– डॉ. सोमनाथ कोमरपंत
आजच्या मराठी काव्यक्षितिजावरील गझलरचनेच्या संदर्भात विचार करताना मराठी गझल= सुरेश भट हे समीकरण अधोरेखित करावे लागते. गझलरचना हे सुरेश भट यांचे ‘मिशन’ होते. त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. गझल हे काय आहे? गझल हा एक वृत्तप्रकार आहे. तो एक काव्यप्रकार आहे; शिवाय गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या गायनप्रकाराचा समावेश होतो. पर्शियामधील या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांमुळे रुजला. ईश्वर–भक्ताचे नाते प्रियकर–प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत मांडणार्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली. त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचे उपयोजन केले. तेराव्या शतकातील सूफी संत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, खल्जी व तुघलक साम्राज्यांचा राजकवी अमीर खुसरौ यांच्यामुळे हा प्रकार कालप्रवाहात येथे रुजला. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ कुठे शोधावे? संस्कृतिसमन्वयाच्या प्रक्रियेत गझल भारतीयच झाली. विलायतेतील ‘सॉनेट’ मराठीत ‘सुनीत’ होऊन नाही का आले?
या संदर्भात विचार करताना रवींद्रनाथ आठवतात. ‘चित्तवृत्तींचे मीलन होते, तेव्हा सौंदर्याचा उद्भव होतो’ असे ते म्हणायचे. भारतीय संस्कृतीच्या भरण–पोषणप्रक्रियेत आणि अभिसरणात सूफी पंथाचे योगदान आहे असे त्यांचे मत. विशुद्ध तत्त्वज्ञान, रसप्रवणता आणि सौंदर्यभावना यांचा त्रिवेणी संगम त्यामुळे झाला. ‘‘दोन विरुद्ध वस्तूंना समन्वित करण्याच्या सतत प्रयत्नामुळे भारतवर्षाला एक मोठीच आश्चर्यजनक सामग्री मिळाली आहे. त्यामुळे भारतवर्ष अनंतालाही सान्तात पहायला शिकला आणि जीवनातील दैनंदिन तुच्छतेमध्येही अतिविशालालाही प्रत्यक्षपणे पाहण्याचा अधिकार त्याने प्राप्त करून घेतला.
ज्या ठिकाणी दोहोंची मिळणी झालेली असते त्या ठिकाणी अनंताचे अंतहीन रसरूप सर्वत्र अबाधितपणे व्यक्त होऊ लागलेले दिसून येते.’’
वाङ्मयीन अभिव्यक्तीच्या संदर्भात विचार करताना जीवनात प्रवेश करू पाहणार्या अंतःप्रवाहांचा प्रभाव, संस्कार आणि परिणाम कसा होत असतो हे रवींद्रनाथांच्या या चिंतनातील मर्मदृष्टीमधून दिसून येते.
गझल हे आता केवळ वृत्त राहिलेले नसून बदलत्या जीवनप्रवाहात ती एक वृत्ती झालेली आहे. सुरेश भट हे असेच झपाटलेले झाड होते. आणि त्यांची गझल हा त्या व्यक्तिमत्त्वाचा सहजाविष्कार होता. त्यांच्या गझलेच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना समजावून घेणे हे त्यामुळे अवश्यमेव ठरते. इथेही चरित्रक्रमापेक्षा भावसंस्कार समजून घेणे महत्त्वाचे. जडणघडण महत्त्वाची.
