कालो… जत्रा… दशावतारी खेळ

0
491
  • पौर्णिमा रा. केरकर

लोकसंस्कृती, लोकपरंपरा शहरीकरणाच्या लाटेत घुटमळत असलेल्यांना माती, निसर्ग याविषयीचे प्रेम. श्रद्धा प्रेमाची अनुभूती बहाल करते हे लक्षात घेऊनच बदलत्या उत्सवातून आपुलकीचे बंध जतन करून ठेवायलाच हवें. निसर्गाशी, पर्यावरणाशी, संस्कृती-संस्कारांशी कृतज्ञता म्हणून लोकांनी इथल्या परंपरांचे पालन केले. नैसर्गिक तत्त्वाला टिकवून हे तत्त्व जपायला हवे; तेव्हाच कोठे जत्रा, काला, दशावतारी नाटक खेळ यांची उंची सर्वांना कळेल.

कार्तिक मासाचा उत्तरार्ध सुरू झाला की वातावरणात गारवा वाढू लागतो. देवदिवाळीपर्यंत सणउत्सवांची पर्वणी आविष्कृत होत राहते. हा आविष्कार गावागावांतून होणार्‍या कालो-जत्रांच्या माध्यमातून अनुभवता येतो. वरगाव- माशेलमधील देवकीकृष्णाच्या मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांची आठवण करून देणारा रातकाला साजरा होतो आणि मग कालो, जत्रा रीतीरिवाजाप्रमाणे सुरू होतात. जत्रा म्हटली की लहानापासून थोरापर्यंत सगळीकडे उत्साह संचारतो. चाकरमान्यांना तर जत्रेच्या दिवसात गावाकडचे वेध लागतात. माहेरच्या देवाची ओटी भरण्यासाठी सासुरवाशीण मुली आतुर होतात. मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अशा उत्सवांना मरगळ आल्यासारखे वाटत होते. परंतु त्यानंतर मात्र नव्या जोमाने वेगळ्या ढंगात या पारंपरिक सण उत्सवांचे स्वागत करण्यासाठी नवी पिढी सज्ज झाली. याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे राज्य पातळीवरील शिखर संस्थांनी आयोजित केलेल्या परंपरा संस्कारांच्या जपणुकीसाठीच्या स्पर्धा. या स्पर्धांमध्ये नवीन पिढीचा भरणा वाढला. नाही म्हटले तरी या पारंपरिक प्रवाहाशी ही पिढी जोडली गेली. गाव आणि गावासंदर्भातील माहिती त्यांना कळली. कालो, जत्रा, इतर सण, विधी उत्सवाबद्दल जवळीक निर्माण झाली. सांस्कृतिक, साहित्यिक, सांगीतिक क्षेत्राला अशी उंची आली असता, गेले वर्षभर महामारीच्या संकटामुळे एक असीम उदासीनता भरून राहिली. शिरगावचा लईराईचा जत्रोत्सव तर गोवा तसेच गोव्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान. इतिहासात पहिल्यांदाच होमखंड धगधगले नाही, धोंडांचा लईराईच्या भक्तांचा अभूतपूर्व उत्साह अनुभवताच आला नाही. आताच कोठेतरी आपण स्वतःला सावरत आहोत. नव्या उत्साहाने. नव्या ऊर्जेने पुढे जात आहोत. या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील कालो-जत्रांचे वेगळे वैशिट्य ही वैभवसंपन्न परंपरा इथल्या सांस्कृतिक संचिताचे दिव्यत्व अधोरेखित करते. ‘काला’ या शब्दाचा उच्चार केला की श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांची आठवण येते. पुराणकाळात श्रीकृष्ण आपल्या सर्व सख्या-सोबत्याना बरोबर घेऊन गायीगुरे चरण्यासाठी रानावनात न्यायचा. त्यांच्यासोबत त्यांची प्रत्येकाचीच शिदोरी असायची, अशावेळी सर्व शिदोर्‍या एकत्रित करून त्यांचा काला केला जायचा. त्याचे आनंदाने भक्षण सर्व सवंगडी करायचे. याच काल्याचा संदर्भ घेऊन लोकमानसात ‘कालो’ रुजला. गोपाळकाला, गौळणकाला अशा रूपाने तो गोमंतकीय संस्कृतीशी समरस झाला. गोव्याबरोबर कोंकण प्रांतही त्याने आपलासा केला. लहानमोठ्या छान नाट्यरूपात असलेला हा काला म्हणजे कृष्णलीलाच असते. राधाकृष्ण, गोपगोपी, गोकूळ वृंदावन ..यांच्या वर्णनाबरोबरीने श्रीकृष्णाचे पराक्रम, गोपिकांचे प्रेम, राधेची निस्सीम भक्ती, यशोदेचे वात्सल्य हे सारेच संगीतमय वातावरण रसिक मनाला भारून टाकते. परंपरेचे हे संचित आहे. आज धावपळीत जरी याचे मूळस्वरूप मागे पडले, तरीही त्याचे प्रतिबिंब अजूनही गावागावांत साजर्‍या होणार्‍या कालोत्सवामधून दृष्टीस पडते.

