काळ्या-पिवळ्या टॅक्सीवाल्यांचा संप मागे ः मुख्यमंत्री

0
124

राज्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी मालकांनी संप मागे घेतला असून प्रवाशांच्या वाहतुकीला सुरुवात केली आहे. रेन्ट अ कॅब आणि रेन्ट अ बाईक अंतर्गत आगामी तीन वर्षात नवीन वाहन परवाने दिले जाणार नाहीत. टूरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी आपला संप मागे घेऊन सहकार्य करावे. टॅक्सी व्यावसायिकांना ऍपची सक्ती केली जाणार नाही. सरकार टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना काल दिली.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी मालकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. रेन्ट अ कॅब आणि बाईक या योजनेतील जुने वाहन बदलण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मांडवीतील कॅसिनोवर जाण्यास गोमंतकीयांना बंदी घालण्यात येणार आहे. सर्व आमदारांना विश्‍वासात घेऊन बंदीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. कॅसिनोमध्ये ५६४ गोमंतकीय आणि ८७७ बिगर गोमंतकीय काम करीत असल्याचे कामगार खात्याने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पोलीस खात्यात १३०० शिपायांची भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी निर्धारित केलेल्या वयात २८ वर्षापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस भरतीसाठी १८ ते २४ वर्षे असे वय पूर्वी निर्धारित केले होते. येत्या महिनाभरात पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पाच महिन्यात भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ङ्गोंडा आणि सांगे येथे नवीन पोलीस इमारती उभारण्यात येणार आहेत. सुर्ल सत्तरी येथे पोलीस चौकीचा विचार केला जाणार आहे. विविध पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात गृहरक्षक म्हणून ५ वर्षे सेवा बजावलेल्या आणि १० वी उत्तीर्ण असलेल्यांना गृहरक्षकांना पोलीस, वन, कारागृह किंवा अबकारी या खात्यात नोकर भरतीसाठी सूट दिली जाणार आहे. यापूर्वी नोकर भरतीसाठी १० वर्षाची अट होती. तसेच गृहरक्षकांना निवृत्तीच्या वेळी आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यावर विचार केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यास सरकार कटिबद्ध आहे. नागरिक कुठल्याही खात्यातील भ्रष्टाचारासंबंधी दूरध्वनीवरून तक्रार देऊ शकतात. तक्रारदारांचे नाव गुपित ठेवले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाटो पणजी येथील सरकारी इमारत बांधणीसाठी आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा जारी केली जाणार आहे. सरकारी इमारतीसाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. परंतु, सदर आराखडा योग्य झालेला नाही. ही सरकारी इमारत आयकॉन बिल्डीग म्हणून बांधली जाणार असून आराखडा तयार करण्यासाठी विदेशी स्थापत्यशास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील गोवा सदनासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामाचे तीन आराखडे तयार करण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात नवीन इमारतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

ड्रग्स प्रकरणांची गंभीर दखल घेणार
सरकारकडून अमली पदार्थ प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाणार आहे. या अमली पदार्थ प्रकरणात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही. अमली पदार्थाची विक्री करणार्‍याची माहिती द्यावी. अमली पदार्थाची विक्री एजंटाची माहिती देणार्‍यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहे. पोलीस खात्यातील अमलीपदार्थ विरोधी विभागात पूर्ण सुधारणा घडवून आणली जाणार आहे. प्रामाणिकपणे सेवा बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती अमलीपदार्थ विभागात केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.