सुरेश भटांचे मूळ घराणे मध्य प्रदेशातील जबलपूरचे. त्यांचे वडील श्रीधरपंत भट हे कान–नाक–घसा तज्ज्ञ. विदर्भातील अमरावती शहरात ते येऊन राहिले. हा परिसर विविध जातिधर्मांच्या लोकांच्या वस्तीचा. सुरेश भटांचा जन्म रामनवमीला, १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. भोवतालच्या बहुजिनसी संस्कृतीचा त्यांच्यावर बालपणीच संस्कार झाला. त्यांची आई शांताबाई या गृहिणी आणि सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणार्या. शिवाय त्यांना लेखनाची आवड. सुरेश भटांना कवितेचे बाळकडू घरातच मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा डावा पाय पोलिओमुळे अधू झाला. आयुष्यभर काठीच्या किंवा साहाय्यकाच्या आधाराशिवाय त्यांना चालता येईनासे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या वर्गशिक्षकावर आरती रचली. १९४४ मध्ये त्यांच्यातील कवीचा जन्म झाला. १९५० पासून त्यांना काव्यलेखनात अधिक समज आली. सातत्यही त्यांनी राखले. मात्र १९४६–४७ च्या दरम्यानच्या ५०–६० कविता वैतागलेल्या मनःस्थितीत त्यांनी झुंबरलाल राठी यांच्या वाड्यातील विहिरीत टाकून दिल्या. १९५० नंतरच्या ५०–६० कवितांची वही महाविद्यालयातील एका कविसंमेलनात गहाळ झाली. संवेदनक्षम वयात त्यांच्यावर केशवसुत, तांबे आणि कुसुमाग्रज यांच्या कवितेचा प्रभाव होता. केशवसुतांकडून त्यांनी अभिव्यक्तीची धिटाई घेतली, तांब्यांकडून प्रसाद, माधुर्य आणि गेयता घेतली. कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’मधील रोमँटिसिझम आणि उत्तुंग कल्पनाविलास घेतला.
उर्दूतील गालिब, इकबाल, जिगर मुरादाबादी, फैज अहमद, फैज नासिर काजमी, कतील सिफाई आणि अहमद फराज हे त्यांचे अत्यंत आवडते कवी. कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त आशय उत्कटपणे कसा मांडावा हे संस्कार त्यांनी त्यांच्याकडून घेतले. नेहमी काव्यलेखनाबरोबर आपला मोहरा त्यांनी गझललेखनाकडे वळविला. ‘का मैफलीत गाऊ?’ ही अशा प्रकारची रचना त्यांनी १९५४ मध्ये केली. उर्दू भाषकांचा सहवास त्यांनी वाढविला. रात्ररात्र जागून मुशायरे ऐकले. अभंग जिद्दीने तो प्रवाह आत्मसात केला. त्यांचे जिवलग मित्र हाजी वली ऊर्र रहमान सिद्दिकी यांची प्रारंभकाली त्यांना साथसंगत लाभली. फार्सी, तुर्की, अरबी आणि उर्दू या चारही भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. सय्यद नईमुद्दीन यांनी त्यांना गझल समजून घेण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले. मराठीतील गझलपरंपरेचा फारसा प्रभाव सुरेश भटांवर नव्हता.