कार्तिक पौर्णिमेचा थंडीचा मौसम आणि गावा गावाला लागणारी जत्रा-कालोची ओढ इथल्या दशावतारी नाट्य खेळांचा परिचय करून देते. भगवान विष्णूने घेतलेले दहा अवतार म्हणजेच दशावतार. देवळात रात्रीच्या वेळी जत्रोत्सव संपन्न झाल्यावर त्याच दिवशी दुपारी पहाटेच्या प्रहरी गवळण काला केला जायचा. दशावताराच्या वेळी हे नाटक संपल्यानंतर दहिकाला होतो म्हणूनही त्याला दशावतार असे म्हटले जाते. गायन, नृत्य, नाट्य, संगीत, पौराणिक आख्यान, यावर आधारित कथानक. गोमंतकातील दशावतारी खेळ मत्स्यावतार, कृष्णावताराने सुरू होतो तर उत्तर कोकणात प्रथम हिरण्यकशिपू येऊन मधला नृसिंहावतार दाखविला जातो. या दशावतारी खेळात कलाकारांची शस्त्रे, अस्त्रे, मुकुट, अभिनयासाठी लागणारे इतर सामान ठेवण्यासाठीचा पेटारा सोबतीला असतोच. हा पेटारा दशावतारी कलाकारांची मोठी श्रद्धा. बेताच्या पेटीसारखी बांबूच्या फोकाची ही सामानाची पेटी. दशावतारी खेळासाठी लागणार्‍या वस्तू या पेटार्‍यात ठेवल्या जातात. पेटार्‍यात गणपतीचा लाकडी मुखवटा, ही कलाकारांची मोठी श्रद्धा होती…आहे… त्याचबरोबरीने सरस्वतीचा मुकुट, मोरपट्टा, लढाईसाठीची आयुधे, सातेरीची श्रद्धा असलेले श्रीफलसुद्धा असते. दशावताराचे भावविश्व आपल्यात सामावून घेणारा हा पेटारा ही कला जिवंत राहावी, परंपरेने ती संक्रमित व्हावी यासाठीच आजही धडपडत आहे. पेटारा .. पेटारो याचेच तर प्रतीक आहे.

दशावतारी खेळाला सुरुवात करण्यापूर्वी पेटार्‍याची पूजा, आरती केली जाण्याची परंपरा आहे. रंगभूमीवर प्रवेश करण्यापूर्वी पेटार्‍याला न चुकता पाया पडणे, ही तर कलाकाराची श्रद्धा. त्याने आपला हा क्रम कधीच चुकविलेला नाही. पेटीवाला, तबलजी यांचे आगमन आणि त्यांची रंगमंचावरील बैठक यामधील सहजता पूर्वी तर प्रकर्षाने जाणवायची. अकृत्रिमता हा तर दशावतारी खेळाचा प्राण आहे… आख्यानकाव्ये, पौराणिक, ऐतिहसिक ग्रंथांची पारायणे करून ती ती भूमिका तो तो कलाकार अक्षरशः जगतानाची अनुभूती दशावतारी करून देते. मंदिरासमोरील कोणत्याही, त्याचे बांधकाम नसलेल्या मोकळ्या प्रांगणातच खेळ चांगले रंगतात. मध्यरात्र उलटून गेल्यावर तर या नाटकाच्या खेळाला रंगत चढते एक चादर फक्त पडद्याचं काम करते, तेही आपल्या अंगावर लपेटून. दुसरं दृश्य जर दाखवायचं असेल तर मध्ये त्याचा वापर पडल्यासारखा केला जातो. खेळ कंपनीतील एखादी व्यक्ती मग या चादरीचा वापर पडल्यासारखा करते. गणपतीचे आगमन, सरस्वतीचे नृत्य, शंकासुर ब्रह्मदेव विष्णू इतरही कितीतरी पात्रे मग चादरीच्या या तुकड्यामधूनच प्रवेश करून आपापली भूमिका व्यवस्थित वठवितात आणि मग पडद्याआड निघूनही जातात. जत्रेच्या वेळी होणारा आड दशावतार शंकासुर गवळण ब्रह्मदेव वगैरे मंडळींना रंगमंचावर घेऊन येतो. इतरवेळी मात्र गणेशाचे स्तवन केल्यावर एकदमच आख्यानाला सुरुवात केली जाते. नोव्हेंबर- डिसेंबरचे महिने हे खास गावागावांतील होणार्‍या जत्रांचे दिवस आहेत. नाट्य आविष्काराची ओढ ही लोकमनाची उपजत ओढ आहे. त्यातून प्राप्त होणार्‍या आनंदाचा खजिना जीवनाला तृप्तता प्रदान करतो. गोमंतकीय लोकनाट्याचा विचार करताना पेरणी जागर, दशावतार संकल्पनेवरील काला, रामकथा ज्यातून सादर केली जाते ते रणमाले ..