कमी वजनाच्या गॅस सिलिंडरांमुळे ग्राहकांत अस्वस्थता

0
8

>> परप्रांतीय वितरण टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय; वितरणावेळीच परप्रांतीयांकडून सिलिंडरमध्ये गडबड घोटाळा

राज्यातील घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे वितरण करणार्‍या स्थानिक गॅस एजन्सींना गॅस सिलिंडरांच्या वितरणासाठी भेडसावणार्‍या अपुर्‍या कर्मचारीवर्गाच्या समस्येचा गैरफायदा परराज्यातील काही एजंटांनी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील काही गॅस एजन्सींचे सिलिंडर वितरणाचे काम आपल्या हाती घेऊन ग्राहकांना कमी वजनाच्या सिलिंडरांचा पुरवठा करण्याचे काम या भामट्यांनी सुरू केले आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

वजन-माप खात्याला राज्यातील पर्वरी, बाणावली आदी भागांत कमी वजनाचे घरगुती सिलिंडर आढळून आल्यानंतर बुधवारी केळशी-वेर्णा येथेही कमी वजनाचे सिलिंडर भरलेले वाहन आढळून आल्याने ग्राहकांत खळबळ उडाली आहे. या कमी वजनाच्या गॅस सिलिंडरच्या प्रकारामुळे सर्वच गॅस एजन्सींच्या कारभाराकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. पोलीस यंत्रणेने गॅस सिलिंडरमधील एलपीजी गॅसची चोरी करणार्‍या भामट्यांचा छडा लावण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
राज्यातील नागरिकांना घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी विविध पेट्रोलियम कंपन्यांनी राज्यभरात एजन्सी नियुक्त केल्या आहेत. या एजन्सींना गॅस कंपनीकडून १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या आणि १९ किलोच्या व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरांचा पुरवठा केला जातो; मात्र सिलिंडरचे घरोघरी वितरण करण्याचे काम एजन्सीला करावे लागते. काही गॅस वितरण एजन्सींना गॅस सिलिंडरांच्या वितरणासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग मिळत नसल्याने परराज्यातील काही एजंटांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

असा काढला जातो
सिलिंडरमधील गॅस…

प एजन्सीच्या चालकांकडून गॅस सिलिंडरांच्या वितरणाची जबाबदारी परराज्यातील एजंटांकडे दिल्यानंतर त्या एजंटाकडून गॅस वितरणासाठी आवश्यक आठ ते दहा कर्मचारी उपलब्ध केले जातात. या एजंटांकडूनच गॅस सिलिंडर वितरण करतानाच काही सिलिंडरांमधील एलपीजी गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरांमध्ये भरला जातो व अधिक नफा कमावला जातो, असे आढळून आले आहे.
प एलपीजी गॅस काढून घेण्यात आलेल्या सिलिंडरला पुन्हा सीलबंद करून त्याचा ग्राहकांना पुरवठा केला जातो. १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरमधील काही किलो एलपीजी गॅस काढून घेतला, तर त्याचा सुगावा संबंधित ग्राहकांना सहसा लागत नाही, त्याचाच गैरफायदा घेतला जात आहे.

जन-माप खात्याकडून कारवाई होते; पोलिसांत तक्रार मात्र नाही
पर्वरी येथे छाप्यामध्ये एलपीजी काढून घेण्यासाठी वापरले जाणारे पाईप व इतर वस्तू आढळून आल्या होत्या. वेर्णा येथेही काही घरगुती व काही व्यावसायिक सिलिंडर आढळले होते. तसेच ते बंद करण्यासाठी वापरली जाणारी सील्स देखील आढळून आली होती. कारवाईनंतर वजन-माप खात्याकडून कमी वजनाचे गॅस सिलिंडर ताब्यात घेतले जातात. तथापि, या प्रकाराविरोधात पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविली जात नाही. त्यामुळे सिलिंडरमधील गॅस काढणार्‍या भामट्यांचे फावत आले आहे.

काय खबरदारी घ्यावी लागेल?
गेल्या काही दिवसांपासून वजन-मापच्या छापासत्रात कमी वजनाचे सिलिंडर आढळत असल्याने आता ग्राहकांनीच जागरुक होण्याची वेळ आली आहे. वितरणकर्त्यांकडून गॅस सिलिंडर खरेदी करतानाच त्याचे वजन करून नंतरच तो स्वीकारला पाहिजे. तसेच कमी वजन आढळून आल्यास वजन-माप खात्याकडे तक्रार नोंदवणे गरजेचे बनले आहे, तरच अशा गैरप्रकारांना आळा बसू शकेल.

जनकाटा सक्तीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
वजन-मापे खात्याने राज्यातील गॅस सिलिंडरमधील गॅस काढण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. गॅस सिलिंडरचे वितरण करणार्‍या वाहनांवर वजनकाटा सक्तीचा आहे; परंतु अनेक एजन्सी त्याची कार्यवाही करीत नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनीही अधिक जागरूकता दाखवून गॅस सिलिंडरच्या वजनाची आकस्मिक तपासणी करण्याची गरज ग्राहक व्यक्त करीत आहेत.