>> 7 जण मायदेशी परतले; भारत सरकारचे मानले आभार; आधी फाशीची शिक्षा, नंतर जन्मठेप अन् मग सुटका
भारतच्या ज्या 8 माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यांची सुटका करण्यात भारत सरकारला यश मिळाले आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे ते सुखरूप भारतात परतले आहेत. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आधी फाशीची नंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती; परंतु भारत सरकारने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत त्यांची शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या नौसैनिकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. काल सकाळी आठपैकी सात नौसैनिक भारतात परतले. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
सविस्तर माहितीनुसार, कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने 30 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या 8 माजी नौसैनिकांना अटक केली होती. या 8 भारतीयांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत ते कार्यरत होते. अल दहरा जागतिक संरक्षण सेवा प्रदान करते. ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमी हे त्याचे प्रमुख आहेत. 8 भारतीय नागरिकांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती; मात्र गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती.
भारतीय दूतावासाला सप्टेंबर 2022 च्या मध्यात भारतीय नौसैनिकांच्या अटकेची माहिती देण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी काही काळ फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2023 रोजी प्रथमच कॉन्सुलर ॲक्सेस मंजूर करण्यात आला. यावेळी भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
दरम्यानच्या काळात 26 ऑक्टोबर 2023 रोजी कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने या 8 माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर गेल्या वर्षी हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. कतारने जो मृत्यूदंडाचा निर्णय सुनावला होता त्याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 26 ऑक्टोबर 2023 रोजी एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली. भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू, असे त्यावेळी भारताने स्पष्ट केले होते. कॉन्सुलर ॲक्सेस मंजुरीनंतर 3 डिसेंबर 2023 रोजी कतारमध्ये उपस्थित असलेले भारताचे राजदूत निपुल यांनी आठ माजी नौसैनिकांची भेट घेतली. भारत सरकारच्या प्रयत्नानंतर 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. अखेर भारताच्या प्रयत्नांनंतर 8 माजी नौसैनिकांची जन्मठेपेची शिक्षा देखील माफ करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि 8 पैकी 7 जण काल भारतात परतले.
नौदलाचे ते आठ माजी सैनिक कोण?
कतारने ज्या माजी सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये नौदलाच्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी या नौसैनिकांची नावे आहेत.
भारताने मानले कतारचे आभार
अल दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांची सुटका कतारकडून करण्यात आली. कतारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्या आठ जणांपैकी सात जण भारतात परतले आहेत. कतारचे आमीर यांनी नौदलाच्या माजी सैनिकांच्या सुटकेचा निर्णय घेतला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.