कर्नाटकातील अपघातात पेडण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

0
32

बिजापूर-कर्नाटक येथे झालेल्या वाहन अपघातात बाजारपेठ-पेडणे येथील एका दाम्पत्याचा काल मृत्यू झाला. विशाल संगराज बोंद्रे (३१) व वर्षा विशाल बोंद्रे (२६) अशी मृतांची नावे आहेत. हैद्राबाद येथून गोव्यात परतताना काळाने घाला घातल्याने दोघांना जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळावर कार्गो स्कॅनर म्हणून निवड झालेल्या दिशा कांबळी ही हैद्राबाद येथे प्रशिक्षणासाठी गेली होती. तिची विचारपूस करण्यासाठी आणि तिला पाहण्यासाठी दिशा हिची आई, बहीण साईली, भावोजी विशाल बोंद्रे, बहीण वर्षा बोंद्रे, त्यांची दहा वर्षांची एक मुलगी, शेजारील एक महिला व तिचा मुलगा आणि वाहनचालक असे हैदराबादला मंगळवारी गेले होते.

हैद्राबाद येथून काल सर्वजण गोव्यात परतत असताना बिजापूर येथेे पोचले असता चालकाचा कारवरील ताबा गेल्याने वाहन उलटले आणि त्यात वर्षा व विशाल यांचा मृत्यू झाला. या अपघातात दिशा हिच्या आईला गंभीर, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली. बिजापूर पोलिसांनी पेडण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्याशी संपर्क साधत अपघाताची माहिती दिली.