द्रौपदी मुर्मू प्रचारासाठी १४ जुलै रोजी गोव्यात

0
14

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू येत्या दि. १४ जुलै रोजी प्रचारासाठी गोव्यात येणार आहेत. द्रौपदी मुर्मू राज्यातील आमदारांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती, क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली.

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यास आदिवासी समाजातील राष्ट्रपती होणार्‍या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजातील व्यक्तीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे, असे गावडे यांनी सांगितले.

भाजपच्या एसटी मोर्चातर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या जीवन कार्याची माहिती राज्यातील समाज बांधवांना देण्यासाठी येत्या १३ जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. द्रौपदी मुर्मू यांनी अनेक संकटावर मात करून जीवनात यश संपादन केले आहे. त्यांचे जीवनचरित्र इतरांसाठी आदर्श ठरू शकते, असेही गावडे यांनी सांगितले.