त्याशिवाय सामाजिक संस्कारातून आपल्यासमोर येणारा गावडा जागर, इत्यादी वैशिट्यपूर्ण आविष्कार दशावताराची आठवण करून देतात. कोकणच्या लोकपरंपरेशी याचे नाते जुळलेले आहे. हा वैभवसंपन्न वारसा आजही प्रवाही राहिलेला आहे तो केवळ लोकाश्रयाच्या माध्यमातून! ज्या गावात खेळ करायचे असतील त्या गावात जाताना ज्या वस्तू गरजेच्या असतील त्या सर्व पेटार्‍यात भरून ते पेटारे डोक्यावर घेऊनच एका गावातून दुसर्‍या गावात चालतच हे कलाकार जायचे. पेटार्‍यातील सामान उत्सव असलेल्या मंदिराजवळ उतरून मंदिरातील एखादी रिकामी जागा, शेजारील धर्मशाळा किंवा रिकामं घर नाहीतर मग कोणाच्यातरी ओसरीवर दशावतारी कलाकारांचा एका रात्रीपुरता असलेला संसार थाटला जायचा. मध्यरात्रीपर्यंत आराम करून त्यानंतर मग प्रत्यक्षात खेळ सादरीकरणाची तयारी सुरू व्हायची. जो कलाकार ज्या भूमिकेत वावरणार त्या त्याच्या भूमिकेची गरज ओळखून स्वतःच स्वतःची सर्व तयारी करायची हे तर खास वैशिष्ट्य. पूर्वी मनोरंजनाची साधने तशी अल्पच. दशावतारी नाटक, खेळ ही सर्वांसाठी मोठी पर्वणीच होती. एका बाजूला लोकमनाची श्रद्धा अढळ ठेवण्यासाठी, धार्मिक अनुबंध जुळवायचे, त्याच आत्मीयतेने खेळ अनुभवायचा…आणि ही परंपरा राखून ठेवायची. त्यासाठी रात्रीचे दिवस करायचे ..हे चित्र अजूनही दिसते. कामाचा ताण लोकमनाला तर प्रत्येक दिवशीच असतो ..पण तरीही त्यांच्याशी जुळवून घेत सणउत्सव, व्रतवैकल्ये यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी विसावा निर्माण केला. दशावतारी नाटक बघायचे तर ते मध्यरात्रीनंतर. संपूर्ण रात्र जागवायची. दुसर्‍या दिवशी परत कामाला जायचं परंतु हे काम आहे त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने करण्याची शक्ती प्राप्त व्हायची. दशावतारी नाटकातील पात्रे लोकमनाच्या श्रद्धेचाच घटक. गणपती, सरस्वतीचे नृत्य, हरदास व प्रमुख पात्रांची वेशभूषा, गणेशाच्या मुखवट्याची शेंदूर लावून केलेली पूजा आणि सोबतीला ‘जय जय पांडुरंग हरी विठ्ठल’चा नामघोष वाजवून गणपतीची मिरवणूक काढली जाते. हरदास गणपतीची आरती तसेच इतर अनेक उपहास विडंबनात्मक संवाद योजून जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा पोट धरून हसू येतं. वेळ कसा निघून जातो कळतच नाही. दशावतारात यासंबंधीचे कथानक कथन करताना ते ओव्यांच्या माध्यमातूनही आविष्कृत केले जाते. गावागावांत एक विधी म्हणून का होईना कालो आजही साजरा होतो. दशावतारी नाट्यखेळ संपल्यानंतर काला केला जातो. दशावतार या लोकनाट्याशी साम्य दाखवणारा यक्षगान हा एक कर्नाटकमधील लोकनाट्याचा प्रकार. यक्ष एक जाती व त्यावरूनच यक्षगान हे नाव रूढ झाले असावे असे सांगतात. कन्नड भाषेत यक्षीण म्हणजे जादूई विद्या अवगत असलेली व्यक्ती असे मानले जाते. त्यामुळेच यक्षणी म्हणजेच जादू किंवा मंत्र असा त्याचा अर्थ घेतला जातो. भुताची पूजा, वशीकरण, मंत्र तंत्र या सार्‍यांची पूजा यथासांग करणे म्हणजेच यक्षगान आहे असे सांगितले जाते. यक्षगान/आराधना श्रद्धेने पूजा करण्यासाठी जन्माला आलेली लोककला आहे. ती संगीत- गायन- नृत्य कलाप्रकार यामधून प्रतिबिंबित होते. कन्नडमधील नाटकांचे प्रेरणास्थान म्हणजे यक्षगान. काला, दशावतारी खेळ, यक्षगान यासारखी या मातीतील संस्कारानी परिपूर्णतेचेे लोकनाट्य म्हणजे