कर्करुग्णांच्या उपचार खर्चाबाबत आघाडीच्या इस्पितळांशी करार करणार

0
120

गोवा विधानसभेत आमदारांनी काल राज्यातील वाढत्या कर्करोग रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. सरकार राज्यातील वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येबाबत गंभीर आहे. कॅन्सरचे वेळीच निदान आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. तसेच कॅन्सर रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी मुंबई, बंगलोर येथील आघाडीच्या कॅन्सर हॉस्पिटलाशी समझौता करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये गोमंतकीय कॅन्सर रुग्णांना भेडसावणारी आर्थिक समस्या सोडविण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यावर विचार केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सभागृहात दिली.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यात कॅन्सर रुग्णांबाबत प्रश्‍न विचारला. राज्यात दरवर्षी एक हजार कॅन्सर रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. कॅन्सरच्या वाढत्या संख्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. कॅन्सर रुग्णांना थेरपीसाठी आवश्यक अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी केली. तर, राज्यात कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येचा अभ्यास करून कारणे शोधण्याची गरज आहे, असे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.

बांबोळी येथे गोवा वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णासाठी खास विभाग सुरू करण्यात आला असून कॅन्सर सेंटरच्या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. केंद्र सरकारचे या केंद्रासाठी आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

राज्यात कॅन्सरच्या निदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने नवनवीन प्रकारचे कॅन्सर रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात स्तन, डोके आणि मान कॅन्सर रुग्णांची संख्या जास्त आहे. कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देशातील आघाडीवरील कॅन्सर हॉस्पिटलाशी मदत घेतली जाणार आहे. मुंबई येथील टाटा हॉस्पिटमध्ये जाणार्‍या रुग्णांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाटा हॉस्पिटल रुग्णांना बिल भरण्यासाठी क्रेडिट सुविधा देत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी कोर्पस ङ्गंडची तरतूद करण्याबाबत विचार केला जाणार आहे. कॅन्सरच्या जागृती व निदानासाठी तालुका निहाय शिबिरे घेतली जात आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.