Home बातम्या कळसा-भांडुराविरोधात आज शेतकऱ्यांची बैठक

कळसा-भांडुराविरोधात आज शेतकऱ्यांची बैठक

0

कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा आणि हलतरा पाणी प्रकल्पाच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी कर्नाटकातील पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी बुधवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता खानापूर येथील लोकमान्य सभागृहात एका सभेचे आयोजन केले आहे. कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळविण्यासाठी कळसा, भांडुरा आणि हलतरा या बंधाऱ्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. कर्नाटक सरकारने जैवसंवेदशील विभागात म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यासाठी तयारी चालविली आहे, त्याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय पातळीवर कर्नाटक सरकारने म्हादई नदीवरील धरण प्रकल्पासाठी मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असून, अर्थसंकल्पात म्हादई नदीवरील प्रकल्पासाठी निधीची तरतूद केली आहे. म्हादई नदी प्रश्नी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तरीही कर्नाटक सरकारकडून जैवसंवेदनशील विभागात धरण बांधण्याच्या प्रयत्नांना चालना देत असल्याने खानापूर तालुक्यात शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.