शेतकऱ्यांची आज दिल्लीत धडक

0
4

पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे प्रयाण केले असून, शेतकऱ्यांनी दिल्लीत मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी मोर्चा आयोजित केला आहे. शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीच्या हमीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी 2021 मध्ये शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीच्या हमीच्या अटीवर दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मागे घेतले होते; मात्र केंद्र सरकारने अद्याप या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा मोर्चाचे अस्त्र उपसले आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने 200 शेतकरी संघटनांसह दिल्लीत हा मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. किमान आधारभूत किमतीच्या हमीचा कायदा आणि इतर मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

शेतकऱ्यांनी दिल्लीपर्यंत पोहोचू नये म्हणून हरियाणा राज्यातील पंजाब आणि दिल्लीला लागून असलेल्या सीमा सील केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मोर्चाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दिल्लीमध्ये पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. यामुळे दिल्लीत दोनपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमेवर बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक, बसेस, खासगी वाहने यांच्या प्रवेशाला देखील मनाई केलेली आहे. दिल्लीमधील टिकरी सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. याशिवाय मोठमोठे कंटेनर, सिमेंटचे बॅरिकेडस, वॉटर कॅनन सिंघू सीमेवर तैनात केलेल्या आहेत.