर, टेलीग्रीम, व्हॉटसऍप यांसारख्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आयसिसला या भागात प्रचार करण्यासाठी आयता मंच मिळणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी आयसिसने काश्मिरसाठी एक ब्लू प्रिंट तयार केली होताी. यामधून आयसिसने काश्मिरमध्ये प्रवेश करण्यात येणार असल्याचा इशारा देत असतानाच पाकिस्तान, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांच्यावर टीका केली होती. ह्या संघटनांची कार्यपद्धती चुकीची आहे असे सांगतानाच काश्मीरमधील तरुणांना एक आवाहन केले होते. त्यामध्ये ‘तुम्ही काश्मिरच्या संघर्षाला ग्लोबल जिहाद बनवा, काश्मिरमध्ये शरीयाच्या आधारावर शासन आले पाहिजे आणि अत्यंत कडवा संघर्ष झाला पाहिजे’ अशी मागणीही केली होती. या ब्लू प्रिंटमुळे दहशतवादी संघटनांमधील छुपा संघर्ष किंवा ध्रुवीकरण उघड झाले. अल कायदा आणि आयसिस या आतंरराष्ट्रीय दहशतवादी संघटना काश्मीरच्या संघर्षाला ग्लोबल जिहादचे स्वरुप देऊ इच्छिताहेत; तर दुसरीकडे पाकिस्तान पुरस्कृत यंत्रणा आणि काश्मिरमधील ङ्गुटीरतावादी हे त्याला स्थानिक संघर्षाचे रूप देऊ इच्छिताहेत. काही दिवसांपूर्वी हुरियत कॉन्ङ्गरन्सने पत्रकार परिषद घेऊन आयसिसवर टीका केली होती आणि या संघटनेला ‘अनइस्लामिक’ म्हटले होते.

सय्यद सलाउद्दीननेही की इस्लामिक स्टेटची काश्मीरमध्ये कोणतीही भूमिका नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटना असा संघर्ष काश्मीरमध्ये आकार घेतो आहे. या सर्वांमुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे, कारण आपली सर्व यंत्रणा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्यासाठी म्हणजे सीमापार दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी तयार केली आहे. अल् कायदा आणि आयसिसने काश्मीरमध्ये पाय रोवायला सुरुवात केली तर त्यांचा सामना करण्यासाठी भारताला वेगळी यंत्रणा विकसित करावी लागणार आहे. कारण ह्या दहशतवादाचा प्रसार हा समाज माध्यमांतून भारतात केला जातो.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ह्या भारतीय सैन्यासमोर उभ्या ठाकून गोळीबार करून संघर्ष करतात. याचाच अर्थ हे हल्ले बंदुकीच्या साहाय्याने होतात. मात्र अल कायदा आणि आयसिस या संघटना अशा प्रकारचा संघर्ष करीत नाहीत. त्यांच्याकडून आरडीएक्स किंवा बॉम्बस्ङ्गोटाचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष करताना वेगळ्या प्रकारची धोरणे अवलंबावी लागणार आहेत. आयसिस भारतात सक्रिय झाल्यास समोरासमोर युद्धसंघर्ष होणार नसून आरडीएक्सचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्याला शह देण्यासाठी आपल्या तपास यंत्रणांना नव्याने विचार करावा लागेल. त्याचबरोबर काश्मीरी युवक या विचारसरणीकडे आकृष्ट होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वस्तुतः काश्मीरची संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे, कारण तिथे हिंदु, शिया मुसलमान, सुन्नी मुसलमान, शीख अशा सर्व धर्म-पंथांचे लोक आहेत. त्यामुळे तिथले तरुण या विचारधारेकडे ओढले जाऊ नयेत यासाठी त्यांना रोजगार मिळवून देणे आवश्यक आहे. त्यांना मुख्य धारेत सामावून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. थोडक्यात, आयसिसच्या वाढत्या प्रभावाला कमी लेखून चालणार नाही. एका गुप्तचर अहवालानुसार काश्मीरमधील तरुणांकडून इंटरनेटवर आयसिसविषयीची माहिती सर्वाधिक सर्च केली जाते. काही जणांच्या मते, काश्मीरमध्ये असा एकही शुक्रवार उजाडत नाही, ज्या दिवशी तेथे आयसिसचा झेंडा ङ्गडकावला जात नाही. मात्र आजवर त्याकडे काही माथेङ्गिरु तरुणांचे कृत्य असे मानून पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करत राहिल्या. यापुढील काळात अशा प्रकारचे दुर्लक्ष महागात पडू शकते हाच ताज्या हल्ल्याचा अन्वयार्थ आहे.