कल्याणकारी योजनांचे सर्वेक्षण जीईएलकडे

0
96

महिला आणि बाल कल्याण खात्याच्या गृहआधार, लाडली लक्ष्मी या मुख्य योजनांच्या लाभार्थींचे सर्वेक्षण गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) कडे सोपवण्याचा निर्णय काल एका बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे, महिला व बालकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याची घोषणा गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. तीन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी गृह आधार योजनेचा लाभ घेणे बंद करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले होते.

गेल्या काही महिन्यात जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे आर्थिक साहाय्य बंद करण्यासाठी खात्याकडे अर्ज येत आहेत. जीईएलकडून या योजनेच्या लाभार्थींचे पुढील महिन्यापासून सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गृह आधार योजनेखाली १ लाख ५२ हजार महिलांना प्रति महिना १५०० रुपये मानधन दिले जात आहे. या योजनेसाठी वीस हजार अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने लाभार्थींची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी कॅपिंग घातले आहे. त्यामुळे नवीन अर्जांना मंजुरी दिली जाऊ शकत नाही. उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या गृहिणींचे मानधन बंद करून नवीन लाभार्थींना मानधन सुरू करण्यात येत आहे. तसेच लाडली लक्ष्मी योजनेखाली १ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जात आहे. लाडली लक्ष्मी योजनेचा आत्तापर्यंत ५२ हजार जणांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. साधारण १० हजार अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.