चैतन्यमयी सृजनशील समाजमनाचा आरसा आहे. कडाक्याची थंडी सोसत अंगावर गोधडी लपेटून काल्याच्या, दशावतारी खेळाचा आनंद लुटण्यासाठी लोकांची पावले मंदिराकडे वळतात. मध्यरात्रीनंतर खेळ अनुभवताना कधी हास्याचे फवारे तर कधी करुणरसात डुंबणं होतं. देवदानवांच्या युद्धातील क्रौर्य शौर्य अंगावर शहारे आणते. करुण दृश्य डोळ्यात अश्रू निर्माण करते. पल्लेदार वाक्यरचना, पौराणिक खुणा अंगाखांद्यावर मिरविणारा भारदस्त पोषाख, निवेदक, शंकासुर भटजी आदी पात्रांच्या संवादातून होणारे मनोरंजन, लोकनाट्याची एक वेगळी दुनिया आपल्यासमोर उलगडत जाते. ‘रात्रीचा राजा आणि दिवसा कपाळावर बोजा’ असेच आयुष्यभर करावे लागणारे हे सच्चा दिलाचे कलावंत व्यवहारासाठी नसून तर कलेसाठी, कलेवरील निस्सीम श्रद्धेपोटी या पेटार्‍यांची आळवणी करताना दिसतात. गावागावांतील जत्रा यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे दशावतारी नाटक. या नाटकांमुळे जत्रेसाठी गर्दी व्हायची ती टिकूनही राहायची. पुराणातील दहा अवतारावर आधारित आख्याने विविध, कथानकांच्या माध्यमातून अभिनयाद्वारे… सर्व बाजूने खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर जेव्हा सादर केली जायची तेव्हा रात्र मंतरल्यागत व्हायची. भक्ती, नृत्य, नाट्य, शौर्य यांच्या आविष्कारामध्ये सर्वच ठासून भरले जायचे. जत्रांच्या दिवसात घरोघर भरल्यागत असायची. पूर्वी तर कंदील- पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात मंदिरातील सभामंडपात एक-दोन लाकडी बाक, एखाद-दुसरी खुर्ची एवढ्या भांडवलावर भव्यदिव्य राजवाडा, एखादी झोपडी, निबिड अरण्य, रमणीय बाग यांची दृश्ये नुसत्याच शब्दसामर्थ्यावर उभारली जायची. पडदा म्हणून थंडीपासून संरक्षणासाठी घेतलेली चादर पुरेशी होती. रंगमंच आणि रसिक यांच्यामध्ये फारसे अंतर नव्हतेच. दशावतारी मंडळीना मेकअप करताना पाहणे म्हणजे लहानग्यांचा मोठा उत्सव असायचा. घरातील मोठी माणसे जागा अडवून ठेवण्यासाठी लहान मुलांच्या हातात एखादी चादर देऊन त्याला जागा अडवून ठेवण्यासाठी पाठवायची. आपल्या आवडीच्या ठिकाणी चादर पसरवून ठेवली की ती जागा आरक्षित झाली असे मानले जायचे. नाटक उशिराने सुरू व्हायचे. जागा अडवून झाल्यानंतर पोरांचा उद्योग फक्त दशावतारी कलाकार कसे रंगतात हेच बघण्याचा असायचा. नाईक, मोचेमाडकर, पार्सेकर दशावतार नाट्यमंडळी जेव्हा अर्ध्या मेकअपमध्ये दिसायचे तेव्हा मुलांचे आपापसात होणारे बोलणे मजेशीर असायचे. तारामती ही हातात सिगरेट धरून झुरके घ्यायची. त्यानंतर प्रत्यक्षात नाटकाला सुरुवात झाल्यानंतर राजा हरिश्चंद्राचे होणारे हाल पाहून जिवाच्या आकांताने अभिनय साकारणारी तारामती प्रेक्षकांच्या हृदयाचे पाणी-पाणी करायची. कडाक्याच्या थंडीत हातात गरमागरम वाफाळलेला चहा, भजी व सोबतीला फक्कड गप्पा. नाटक सुरू होण्यापूर्वी गटागटाने चर्चा रंगायच्या. निरागस उत्सवी वातावरण होते ते. नातेवाइकांसाठी खाज्यांची पुडी द्यायची ती कागदात बांधून असायची. खणा-नारळाने साधीसुधी भरलेली ओटी देवीला पावन व्हायची. ग्रामदैवतेला दागिन्यांचा हव्यास नव्हता. आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेली पिढी आता स्वतःप्रमाणे देवदेवतांनासुद्धा श्रीमंत करायचा विचार करते.

