कांगारूंना नमवून भारत उपांत्य फेरीत

0
132

>> कार्तिक त्यागीचा भेदक मारा

>> यशस्वी जैसवाल, अथर्व अंकोलेकरची अर्धशतके

वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीच्या भेदक मार्‍याच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव करत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ४३.३ षटकांत १५९ धावांत संपला. केवळ २४ धावांत ४ बळी टिपलेला त्यागी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

विश्‍वचषकाच्या ‘अंतिम चार’ संघात स्थान मिळविण्यासाठी झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅकेंझी हार्वे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हवेत असलेल्या गारव्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता लक्षात घेत त्याने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना डावातील दहाव्या षटकात सलामीवीर दिव्यांश सक्सेनाला बाद केले. यावेळी फलकावर केवळ ३५ धावा लागल्या होत्या. संथ सुुरुवातीनंतर गडी गमावल्यामुळे भारतीय संघावर दबाव वाढला. तिसर्‍या स्थानावर उतरलेल्या तिलक वर्मा याला ऑफस्पिनर मर्फीने तंबूची वाट धरायला लावले. संघ अडचणीत असताना कर्णधार प्रियम गर्गकडून खूप अपेक्षा होती. परंतु, ‘अक्रॉस दी लाईन’ खेळण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडाला. दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने एका बाजूने किल्ला लढवताना सर्वाधिक ६२ धावांची खेळी साकारली. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर जैस्वाल बाद झाला. टीम इंडिया संकटात असताना सिद्धेश वीर आणि अथर्व अंकोलेकर यांनी डावाची धुरा हाती घेतली. सिद्धेश २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रवी बिश्‍नोईने ३० धावांची खेळी साकारत अर्थवला चांगली साथ दिली. अथर्वने ५४ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ५५ धावांची नाबाद खेळी साकारत टीम इंडियाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

भारतीय संघाने दिलेले २३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात भयावह झाली. सॅम फेनिंग मिड ऑफकडे चेंंडू ढकलून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसल्याने दुसरा सलामीवीर जेक फ्रेझर याला एकही चेंडू न खेळता धावबाद होऊन तंबूचा रस्ता धरावा लागला. त्यानंतर कार्तिक त्यागीने अफलातून गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला जोरदार हादरे दिले. हार्वेला पायचीत बाद केल्यानंतर हर्नला त्रिफळाचित बाद केले. त्यावेळी कांगारुंची अवस्था तीन बाद चार धावा अशी दयनीय झाली होती. डावातील पहिल्याच षटकात तीन गडी गमवावे लागल्यानंतर कांगारूंनी कार्तिक त्यागीच्या दुसर्‍या व डावातील तिसर्‍या षटकात डेव्हिसला गमावले. यावेळी संघाची धावसंख्या १७ झाली होती. पॅट्रिक रोव व सलामीवीर फेनिंग यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत संघाची धावसंख्या ६८ पर्यंत नेली. ही भागीदारी धोकादायक ठरत असतानाच कर्णधार गर्गने त्यागीला दुसर्‍या स्पेलसाठी बोलावले. त्यागीने दुसर्‍या स्पेलच्या पहिल्याच षटकात पॅट्रिकला माघारी धाडले.

सहाव्या गड्यासाठी स्कॉट आणि फेनिंग यांनी डावाला आकार देत ८१ धावांची भागीदारी रचली. गुगली गोलंदाज अखेर रवी बिश्‍नोईने ही जोडी फोडत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना कमाल दाखवता आली नाही. आकाश सिंगने तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
वेस्ट इंडीज व न्यूझीलंड यांच्यात सुपर लीगमधील उपांत्यपूर्व लढत आज होणार आहे.

धावफलक
भारत ः यशस्वी जैसवाल त्रि. गो. संघा ६२, दिव्यांश सक्सेना झे. रोव गो. केली १४, तिलक वर्मा झे. हार्वे गो. मर्फी २, प्रियम गर्ग त्रि. गो. सुली ५, ध्रुव जुरेल झे. रोव गो. मर्फी १५, सिद्धेश वीर झे. मर्फी गो. केली २५, अथर्व अंकोलेकर नाबाद ५५, रवी बिश्‍नोई धावबाद ३०, सुशांत मिश्रा झे. हार्वे गो. विलयन्स ४, कार्तिक त्यागी धावबाद १, आकाश सिंग नाबाद ०, अवांतर २०, एकूण ५० षटकांत ९ बाद २३३
गोलंदाजी ः मॅथ्यू विलयन्स १०-१-४१-१, कॉनर सुली १०-१-५६-१, कोरी केली १०-०-४५-२, टॉड मर्फी १०-०-४०-२, तन्वीर संघा ८-१-३९-१, ऑलिव्हर डेव्हिस २-०-५-०

ऑस्ट्रेलिया ः सॅम फेनिंग झे. जुरेल गो. आकाश ७५, जेक फ्रेझर मॅकगर्क धावबाद ०, मॅकेंझी हार्वे पायचीत गो. त्यागी ४, लाचलान हर्न त्रि. गो. त्यागी ०, ऑलिव्हर डेव्हिस झे. जैसवाल गो. त्यागी २, पॅट्रिक रोव झे. जुरेल गो. त्यागी २१, लियाम स्कॉट झे. जुरेल गो. बिश्‍नोई ३५, कॉनर सुली धावबाद ५, तन्वीर संघा नाबाद २, टॉड मर्फी त्रि. गो. आकाश ०, मॅथ्यू विलयन्स त्रि. गो. आकाश २, अवांतर १३, एकूण ४३.३ षटकांत सर्वबाद १५९
गोलंदाजी ः कार्तिक त्यागी ८-०-२४-४, सुशांत मिश्रा ६-०-२८-०, रवी बिश्‍नोई ९-०-२६-१, आकाश सिंग ८.३-०-३०-३, सिद्धेश वीर ५-०-२५-०, अथर्व अंकोलेकर ७-०-२२-०