कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सोलापूर, अक्कलकोटवरही दावा

0
7

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नड भाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेला सोलापूर व अक्कलकोटवासीयांनी कडाडून विरोध करत बोम्मई यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे. बोम्मई यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अक्कलकोटमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक व पत्रकारांनी रस्त्यावर उतरून बोम्मई यांच्या निषेधार्थ घोषणा देत महाराष्ट्राचा जयजयकार केला.

सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकाला जोडण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली असली तरी त्यांचे हे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. त्यांनी हे स्वप्न पाहूही नये, अशा शब्दात अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बोम्मई यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान, जत तालुक्यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. बोमय्या यांनी मंगळवारी केला होता. मात्र, या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. पण आम्ही सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडून बेळगाव-कारवार-निपाणीसह आमची गावे मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.