कळतं तरी…

0
120

– राधा भावे

ताण असतो, तो लहान मुलांमध्येही असू शकतो याची जाणीव मला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला असू नयेत असं वाटतं. परंतु त्या असतात आणि अशा त्रासदायक गोष्टी नष्ट करण्यासाठी जे ठोस उपाय हवेत ते मात्र आपल्याजवळ नसतात.

कधीकधी एखादी समस्या उभी राहते. ती सोडवायची कशी हा प्रश्‍न पडतो. मनाशी वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहताना समस्या सुटेलच याची खात्री वाटत नाही. अस्वस्थता येते, आणि नुसत्या विचारांनीच जीव थकून जातो. हे असं पुन्हा-पुन्हा घडायला लागलं की आपला स्वतःवरचा विश्‍वास डळमळीत होऊ लागतो. जगण्याच्या संघर्षयात्रेत ही अवस्था अतिशय वाईट, म्हणूनच ज्यांच्या चेहर्‍यावर कायम आत्मविश्‍वास झळकत असतो. ज्यांच्या बोलण्यात तो ठासून भरलेला असतो त्यांच्याविषयी कौतुक वाटतं. अशी माणसं आसपास असली तरी धीर येतो. परंतु समाजात अशी माणसं फार थोड्या प्रमाणात दिसतात.

अत्यंत अल्पकाळ शिक्षकी पेशात असताना मी विद्यार्थ्यांचे चेहरे वाचायचे, त्यांची देहबोली समजून घ्यायचे, तेव्हा एक गोष्ट जाणवायची- पन्नास-साठ मुलांमध्ये साताठ मुलंच धीट, स्वतःवर विश्‍वास असणारी, मोकळेपणाने वावरणारी आहेत आणि राहिलेल्या बहुतांश मुलांमध्ये संकोच, भीती, कसला तरी गंड भरलेला आहे. हे भाव त्यांच्या मनावर झाकोळ आणतायत आणि त्यामुळे त्यांची मनं कायम विचलित असतात. अर्थात, हे सारं बदलण्यासाठी काय करता येईल, हे काही मला सुचत नव्हतं. मुलांना शिकण्याचा कंटाळा येऊ नये, अभ्यास ओझं वाटू नये, त्यांच्यातील सुप्त गुण जागे व्हावेत, काही नैतिक मूल्ये त्यांच्यात रुजली जावीत, आणि मुख्य म्हणजे त्यांची प्रत्येक हालचाल, वागणं, बोलणं आत्मविश्‍वासपूर्ण असावं असं सारखं वाटायचं. हे सगळं वाटे-वाटेपर्यंत माझी ती नोकरीच संपुष्टात आली आणि एकूणच मुलांविषयीच्या माझ्या कळवळीच्या भृणूचा माझ्याही नकळत मृत्यू झाला.

आता खूप वर्षांनंतर अधे-मधे माझ्या मुलांच्या किंवा दोस्तमंडळीच्या तोंडून ‘मला खूप टेन्शन आलंय’ असं विधान ऐकताना तीच जुनी कळकळ जागी होते. ‘नाही नाही, इतक्या लहान मुलांना असे ताणतणाव असता नयेत रे बाबा’ असं वाटून जातं. लहानपणी आम्ही कधी ‘कंटाळा आला’ म्हटलं की कायम कामात व्यग्र असणारी आमची काकी आम्हाला लगेच म्हणायची, ‘कंटाळा? कुठं असतो तो? कसा दिसतो? दाखव बघू मला.’ नेमकं असंच बोलावंसं वाटतं- ‘ताण? कुठं असतो तो? कसा दिसतो? दाखव बघू मला.’ परंतु एक खरं, कंटाळा नसतोच अशी ठाम समजूत असणारी काकी ज्या आत्मविश्‍वासाने आम्हाला प्रश्‍न करायची, तसा विश्‍वास मला माझ्यात जाणवला नाही. ताण असतो, तो लहान मुलांमध्येही असू शकतो याची जाणीव मला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला असू नयेत असं वाटतं. परंतु त्या असतात आणि अशा त्रासदायक गोष्टी नष्ट करण्यासाठी जे ठोस उपाय हवेत ते मात्र आपल्याजवळ नसतात.

