कर्नाटक विधानसभेत तीन भाजप मंत्री मोबाईलवर ब्लू फिल्म पाहताना आढळल्याच्या प्रकरणानंतर भाजपने आपल्या आमदारांसाठी नैतिकता व शिस्त शिकविण्यासाठी प्रशिक्षण सत्र घेण्याचे ठरविले आहे.
‘कृष्णा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत आमदारांना धडे देण्यासाठी दि. २४ व दि. २५ फेब्रुवारीला ‘चिंतन-मंथन’ बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष के. एस. इश्वरप्पा यांनी सांगितले.
कर्नाटक भाजप सरकारमधील महिला व बालविकास मंत्र्यांसह एकूण तीन मंत्री सभागृहात मोबाईलवर अश्लील चित्रफित पाहताना दूरचित्रवाणीवर दाखविण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. भाजपने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगितले होते. आता याप्रकरणाची चौकशी सभापतींच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती करीत असून त्याचा अहवाल आल्यावर या मंत्र्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष इश्वरप्पा म्हणाले.
कर्नाटकात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून नवनवीन समस्या सरकारसमोर उभ्या राहताना दिसत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.