रूढ, चाकोरीबद्ध वागणे सुरेश भट यांना सुरुवातीपासून पसंत नसे. वेळोवेळी त्यांची बंडखोर वृत्ती जागृत होई. प्रस्थापितांची वाट त्यांनी कधीच चोखाळली नाही. एका परीने अवलियाचे जीवन ते जगले. अवलिया याचा कोशातील अर्थ पुण्यात्मा. त्या शब्दाच्या अन्य काही छटाही आहेत. पुण्यपुरुष– परमेश्वराच्या सतत चिंतनात मग्न असणारा… दुसरा अर्थ विद्रोही, छांदिष्ट माणूस. या संज्ञेतील सामावलेले परस्परविरोधी घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात गुण्यागोविंदाने नांदत होते. पण निस्सीम काव्यनिष्ठा हा त्यांचा स्थायी भाव होता. तो त्यांचा ध्यास होता… श्वास होता. ते जसे होते तसेच त्यांच्या काव्यातून प्रकटले. त्यांच्या कलंदर आणि मनस्वी स्वभावाचे नितळ प्रतिबिंब त्यांच्या कवितेच्या आशयातून पडलेले आहे. परमेश्वर, आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. ज्या वर्गाची सांस्कृतिक श्रेष्ठता इतरांच्या वंचितपणावर अवलंबून असते, त्या वर्गाविषयी त्यांच्या मनात घृणा होती. या आणि अशा अनेक बाबींमुळे सुरेश भट यांना सतत संघर्षमय परिस्थितीशी तोंड द्यावे लागले. त्यांची कविता त्यामुळे बहुपेडी स्वरूपाची झाली. त्यांनी आपल्या आत्मनिष्ठ कवितांमधून अंतर्यामीचा भावकोमल स्वर प्रकट केला. नितांत मधुर, शृंगारभावनेची गहिरी छटा असलेली प्रेमकविता लिहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील भ्रमनिरास झालेल्या पिढीच्या अंतरंगातील भावनाकल्लोळ सामाजिक संवेदनशीलतेने टिपला. बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दिग्गज कवींना मराठी जनमानसात ममत्वाचे आणि आदराचे स्थान मिळाले, तसेच महत्त्वाचे स्थान सुरेश भट यांनाही मिळाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जातकुळी निराळी. त्यांची शब्दकळा निराळी. पण त्यांच्या गझलरचनांना आणि गीतांना उदंड लोकप्रियता लाभली. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘रूपगंधा’ या कवितासंग्रहाने त्यांच्या प्रतिभासामर्थ्याचा आश्वासक सूर निर्माण केला. १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या संग्रहामुळे त्यांच्या कवितेचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यांच्या काव्ययशाची लखलखीत मुद्रा मराठी काव्यरसिकांसमोर आली. विशेषतः ‘मलमली तारुण्य माझे’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची’, ‘समजावुनी व्यथेला’, ‘रंग खेळतो हरी’, ‘उषःकाल होता होता’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तनमन अमृत बनतें ग’, ‘गौळण’, ‘माझीं उदास गीतें’, ‘मालवून टाक दीप’, ‘दुभंगून जातां जातां’, ‘बोल माझ्या फुला!’, ‘चांदण्यांत फिरतांना’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘कळतें रे’, ‘सजण दारी उभा’, ‘आज मी जें गीत गातों’ या कवितांमध्ये गीत आणि काव्य यांची गळामिठी पडलेली आहे.
‘रंग माझा वेगळा’ या कवितासंग्रहातील आशयसामर्थ्य आणि अभिव्यक्तिसौंदर्य यांचे आकंठपान केल्यानंतर पु. ल. देशपांडे मुक्त मनाने दाद देताना म्हणतात ः
‘‘त्या कवितेतले फुल्लेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकदही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी, तशी तिला कसलीच सक्ती नसावी.’’
त्यांच्या या मर्मस्पर्शी अभिप्रायामधून संवेदनशील आणि सहृदय आस्वादकाच्या नितळ मनाचे प्रतिबिंब पडलेले आहे. या संग्रहातील गीतगुणांविषयी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी प्रशंसोद्वार काढलेले आहेत आणि गझलरचनेविषयी म्हटलेले आहे ः
‘‘तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटू अनुभव या सार्यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींचे गझल तुम्ही मनःपूर्वक वाचले आहेत, इतकेच नव्हे तर गझलांची जी एक ‘खासियत’ असते ती तुम्ही स्वतःमध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपण आणि अंतःकरणात सलत राहिलेल्या दुःखाची जिवापाड केलेली जपणूक-’’
रसज्ञता आणि मर्मज्ञता यांचा स्वरसंगमच त्यांच्या या विधानात आढळून येतो.
