कर्मसंस्कार

0
28

(योगसाधना- 611, अंतरंगयोग- 196)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक आत्मा अनेक ऋणे घेऊन येतो व जातो- देव, पितृ, ऋषी, संस्कृती, राष्ट्र… या ऋणांतून मुक्त होणे शक्य नाही. पण त्या सर्वांची आठवण कृतज्ञतापूर्वक करणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे, सार्शक आहे.

आपला भारत देश पूर्वी प्रत्येक क्षेत्रात अत्यंत प्रगत होता- कला, शास्त्र, विज्ञान वगैरे. अध्यात्म, तत्त्वज्ञान यामध्ये अनेक ज्ञानी व्यक्ती होत्या. याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीची शास्त्रशुद्ध आश्रमव्यवस्था- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम.

वयाच्या सहाव्या वर्षी मुंज करत असत व तद्नंतर लगेच ऋषीच्या आश्रमात ज्ञानप्राप्तीसाठी जात असत. प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे विविध विषयांचे शिक्षण त्यांना मिळत असे. त्यांत अध्यात्मशास्त्र हादेखील प्रमुख विषय असे. हल्लीच्या शिक्षणपद्धतीत अध्यात्माला गौण स्थान आहे. तेव्हा संस्कारांना फार महत्त्व असे.
खरे म्हणजे संस्कार गर्भावस्थेतच सुरू होत असत. एक गोष्ट सर्वांना माहीत असे की गर्भावस्थेतील आत्म्याने या शरीरात येण्यापूर्वी अनेक जन्म घेतलेले आहेत. त्यामुळे इतर जन्मांचे संस्कार घेऊनच मूल जन्माला येणार. त्यामुळे अर्भकाच्या संस्कारांबद्दल काहीच माहिती नसते. त्याच्या पूर्वीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा प्रभाव असल्यामुळे त्याचे संस्कार ठरलेले असतात.

मानवी जीवनात शरीर-मन-बुद्धी ही तीन महत्त्वाची अंगे सर्वांना माहीत आहेत. पण पूर्वकाळी आत्म्यालादेखील जास्त महत्त्व होते. भारतातील विविध कर्मकांडांत ‘दर्शन’ होते. त्यातील प्रमुख म्हणजे श्राद्ध. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्षाचा पंधरवडा श्राद्धपक्ष अथवा पितृपक्ष संबोधला जातो.
श्रद्धया यत्‌‍ क्रियते तत्‌‍।

  • श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाते ते कर्मकांड. आपल्या पूर्वजांच्या स्मरण-तर्पणाचे हे दिवस. ज्या पूर्वजांनी आमचे जीवन सुखी व्हावे म्हणून कष्ट घेतले, रक्ताचे पाणी केले, त्यांची भावपूर्ण व प्रेमपूर्ण विचारांनी आठवण करणे. गेलेले पूर्वज कुठल्याही योनीत, स्थितीत असतील त्यांचीं आठवण करून त्यांना पिंडदान करायचे असते, तर्पण करायचे असते, म्हणजे तृप्त, संतुष्ट करायचे असते.

आता तो आत्मा कुठे आहे ते कुणालाही माहीत नसते. पण ज्यावेळी ती व्यक्ती आपल्या संसारात होती त्यावेळी आपल्यातील प्रत्येकाचा त्या व्यक्तीशी संबंध होता आणि कुटुंब म्हटले की बरे-वाईट प्रसंग येतच असतात. काही कारणांमुळे जर संबंध बिघडलेले असतील तर कर्मसिद्धांताप्रमाणे ते संस्कार आत्म्याबरोबर जातात. त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याला पुनर्जन्म मिळतो. कदाचित त्या आत्म्यांची केव्हातरी पुनर्भेट होऊ शकते. पण वेगळ्या नात्यात, वेगळ्या वेशात. त्यावेळी कर्मसिद्धांताप्रमाणे त्यांचे एकमेकांकडील व्यवहार असू शकतात. त्यामुळे जर कुठल्याही जन्मात आपल्या व्यवहारात चूक झालेली असेल तर ‘श्राद्ध’ करताना आम्हाला चांगली संधी आहे- माफी मागण्याची तसेच त्या आत्म्याची काही चूक झालेली असेल कळत-नकळत तर यावेळी त्याला क्षमा करण्याचीदेखील संधी असते. मन-हृदयापासून जर माफी मागितली व क्षमा केली तर भगवंत त्या आत्म्यांचा हिशेब निकालात काढतो.