गोव्याची भूमी ही नाट्यप्रेमी, उत्सवप्रेमींची. इथल्या लोकमानसाने सण-उत्सवांना वेगळे वैभव प्राप्त करून दिले. आपल्या धार्मिक श्रद्धेशी त्याची नाळ जुळली. त्यातील देवत्व जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तथाकथित साक्षर पिढीने त्याला अडाणी म्हणून हिणवले. असे असूनही त्यांनी आपल्या श्रद्धा जागृत ठेवल्या. यानिमित्ताने शहरी वातावरणात सरावलेला चाकरमानी जत्रेच्या निमित्ताने गावात येतो, श्रद्धा जोपासण्याचा प्रयत्न करतो. आधुनिकीकरणाच्या चक्रात सापडल्याकारणाने त्यातून सुटका करून घेणे आज कठीण झाले आहे. दुसर्‍या बाजूला त्याला इथल्या संस्कृतीला शहरी साज चढवावयाचा आहे असेही वाटते. बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव इथल्या लोकमनावर वेगाने पडत आहे. हा बदल स्पष्टपणे नजरेस पडावा असाच आहे. मानवी धार्मिक भावनांशी सुसंगत असलेल्या उत्सवाच्या मुळाचे लोकमनाने विकसित केलेले आहे. लोकसंस्कृती लोकपरंपरा शहरीकरणाच्या लाटेत घुटमळत असलेल्यांना माती, निसर्ग याविषयीचे प्रेम. श्रद्धा प्रेमाची अनुभूती बहाल करते हे लक्षात घेऊनच बदलत्या उत्सवातून आपुलकीचे बंध जतन करून ठेवायलाच हवें. निसर्गाशी, पर्यावरणाशी, संस्कृती-संस्कारांशी कृतज्ञता म्हणून लोकांनी इथल्या परंपरांचे पालन केले. रुजविले. प्रवाहित केल्या. देवत्व त्यांनी अनुभवले आणि त्यातील पावित्र्य कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच परंपरांना आलेले प्रतिष्ठितपणाचे, दिखाऊपणाचे पदर बडेजाव माजवतात. म्हणून नितळ पारदर्शी आनंदाला बर्‍याच वेळा मुकायला होते. नैसर्गिक तत्त्वाला टिकवून हे तत्त्व जपायला हवे तेव्हाच कोठे जत्रा, काला, दशावतारी नाटक खेळ यांची उंची सर्वांना कळेल. सावईवेरेची सख्या हरीची गंधपूजा, केरी फोंडा येथील विजया दुर्गाची जत्रा, शिरगावची लईराईची धोंडांची जत्रा, बोडगेश्वर, केरी पेडणेचा आजोबा, मुळगावची केळबाय पेठेची जत्रा, मयेची माल्याची जत्रा, काणकोणची रेड्यांची, टक्याची जत्रा, चेडवाची दिंड्या जत्रा, नार्वेची भुतांची जत्रा, मोरजीतील कळस उत्सव, देवकीकृष्ण माशेलची मालिनी पौर्णिमेची जत्रा तर कृषक समाजाची जत्रा म्हणूनच प्रसिद्धीस आलेली आहे. जायांची पूजा, मडकई नवदुर्गेच्या जत्रेत माशांची होणारी विक्रमी विक्री…अशा तर्‍हेने आपला हा भूभाग जत्रांच्या अभूतपूर्व वारशाने परिपूर्ण आहे. आज मंदिरांना सिमेंट कॉंक्रीटच्या, दिव्यांच्या रोशणाईने झगझगीत केलेले आहे.. खरे हा आधुनिक बदल जरी जाणवला तरीही हा बदल स्वीकारून इथल्या लोकमानसात कालो, जत्रा, दशावताराला आपल्या हृदयमंदिरात अढळपद दिलेले आहे.