खरं तर समस्या, ताण निर्माणच होणार नाहीत याकडे आपल्या सर्वांचे लक्ष हवे. हो, सर्वांचेच हवे. अमुक-अमुक गोष्टी मला भेडसावू नयेत असं वाटण्यापेक्षा त्या कुणालाच भेडसावू नयेत असा वाटायला हवं. लहान मुलांच्या बाबतीत तर ते मूल आपलं का दुसर्‍याचं या तपशिलापेक्षा- भीती कशाची वाटते, टेन्शन नेमकं कशाचं येतं याचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं आहे. ‘तू घाबरता नयेस, टेन्शन घेता नयेस’- हे दरडावून सांगण्यात काहीच अर्थ नाही. हे म्हणजे प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन पण सुरू ठेवायचे आणि त्यांच्या वापरावर बंदी पण घालायची यासारखे झाले. ताण नावाच्या विषाणूची लागण आताशा सर्व थरांतील अन् सर्व वयांतील माणसांमध्ये झालेली दिसते. प्रश्‍न, समस्या, त्यांची न सापडणारी उत्तरे, हतबलता, अनेक अप्रिय गोष्टींचा मारा, ही एक प्रकारची दलदल आहे. आणि आपण सारेच तिच्यात रूतत चाललोत.

या सार्‍यातून बाहेर पडायचा मंत्र तरी कोणता?- हा सर्वानाच सतावणारा प्रश्‍न आहे. मला अनेकदा वाटतं, आपण सर्वांनीच स्वतःभोवतीची कुंपणं तोडून टाकली पाहिजेत. आपल्या समस्येचं उत्तर आपल्या भोवतीच्या कुणाजवळ असू शकतं, याची जाणीव ठेवून एकमेकांशी जोडलं जाणं, एकमेकांची सोबत करणं सुरू केलं तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. समस्यांच्या निर्मितीवरही आळा बसू शकतो. अनेकदा संकटं वैयक्तिक स्वरुपाची किंवा एखाद्या कुटुंबावर आघात करणारी असतात. परंतु ती व्यक्ती आपल्याच मानवसमूहाचा भाग आहे याचं भान भोवतीच्या लोकांनी ठेवलं तर केवळ कोरडी, औपचारिक सहानुभूती दाखवून बाजूला होण्याची आपली सवय सुटू शकते. ‘आम्ही तुझ्याबरोबर आहोत’- ही केवळ बोलण्याची गोष्ट न राहता, ती कृतीत उतरली पाहिजे. मग त्या व्यक्तीचं समस्येच्या वावटळीला टक्कर देण्याचं बळ अनेक पटीने वाढू शकतं.

दुसरं असंही आहे की, कुठलाही प्रश्‍न, कुठलीही समस्या ही कायमस्वरुपी नसते. अगदी कुठलंच उत्तर नाही सापडलं तर काळ नावाचं औषध तिची तीव्रता कमी करण्याचं काम करतं हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही समस्येबाबत धीरानं घेणं, तिला शांतपणे सामोरं जाणं हा एक तिचं गांभीर्य कमी करू शकणारा उत्तम उपाय आहे. हे बाळकडू आपल्याला लहानपणीच मिळणं आवश्यक आहे. समस्येचं स्वरूप पाहिलं की अनेकवेळा लक्षात येतं, ती आपण निर्माण केलेली नसते, आपल्यामुळे तिची तीव्रता वाढलेली नसते, तिचं मूळ कुठंतरी दुसर्‍याच ठिकाणी असावं. केवळ ती आपल्या वाट्याला आलीय म्हणून स्वतःला दोषी मानण्यातही अर्थ नसतो. उद्या, परवा किंवा अजून काही काळानंतर तिच्या निराकरणाचा उपाय सापडणारच आहे हे निश्‍चित, ही श्रद्धा, हा विश्‍वास आपल्यात रुजला गेला पाहिजे. अस्वस्थ होऊन आपल्या जीवनातील ‘आज’ नासवणं योग्य नाही, हे भान आपण मनामध्ये जागं ठेवलं पाहिजे. ‘आत्मविश्‍वास’ एकमेकांच्या मनातील आस्था आणि श्रद्धेच्या आधाराने उभा राहू शकतो.

अर्थात ही गोष्ट बर्‍याच लोकांना कळत असते; परंतु तिला ‘वळतं’ करणं फार थोड्या लोकांना जमतं… आणि आज नेमकी हीच गोष्ट करणं आवश्यक आहे. ‘कळत पण वळत नाही’ अशांची संख्या कमी करणे आणि जे कळतं ते अंगिकारण्याची तत्परता आणि हिंमत असणार्‍यांची फौज वाढवणे आवश्यक आहे.