काणकोण पालिकेत ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट

0
190

>> उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना धक्का

>> माजी मंत्री रमेश तवडकर यांची धूर्त खेळी

काणकोण पालिकेचे १२ ही नगरसेवक भाजपप्रणित असल्याचे उपसभापती इजिदोर ङ्गर्नांडिस यांनी जाहीर करून दोन दिवस उलटले नाही तोच १२ पैकी ७ जणांनी काणकोणचे आमदार इजिदोर ङ्गर्नांडिस यांना बाजूला ठेवून स्वतंत्र गट स्थापन केला आहे. पाळोळे वॉर्डातून मताधिक्याने निवडून आलेल्या सायमन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. चेतन देसाई आणि महादेव देसाई यांनी हा गट स्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा काणकोण पालिकेत चालू असली तरी हा गट भाजपचाच असून माजी मंत्री रमेश तवडकर यांचा या गटाला छुपा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.
या नव्या मंडळात सायमन रिबेलो, रमाकांत गावकर, गंधेश मडगावकर, लक्ष्मण पागी, नारसिस्को ङ्गर्नांडिस, अमिता पागी आणि सारा देसाई यांचा समावेश आहे. नगर्से वॉर्डाचे नगरसेवक हेमंत गावकर यांचाही या गटाला बाहेरून पाठिंबा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या नव्या घडामोडीत नगराध्यक्षपदासाठी उत्सुक असलेले धीरज ना. गावकर, शुभम कोमरपंत, नीतू देसाई, सुप्रिया देसाई आणि हेमंत गावकर यांना बाजूला ठेवायला नव्या गटाला यश आलेले आहे. नाराज झालेल्या पाच नगरसेवकांच्या गटाने २४ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तर ७ जणांच्या नव्या गटाने सकाळी १० वा. श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत एकसंध राहण्याची शपथ घेतली.

तवडकर यांचा हात असल्याची जोरदार चर्चा
या नव्या घडामोडीमुळे काणकोण पालिकेचे राजकारण एकदम बदलले असून यामागे माजी मंत्री रमेश तवडकर यांचा हात असल्याची जोरदार चर्चा आहे. देळे येथील श्री मल्लिकार्जुन चेतन महाविद्यालयाचे उपाध्यक्ष चेतन देसाई यांचाही हात असल्याची चर्चा आहे. या गटाने श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यात झालेल्या करारानुसार पहिले दीड वर्ष सायमन रिबेलो, त्यानंतरची दोन वर्षे रमाकांत गावकर आणि अखेरच्या दीड वर्षांत सारा देसाई नगराध्यक्ष असतील. पहिल्या टप्प्यात जरी किंदळे वॉर्डातून निवडून आलेल्या अमिता पागी यांना उपनगराध्यक्षाचा मान देण्यात आलेला असला तरी पालिकेचे उपनगराध्यक्ष महिलांसाठी राखीव असल्यामुळे पाच वर्षांसाठी त्याच उपनगराध्यक्षपदी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा गट स्थापण्यास आपण महत्त्वाची भूमिका केली बजावल्याचा दावा महादेव देसाई यांनी केला आहे.
दरम्यान, या नव्या घडामोडींबद्दल आपल्याला धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया धीरज गावकर यांनी व्यक्त केली. हा सगळा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असून सायमन रिबेलो यांच्या बाबतीत असा विचार कधीच मनात आला नव्हता. २३ रोजी १२ ही सदस्य आमदार इजिदोर ङ्गर्नांडिस यांनी श्रीस्थळच्या विश्रामगृहात बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित हेते. अचानक त्यांच्यात बदल कसा झाला ते समजत नसल्याचे मत श्री. गावकर यांनी व्यक्त केले. मात्र, आपला गट एकसंध असून पालिकेचा विकास हेच ध्येय समोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.