कळंगुट समुद्रात अकोल्याचे ५ पर्यटक बुडाले

0
98

>> तिघांचा बुडून मृत्यू, दोघे बेपत्ता

>> मृतांत एक पोलीस कॉन्स्टेबल

कळंगुट येथील समुद्र किनार्‍यावर काल सकाळी ६ च्या सुमारास अकोला, महाराष्ट्र येथील पाच पर्यटक युवक बुडाले. त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला असून दोघेजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेह मिळाले असून दोघांचा शोध सुरू आहे. मृतांपैकी प्रीतेश नंदगवळी हा महाराष्ट्र पोलीस खात्यात शिपाई म्हणून कार्यरत होता.

समुद्रात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. प्रीतेश लंकेश्वर नंदगवळी (वय ३२ वर्षे), चेतन लंकेश्वर नंदगवळी (वय २७ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. प्रीतेश नंदगवळी हा महाराष्ट्र पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होता. उज्ज्वल प्रकाश वाकोडे (वय २५ वर्ष) असे अन्य मृताचे नाव आहे. तर, किरण ओमप्रकाश म्हस्के आणि शुभम गजानन वैद्य यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वरील सर्वजण मोठी उमरी, विठठ्लनगर, अकोला, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत.
कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील १४ जणांचा गट रेल्वेने गोव्यात पर्यटनासाठी काल पहाटे साडेचार वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाला. मडगाव रेल्वे स्टेशनवरून ते टॅक्सीने कळंगुट समुद्र किनार्‍यावर आले. कळंगुट येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजवळ टॅक्सीतून उतरताच समोरचा विहंगम समुद्रकिनारा पाहून सर्वजण सरळ समुद्रात आंघोळीसाठी उतरले व समुद्रस्नानाचा आनंद लुटू लागले. मात्र, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण समुद्रात ओढले गेले. यावेळी नऊ तरुणांनी कसाबसा किनारा गाठला. मात्र, इतर पाच जण समुद्रात बुडाले. पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान दुर्घटना घडल्याने किनार्‍यावर लोकांची फारशी वर्दळ नव्हती. मात्र, स्थानिक, पोलीस तसेच दृष्टी या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ समुद्रावर धाव घेऊन सुरुवातीला तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. केवळ २० मिनिटांनी घटनास्थळापासून जवळच तिघांचे मृतदेह सापडले आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता किरण ओमप्रकाश मस्के व शुभम गजानन वैद्य यांचे मृतदेह सापडू शकले नव्हते. बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडताच जवळच असलेल्या ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी मृत झाल्याचे जाहीर केल्याने शवचिकित्सा करण्यासाठी त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले.

कारवर माड कोसळून वास्कोत महिला ठार
सांत जासिंतो बेटाजवळ झरीत, सांकवाळ येथे एका अल्टो कारवर माड कोसळून शांताबाई नाईक ही ७५ वर्षांची वृद्ध महिला ठार झाली. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई आपले जावई व मुलीसोबत जीए ०६ – डी – ९०२२ क्रमांकाच्या अल्टो कारने वास्कोहून शिरगावला जात होती. त्यांची कार झरीत, सांकवाळ येथे सांत जासिंतो बेटाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पोचली असता चालत्या कारवर अचानक माड कोसळला. माड गाडीच्या मागच्या बाजूने कोसळला. त्यामुळे पाठीमागच्या सीटवर बसलेल्या शांताबाई गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने चिखली कुटीर रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शांताबाई नाईक सावर्डेकर या मूळ सावर्डे येथील असून त्या वास्को येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. काल संध्याकाळी त्या जावई व मुलीसोबत कारने शिरगावला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.