Home बातम्या कशेळीचा कनकादित्य

कशेळीचा कनकादित्य

0

– लाडोजी परब

भारतात सूर्यमंदिरे फारच कमी आहेत. सौराष्ट्रात वेरावळजवळ प्रभासपट्टण येथे प्राचीन सूर्यमंदिर आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कोणार्क, ओरिसा, नेपाळ येथील सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावात ‘कनकादित्य’ मंदिर आहे. अत्यंत अद्भुत अशा या मंदिराची रचना वाखाणण्याजोगी आहे. रत्नागिरी व राजापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी सुमारे ३० कि. मी. अंतरावर हे गाव वसले आहे.

या मंदिराला उज्वल ऐतिहासिक परंपरा आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती सुमारे १ हजार वर्षांपूर्वी सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टण क्षेत्रातील सूर्यमंदिरातून आणली गेली असावी. प्रभासपट्टण हे भगवान श्रीकृष्णांचे वसतीस्थान. कशेळी गावी या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. काठेवाडातील वेरावळ बंदरातून कोणी नावाडी नाव घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच गलबतात आदित्याची मूर्ती होती. त्याचे जहाज कशेळी गावाच्या समुद्रकिनार्‍यासमोर पोचल्यावर अचानक थांबले. ते पुढेही जाईना व मागेही जाईना. त्याने अथक प्रयत्न करून पाहिले. पण जहाज जैसे थे! त्याच्या मनात आले की जहाजावर असलेल्या आदित्याच्या मूर्तीला इथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी. मग त्याने होडीतील ती मूर्ती उतरवून कशेळीच्या किनार्‍यावर आणून ठेवली. कशेळीच्या समुद्र किनार्‍यावर एक नैसर्गिक गुहा काळ्या दगडाच्या खडकात निर्माण झालेली आहे. त्या गुहेतच नावाड्याने मूर्ती आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज चालू झाले. कशेळीला मंदिरात त्या मूर्तीची स्थापना कशी झाली याचीही वेगळी आख्यायिका आहे. कशेळीला कनका नावाची सूर्योपासक राहत असे. तिला ही मूर्ती समुद्रावरील गुहेत आणून ठेवल्याचे स्वप्न पडले. स्वप्नात तिला कनकादित्याने सांगितले, ‘मी समुद्रकिनार्‍यावर येऊन राहिलो आहे. तू मला गावात नेऊन मंदिर बांध.’ कनकाने गावकर्‍यांना बोलावून ही गोष्ट सांगितली. ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता मूर्ती सापडली. त्यांनी ती समारंभपूर्वक वाजतगाजत आणली. कनकेने गावकर्‍यांच्या मदतीने मंदिर बांधून तिची स्थापना केली. मूर्ती ज्या गुहेत सापडली त्या गुहेला नंतर ‘देवाची खोली’ असे नाव पडले. पन्हाळगडचा शिलाहार राजा आषाढ शुद्ध ४ शके १११३ (२६.६.११९१) रोजी संक्रांतीच्या पर्वकाळी समुद्रस्नानाला कशेळीला आला असता कशेळी गावात दररोज १२ ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येणार्‍या खर्चासाठी त्याने कशेळीच्या गोविंद भट भागवताना हा गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट कनकादित्य मंदिरात आहे.

गोविंद भट कनकादित्याचे पुजारी होते. आजही त्यांचे भागवत कुलोत्पन्न वंशज विश्‍वस्त आहेत. या जागृत देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांना पुत्ररत्न नव्हते. म्हणून ते अस्वस्थ होते. तेव्हा कशेळीच्या भा. रा. भागवतांच्या आजोबांनी, जे नानाकडे दररोज देवपूजा करीत त्यांनी नानांना कशेळीच्या कनकादित्याला नवस बोलायला सुचविले. यथावकाश त्यांना पुत्ररत्न झाले. त्याची आठवण म्हणून नानांनी देवस्थानाला आकर्षक असा सभामंडप बांधून दिला. सभामंडप बांधल्याचा उल्लेख व नाना शंकरसेठ यांचा फोटो आजही सभामंडपात पाहावयास मिळतो. कशेळी गावाने अनेक थोर सुपुत्रांना जन्म दिला. थोर समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत, इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर, साहित्यिक वि. सी. गुर्जर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम वासुदेव भागवत, साहित्यिक वि. ह. कुलकर्णी, अच्युतराव कुळकर्णी, जगन्नाथ नाफडे अशा अनेकांचा यात समावेश आहे. या गावात १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते. वामन पोतदार, प्रा. गंगाधर गाडगीळ, मधू मंगेश कर्णिक, माधव गडकरी, बॅ. नाथ पै अशा अनेकांच्या पदस्पर्शाने कनकादित्याची भूमी पावन झाली आहे. दरवर्षी रथसप्तमीला येथील मंदिरात भव्य उत्सव रंगतो. पाच दिवस हा उत्सव चालतो. मंदिराचे विश्‍वस्त भा. ना. भागवत आडिवरे कालिकावाडीतील कालिका देवीला प्रथम या उत्सवाचे निमंत्रण देतात. आडिक्याची खोत मंडळी आपल्या सरंजामासहित वाजतगाजत देवीला घेऊन कशेळीला येतात. कशेळी ग्रामस्थ तिचे स्वागत करतात. त्या रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. चार दिवस येथे कालिका देवीचा मुक्काम असतो. कालिका देवीबरोबर आडिवर्‍याची महाकाळी देवी पाठराखीण म्हणून येते. तिचाही कशेळीला चार दिवस मुक्काम असतो. यावेळी अडिवर्‍याच्या खोत मंडळींना कशेळी देवस्थानच्या विश्‍वस्तांकडून दोन मण तांदूळ शिधा म्हणून दिला जातो. कोकणातील बहुतेक मंदिरे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सांगून जातात. काही मंदिरे तेथील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, संस्कृतीमुळे नावारूपास आली आहेत. कोकणातील कनकादित्य सूर्यमंदिर भाविकांचे आकर्षण तर आहेच पण इतिहासाची साक्ष देत पर्यटकांनाही ते खुणावतेय!