कांद्याचे दर खाली न आणल्यास महिला कॉंग्रेस रस्त्यावर ः कुतिन्हो

0
172

कांद्याचे दर गोव्यात १२० रु. प्रती किलो असे भडकलेले असून गरिबांच्या डोळ्यांत या कांद्याने अश्रू आणलेले आहेत. मात्र, प्रमोद सावंत यांचे सरकार मात्र गरिबांना कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दिसत नसल्याचा आरोप काल महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केला. तसेच भाजप सरकारने हे दर खाली येत्या ७ दिवसांत खाली न आणल्यास महिला कॉंग्रेस या प्रश्‍नी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भाजी, डाळ, चिकन, मटण काहीही करायचे झाल्यास कांदा हा लागतोच असे सांगून जनतेने १२० रु. प्रती किलो या दराने कांदा कसा खरेदी करायचा, असा प्रश्‍न कुतिन्हो यांनी यावेळी केला. फलोद्यान महामंडळाने २० रु. प्रती किलो या दराने लोकांना कांदा उपलब्ध करून द्यावा. वरील १०० रु. सरकारने आपल्या तिजोरीतून खर्च करावेत, अशी सूचना कुतिन्हो यांनी केली.

गोव्याच्या शेजारच्या कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकत असतो, असे असताना गोव्यात कांदा सर्व राज्यांच्या तुलनेत महाग कसा? असा प्रश्‍नही त्यांनी केला. मध्य प्रदेशमध्येसुद्धा कांदा ३८ रु. प्रती किलो या दरात उपलब्ध असल्याचे त्या म्हणाल्या. कांद्याचे तसेच अन्य भाज्यांचे दरही गगनाला भिडलेले असून ते सरकारने खाली आणावेत. अन्यथा जनता भाजप सरकारला माफ करणार नसल्याचे सांगून लोक या ‘अच्छे दिना’ पेक्षा पूर्वीचे ‘बुरे दिन’च चांगले होते, असे म्हणायला लागले असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.