कळसा कालव्याच्या कामाबाबत कर्नाटक सरकारची सारवासारव

0
113

>> म्हादईप्रश्‍नी कर्नाटकाचे पत्र

म्हादई प्रश्‍नाबाबत कर्नाटक सरकारचे पत्र राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. कळसा येथे पडझड झालेल्या ढिगार्‍याचा उपसा करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आलेले नाही, असा दावा कर्नाटकाने पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्नाटक सरकारने कळसा येथे कालव्याचे बांधकाम पुन्हा सुरू केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्या सूचनेनंतर जलस्रोत खात्याच्या एका पथकाने कळसाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जलस्रोत मंत्र्यांनीही पाहणी केली होती. त्यावेळी नदीचा गोव्याच्या दिशेने येणारा स्रोत बंद करण्यासाठी बांधकाम केले जात असल्याचे आढळून आले होते.

कर्नाटकाच्या पाटबंधारे मंत्र्यांनीही कळसाला भेट देऊन पाहणी केली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांनी कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून कळसा येथे सुरू केलेले बांधकाम बंद करण्याची सूचना केली होती. मुख्य सचिवांच्या पत्राला कर्नाटक सरकारने उत्तर पाठविले आहे. कर्नाटक सरकारकडून पत्र प्राप्त झाल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दुजोरा दिला आहे.