>> चार कोटी कर्मचार्यांना फटका
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजात यंदा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात घट करण्यात आली असून या वर्षी ८.६५ टक्के व्याज दर दिला जाणार असल्याने जवळजवळ चार कोटी कर्मचार्यांना त्याची झळ बसणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.
भविष्य निर्वाह निधीत रक्कम भरणा होणार्या कर्मचार्यांना गतवर्षी म्हणजे २०१५-१६ मध्ये ८.८ टक्का व्याज दिले गेले होते. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठीचा भविष्य निर्वाह निधी हा मोठा आधार मानला जात असल्याने त्याच्या व्याज दरात झालेल्या कपातीचा फटका कर्मचार्यांना बसणार आहे. दरमहा वेतनातील १२ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होत असते. तेवढ्याच रकमेचे योगदान मालकाला द्यावे लागते.
बँकांच्या मुदत ठेवी आणि अल्पबचत ठेवींवरील व्याजदर घटले असल्याने भविष्य निर्वाह निधीचा व्याज दरही घटवण्यात आला आहे. मुदत ठेवींवरील व्याजही दर आणखी खाली आणला जाण्याची शक्यता आहे.
सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र व सुकन्या समृद्धी योजना आदींवरील व्याजदर यापूर्वीच कमी केलेले आहेत.
एप्रिल २०१६ पासून सरकारने बचत ठेवींवरील व्याज दराचा तर तिमाहीस आढावा घेऊन फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी त्यात दरवर्षी फेरबदल केले जात असत.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर यंदा डिसेंबरच्या तिमाहीस ८ टक्का व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पंचवार्षिक बचत योजनेवरील व पंचवार्षिक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांवरील व्याजही अनुक्रमे ८.५ टक्का व ८ टक्का असे खाली आणले गेले आहे.