काकोड्यातील कचरा प्रकल्प १५ महिन्यांत पूर्ण करणार ः लोबो

0
286

>> उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती

काकोडा येथील कचरा प्रकल्पाचे काम पंधरा महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काकोडा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा ११ नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहे. साळगाव येथील १५० क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त १०० टन क्षमतेची यंत्रणा बसविण्याच्या कामाला सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी काल कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मागील सहा महिने या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. काकोडा येथील कचरा प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांचा निधी कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. कुंडई येथे बायो मेडिकल कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्व प्रकारचा कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळाने आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेणारे अहवाल तयार करण्यात आले आहेत असे लोबो म्हणाले.

बायंगिणी प्रकल्पाची निविदा
११ रोजी जाहीर करणार

बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाच्या बांधकामाची निविदा ११ रोजी जाहीर केली जाणार असून ठेकेदाराला बांधकामासंबंधी आदेश त्वरित जारी केला जाणार आहे. या प्रकल्पासंबंधी कंत्राटदारांची निविदा जाहीर करण्यापूर्वीची बैठक घेण्यात आली आहे.