कडक बंदोबस्तात काश्मीरमध्ये ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू

0
12

कंग्रेसची भारत जोडो यात्रा काल दुपारी पुन्हा एकदा कडक बंदोबस्तात जम्मूतील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथून पुन्हा सुरू झाली. शनिवारच्या विश्रांतीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 7 वाजता ही यात्रा सुरू झाली. नरवाल येथे शनिवारी पंधरा मिनिटांत दोन स्फोट झाले होते. त्यानंतर तपास यंत्रणांनी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला.
या यात्रेत जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी, कार्याध्यक्ष रमण भल्ला आणि कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा हाती घेऊन राहुल गांधींनी सकाळी 8 वाजता लोंडी चेक पॉईंट पार केले. ही यात्रा सांबा जिल्ह्यातील तपयाल-गगवालमध्ये दाखल झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-पठाणकोट महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. पोलीस, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणा यात्रेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. यात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी राहुल गांधींचे स्वागत केले.
नरवालमध्ये दोन स्फोट
नरवाल भागात शनिवारी दोन स्फोट झाले, ज्यात 9 जण जखमी झाले. स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. काँग्रेसचा दौरा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा या परिसरात हाय अलर्टवर असताना हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या स्फोटांनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 15 मिनिटांच्या अंतराने हे दोन स्फोट झाले. या स्फोटांत छर्रे लागल्याने जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

25 किमी चालणार
ही यात्रा 25 किलोमीटरचे अंतर कापून चक नानक येथे पोहोचेल. त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असणार आहे. सोमवारी सांबा येथील विजयपूर येथून यात्रा पुन्हा जम्मूकडे रवाना होणार आहे. राहुल गांधी यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रा गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली होती.