कला अकादमीची वास्तू पाडणार नाही

0
116

>> मंत्री गोविंद गावडे यांचे स्पष्टीकरण

कला अकादमीची वास्तू पाडण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. समाज माध्यमांवरील त्यासंबंधीच्या अफवांवर जनतेने विश्‍वास ठेवू नये, असे कला अकादमीचे अध्यक्ष व कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल स्पष्ट केले.
कला अकादमीची वास्तू पाडण्यात येणार आहे असे मी कुठे म्हटले होते, ते कुणीही पुराव्यासह सिद्ध करावे, असे आव्हानही गावडे यांनी यावेळी दिले. यासंदर्भात पत्रकारांनी गावडे यांना छेडले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, की कला अकादमीची वास्तू जुनी झालेली आहे. तिची डागडुजी करण्याची गरज आहे, असा अहवाल गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कला अकादमीच्या वास्तूचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ तयार करण्याची सूचना गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाला केली आहे आणि जीएसआयडीसीने त्यासाठी निविदा काढली आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.

८ सप्टेंबरपर्यंत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल हाती येणार आहे. त्यानंतर कला अकादमीच्या वास्तूची दुरुस्ती करायची की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. या इमारतीचे कॉंक्रिट किती बळकट आहे, ते पाहण्यासाठी कोऊर टेस्ट करण्यात येईल. त्याशिवाय कॉंक्रिटची कार्बोनेशन चाचणीही करण्यात येईल. तसेच या इमारतीचा पाया किती बळकट आहे, हे पाहण्यासाठी ‘स्टिल्ट’चीही चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती गावडे यांनी यावेळी दिली. हे काम पारदर्शक रितीने केले जाणार आहे. या संदर्भात कुणालाही काहीही सांगायचे असेल अथवा सूचना करायची असेल तर आपण ऐकून घेण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.

सुदिन ढवळीकरांमुळे रस्त्यांची दुर्दशा
राज्यभरातील रस्त्यांची सध्या जी दुर्दशा झालेली आहे तिला तसेच पणजी-मडगाव महामार्गावर रोजच्या ‘मेगा ब्लॉक’ला साबांखाचे माजी मंत्री सुदिन ढवळीकर हे जबाबदार आहेत, असा आरोप यावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी केला.

भाजी विक्रेत्यांना इशारा
पुराचे कारण पुढे करून कुणालाही अव्वाच्या सव्वा दरात भाजीची विक्री करू दिली जाणार नाही, असा इशाराही मंत्री गोविंद गावडे यांनी दिला आहेे.