शनिवारी कळंगुट येथे तिवायवाडा भागात झालेल्या खून प्रकरणातील राजभर रामदर्शनभाई (20, रा. सुरत) या युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित कोमल बारास्कर (28, रा. मध्य प्रदेश) याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलीस इतर दोन्ही संशयितांच्या शोधात आहेत.
कॅसिनोत कथित वाद झाल्यानंतर हा थरार घडला. संशयितांनेी राजभरचा गेस्ट हाऊसमधून पाठलाग करत गेस्टहाऊस समोरील रिसॉर्टचा स्विमिंग पूल गाठला. तिथे त्याच्यावर चाकूने सपासप वार केले, यात राजभरचा जागीच मृत्यू झाला.
कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित कोमल बारास्कर या संशयिताला शनिवारीच ताब्यात घेऊन अटक केली होती. तसेच यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केला.
पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीच्या सट्टेबाजीतील सहभागाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अन्य 14 जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली होती. काल त्यांना बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, भविष्यात अशा कृत्यांत सामील न होण्याची ताकीद देण्यात आली.