‘एल्गार’ या सुरेश भटांच्या तिसर्या कवितासंग्रहात काही रचना वगळता बहुतांश गझला आहेत. ‘गझलकार’ सुरेश भटांची नवी रूपकळा या संग्रहात दिसून येते. या संग्रहाच्या ‘कैफियत’ या दीर्घ प्रस्तावनेत प्रारंभी सुरेश भटांनी गझलेच्या आकृतिबंधाविषयी विवेचन केलेले आहे. गझलरचनेत स्थिरपद झालेल्या या प्रतिभावंत कवीने एव्हाना रचनेपुरते आपले कार्य सीमित ठेवले नव्हते; महाराष्ट्रातील उदयोन्मुख पिढीला या प्रवाहात आणण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केलेले आहे. आज बिनीचे गझलकार म्हणून ज्यांना घडविण्याचे पायाभूत कार्य सुरेश भटांनी केलेले आहे, त्यांत अरुण सांगोळे, म. भा. चव्हाण, मधुसूदन नानिवडेकर, श्रीराम पचिन्द्रे, बंडू चक्रधर, नीळकंठ घोडे, संजय धामोरीकर, राजीव पांडे, प्रल्हाद सोनवणे, ल. स. रोकडे, रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर, दीपक करंदीकर, सर्वोत्तम केतकर, हेमंत डांगे, दीपमाला कुबडे, मुबारक शेख, नंदिनी पाटील, अनिल पाटील, सुभाषचंद्र वैष्णव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या सर्वांच्या वैविध्यपूर्ण रचनांमुळे मराठी गझलेचा क्षितिजविस्तार झालेला आहे. भीमराव पांचाळे यांच्यासारखे व्रतस्थ गझलकार आणि गझलनवाझ हा वृक्ष वर्धिष्णू ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.
सुरेश भटांची गझलरचनेची आदिप्रेरणा कोणती? त्यांच्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया कोणत्या प्रकारची? त्यांच्याच शब्दांत हे समजून घ्यायला हवे ः
‘‘मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले, भेटलेले, भोगलेले आणि सोसलेले अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी नुसते त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात. कधी ते दिसत नाहीत, पण अवतीभोवती त्यांची कुजबूज चालू असते. आणि कधीकधी चुकून एखादा चेहरा दिसतो. कधीकधी स्पर्शही जाणवतो. परंतु एखादे वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवांचे बारकावे घेऊन येतो तेव्हा ‘मतला’ तयार होतो. कधीकधी पहिल्या शेराची एकच ओळ तयार होते तर कधीकधी पूर्ण पहिला शेर तयार होतो.’’
गझलेमध्ये ‘दर्द’ हवा आणि तो खराखुरा हवा. जिव्हारीचे ठणकते दुःख घेऊन गझल अवतरतो. ‘जीवन तसे अपूर्णच असते माणसाचे. त्याच्या संपूर्णतेसाठी जखमा अपरिहार्यच असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत, ते जीवनही समृद्ध नाही.’ ‘माझा काव्यप्रवास म्हणजे आयुष्याशी दिलेली एक लढत आहे,’ ‘…निसर्ग ही माझी प्रेरणा नव्हतीच कधी. माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता. माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा’ या अधोरेखितांमधून सुरेश भटांची अंतःप्रेरणा हळूहळू उलगडत जाते ः
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
निराशेचा, दुःखाचा अंतःसूर येथे उत्कट शब्दांत व्यक्त झालेला आहे.
अचानक कोसळली पावसाची सर
अलगद उतरले थेंब भुईवर
इथे, तिथे, जागोजाग झाली शिंपडण
(कुण्या काळजाचे दुःख झाले अनावर?)
निसर्गानुभूतीतून सौंदर्याचा आविष्कार न करता कवीने येथे वेदनेला वाट करून दिली आहे.
कोणते नाहीत डोळे आज ओले?
आसवांनी आसवांना काय द्यावे?
देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा
येथले आषाढसुद्धा आगलावे
देशाच्या जनमानसातील विषाद येथे तीव्रतेने व्यक्त झाला आहे. तीच भावना व्यापक पातळीवर नेऊन व्यक्त करताना कवी उद्गारतो ः
हेच का स्वातंत्र्य ज्याचे गीत आम्ही गायले?
हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले?
हाच का तो सूर्य ज्याची रात्र नाही संपली?
हेच का ते प्रेत ज्याला रक्त आम्ही पाजिले?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या भ्रमनिरासाचे हे विदारक चित्र. हे प्रश्नोपनिषद आपणास अंतर्मुख करते.
**********
अशीच एक आठवण… मनात सतत रेंगाळणारी…
मे १९८५ मध्ये पुण्याच्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने परिषदेच्या सभागृहात उन्मेषशाली कवी–कवयित्रींचे गझलवाचन आणि गझलगायन झाले. दुसर्या दिवशी संध्याकाळी कविवर्य सुरेश भटांची परिषदेच्या अतिथिगृहात भेट झाली. त्यांच्याशी झालेली ती पहिलीच भेट… पण मुक्त संवाद झाला. म्हणजे ते प्रपातासारखे बोलत होते… मी नुसता ऐकत होतो… मध्येच एखादा प्रतिसादासाठी छोटा प्रश्न… गझल ही वृत्ती आहे… ती जीवनवृत्ती आहे… हे सुरेश भटांच्या एकूण आविर्भावातून जाणवत होते. काव्योर्मीची अंतर्धून त्यांच्या मनात निरंतर जागी असे. ते बोलता बोलता मधूनमधून गुणगुणायचे… ओठांच्या दुमडीतून मध्येच मुग्ध हास्य उमलायचे… हातवारे करीत असताना उजवा हात तर्जनीचा निर्देश करीत वर जायचा… त्यांची देहबोली कविपोषकच होती… एखादा कवी अष्टौप्रहर कवीच असतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते… मध्ये नर्मविनोद… मध्ये चिंतनशील भाववृत्ती… मध्येच चौकोनी चेहरा करून मराठी गझलेच्या भवितव्यतेविषयी चिंता व्यक्त करणार्या चष्मेवाल्या समीक्षकांवर डागलेली मुलुखमैदान तोफ… मन गारद करणारी… अंतर्मुखही करणारी… सर्व प्रकारच्या विचारांची, भावभावनांची आणि संवेदनांची अभिव्यक्ती करण्यास ‘गझल’ हा काव्यप्रकार समर्थ आहे असे सांगणारी त्यांची धीरगंभीर मुद्रा डोळ्यांसमोर उभी राहते.
तासाभराच्या संभाषणानंतर मिसळ खायला जाऊया अशी वर्दी त्यांनी दिली. त्यांनीच रिक्षावाल्याला बोलावले… साहित्य परिषदेकडून आम्ही निघालो. त्यांच्या चोखंदळ जिव्हेला कुठलीही मिसळ मानवणारी नव्हती… त्यांचा मेनू न्यारा होता… विशिष्ट प्रकारची झणझणीत मिसळ त्यांना हवी होती… जवळपासच्या सर्व पेठा धुंडाळून झाल्या. गुरुवार पेठ झाली… शुक्रवारपेठ झाली… मग मिसळ सापडली पुन्हा शनिवारपेठेतच… साहित्य परिषदेच्या कोपर्यावरच. मला गंमत वाटली.
चटकन विंदा करंदीकरांची ओळ आठवली– ‘तुझी–माझी धाव आहे| दांताकडून दांताकडे.’ अर्थात वेगळ्या संदर्भात!
– रिक्षातही गप्पा चाललेल्याच होत्या… शेजारी मराठी गझलचे सम्राट बसलेले… मलाही क्षणभर मी रिक्षात नसून अंतरिक्षात वावरत आहे असे स्पर्शून गेले… सत्तावीस वर्षांपूर्वीची ती अविस्मरणीय भेट… एका मनस्वी कवीची… नुकतेच सारे घडल्यासारखे वाटते!