पंतप्रधान मोदींची टीका; जम्मू-काश्मीरमध्ये 6,400 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन
जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पहिलाच दौरा संपन्न झाला. श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी 6,400 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. 1000 तरुणांना नोकरीचे पत्रही देण्यात आले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या पाच वर्षांत झालेल्या बदलांचा आढावा घेतला. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकासगंगा कशी पोहोचली? याची माहिती त्यांनी दिली. तसेच कलम 370 च्या नावावर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशातील सामान्य जनतेची कशी दिशाभूल केली, याचाही पाढा त्यांनी वाचला.
काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्ष कलम 370 च्या नावावर जम्मू-काश्मीरच्या लोकांची दिशाभूल केली. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरच्या काही राजकीय कुटुंबांनाच फायदा होत होता. आज 370 नसल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या कौशल्याचा सन्मान केला जात आहे. आज जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळत आहे. मागच्या 70 वर्षात इथल्या वाल्मिकी समुदायाला मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता. इथल्या अनुसूचित जातींना आरक्षण मिळाले नव्हते, ते आता मिळत आहे. घराणेशाही असलेल्या पक्षांनी जनतेला अनेक वर्ष अधिकारापासून वंचित ठेवले होते, असेही मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची युती खूप जुनी आहे. ‘जे अँड के’ बँकेचे दिवाळे काढण्यात घराणेशाही असलेल्या पक्षाने कोणतीही कसर सोडली नव्हती. जवळच्या लोकांना नोकरी लावणे आणि गैरव्यवहार यामुळे बँकेचे कंबरडे मोडले होते. सामान्य जनतेचे पैसे बँकेत बुडणार होते. त्यामुळे ‘जे अँड के’ बँकेला वाचविण्यासाठी आमच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. बुडण्याच्या मार्गावर असलेली ‘जे अँड के’ बँक मोदी गॅरंटीमुळे आज नफ्यात आहे, असेही मोदी म्हणाले.