त्यामुळे श्राद्धविधी चालवणारा पंडित/पुरोहित पूर्वीच्या पिढीतील दिवंगत सर्वांची नावे घेतो- आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, पती-पत्नी-मुले, काका-काकी, मामा-मावशी, आते, त्यांचे पती, भावंडे (सर्व)… तसेच पणजोबा… अशी तीन-चार पिढ्यांपर्यंत नावे घेऊन त्यांच्याकडे माफी मागायला सांगतो. ही विधी वर्षातून एकदा असते- शेवटी मृत्यू पावलेल्याच्या तिथीप्रमाणे. गोव्यात त्याला ‘म्हाळ’ म्हणतात. त्याशिवाय जवळच्या नातेवाइकांचे वर्षश्राद्धदेखील पाळले जाते. त्यावेळीदेखील हाच विधी केला जातो- पिंडदानाचा.
अनेक व्यक्ती श्राद्धाच्या दिवशी अन्नदान करतात- मंदिरांत, वृद्धाश्रमांत, अनाथश्रमांत वगैरे. आता तर अनेक स्वयंसेवाभावी संस्था विविध रोग्यांसाठी कार्य करतात- कर्करोगी, दुःख परिहारक संस्था (पॅलिएटिव्ह केअर), स्मृतिभ्रंश… त्याशिवाय गोशाळादेखील अनेक आहेत. ही प्रथा खरेच पुण्यदायक आहे. या सर्वांचे आशीर्वाद कुटुंबाला लाभतात- जिवंत आहेत त्यांना व दिवंगत झालेल्यांना. गर्भवती स्त्रीच्या संदर्भात म्हणूनच गर्भसंस्कारांमध्ये असे तत्त्वज्ञान आहे.

शास्त्रकार पुढे जाऊन असेही सांगतात की क्षमा करण्याचे व माफी मागण्याचे काम वर्षातून एकदा करायचेच पण दर रात्री झोपण्याच्या आधीदेखील भगवंताकडे तशी प्रार्थना करायची. फक्त कर्मकांडात्मक नव्हे तर घडल्या घटनेचा पश्चात्ताप करीत.
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा।
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्‌‍।
विहितमविहितं वा सर्वमेतत्‌‍ क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो॥

  • हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन यांद्वारे कळत-नकळत जे योग्य-अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांसाठी हे करुणासागर महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार असो.
    मन-हृदयापासून ही प्रार्थना म्हणायची असते. त्याचप्रमाणे आज चुका-अपराध करून परत ती चूक करता कामा नये. पण चुकून घडली तरी परत माफी मागायची. तसेच लक्षात ठेवायचे की, ही सवलत नियमित, दररोज घेऊ शकत नाही.

सारांश एवढाच की, कळत-नकळत घडलेल्या कर्माचा हिशेब चुकून करायचा. व्यापारी व्यक्तींना ही गोष्ट चांगली समजेल- 31 मार्च रोजी हिशेब चुकता करायचा म्हणजे नववर्षी 1 एप्रिल रोजी कर्माची वही साफ असेल.
शास्त्रशुद्ध अध्यात्मशास्त्रात हे सगळे ज्ञान दिले जाते. आजच्या कलियुगात अशा विचारांची फार गरज आहे. कारण आज मानवाला आवश्यक असलेले सद्गुण- प्रेम, नम्रता, सेवा, समर्पण, निःस्वार्थीपणा, निरपेक्षता, कृतज्ञता कमी झालेले दिसतात. हे सर्व सकारात्मक आहेत. त्याऐवजी स्वार्थ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, द्वेष, सूडबुद्धी… हे नकारात्मक दुर्गुण वाढलेले दिसतात. कुटुंबात, समाजात त्यामुळे सर्वत्र क्लेश, दुःख, असमाधान दिसते. तसेच नैराश्य वाढले आहे. आत्महत्या, घटस्फोट वाढत आहेत.

सुशिक्षित समाजाला हे भूषणावह नाही. माणूस म्हणजेच कृतज्ञता. आज कृतघ्नता जास्त दिसते. ‘श्राद्ध’ म्हणजे कृतज्ञपूर्वक पितरांचे स्मरण, त्याचबरोबर कुुटंबातील सलोख्याचे संबंध अपेक्षित आहेत. ते नाहीत म्हणून वृद्धाश्रमांची गरज भासते आहे. अपवादात्मक वृद्धाश्रमांत काहीवेळा परिस्थितीमुळे राहावे लागते ती गोष्ट वेगळी.

शास्त्रकार म्हणतात-
ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नव्रते तथा।
निष्कृतिर्विहिता लोके कृतघ्ने नास्ति निस्कृतिः॥

  • ब्रह्महत्या, सुरापान, चोरी तसाच व्रतभंग या सर्व पापांना प्रायश्चित्त आहे, पण कृतघ्नतेला कोणतेच प्रायश्चित्त नाही. अशा पापांतून आपण मुक्त व्हावे म्हणून ऋषींनी श्राद्ध हा विधी सांगितला.
    प्रत्येक आत्मा अनेक ऋणे घेऊन येतो व जातो- देव, पितृ, ऋषी, संस्कृती, राष्ट्र… या ऋणांतून मुक्त होणे शक्य नाही. पण त्या सर्वांची आठवण कृतज्ञतापूर्वक करणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे, सार्शक आहे.
    आज धकाधकीच्या जीवनाचे निमित्त देऊन आपण या अशा आध्यात्मिक गोष्टी टाळतो. निमित्त देतो- ‘वेळ नाही!’ पण त्याचबरोबर नवीन कार्यक्रम व्यवस्थित करतो- साखरपुडा, मेहंदी, रिसेप्शन, पार्ट्या, विविध वाढदिवस- वर्षाचा, लग्नाचा, साठावा, पंच्याहत्तरावा, नव्वदावा, शंभरावा… कृतज्ञतापूर्वक हे वाढदिवस साजरे केले तर त्यात वावगे काही नाही. पण मजेसाठी केले तर त्याला अर्थ नाही. या सर्वांत प्रेम व भाव अपेक्षित आहे.