Home आयुष कंबरदुखी : एक व्याधी

कंबरदुखी : एक व्याधी

0
कंबरदुखी : एक व्याधी

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
सामान्यपणे तीस-चाळीस वयोगटातील बायका नेहमीच सर्रास डॉक्टरांकडे जातात. त्यांची कंबर दुखते. माझ्याकडेही अशा काही येतात व त्या आपल्या कंबरदुखीचे कारण स्वतःच सांगतात… ‘डॉक्टरसाहेब, माझे ना नसबंदीचे ऑपरेशन झाले आहे. तेव्हा वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिसर्‍या मुलानंतर मी ऑपरेशन करून घेतले. तेव्हापासून माझी कंबर दुखते. तेव्हा ते ऑपरेशन करतेवेळी त्यांनी मला कंबरेला इन्जेक्शन दिले होते. तिथेच कंबर दुखते माझी.’
तुम्हाला समजतंय ना ती काय सांगतात ते? कंबरेखालची सगळी ऑपरेशन्स करते वेळी पूर्ण गुंगी न देता कंबरेला (स्पायनल) गुंगी देतात. कंबरेखालचा भाग वेदनारहित केला जातो व ऍपेंडिक्स, हर्निया, नसबंदी वगैरे सारी ऑपरेशन्स केली जातात. त्यामुळे कुणाच्याही कंबरदुखीचे हे कारण होऊ शकत नाही. वयोमानानुसार आपण आपल्या कंबरेची काळजी घेत नाही.कंबरदुखीचे मूळ कारण स्नायू, नर्व्हज्, हाडे, सांधे किंवा मणक्याजवळील कुठलाही भाग असू शकतो. कधी कधी दुखीचे मूळ कारण स्वादुपिंड (गॉल ब्लॅडर)ही असू शकते.
प्र कंबरदुखी ही तीव्र वेदनेची (ऍक्यूट) किंवा पुष्कळ महिन्यांची (क्रॉनिक) ही असते.
प्र ती सतत चालू असते किंवा मध्ये मध्ये चालू असते. कधी ती एकाच भागावर केंद्रित असते.
प्र तर कधी ते दुखणे एका भागाकडून दुसर्‍या भागाकडे जाते.
प्र दुखणे साधे, भयंकर किंवा जळणारेही असते.
प्र दुखण्याबरोबर पायांना मुंग्या पण येतात.
प्र अमेरिकेला डॉक्टरी उपचार करण्यासाठी जाणार्‍यांमध्ये पाच नंबरचे कारण ‘‘कंबरदुखी’ हे आहे.
प्र दहा माणसांपैकी किमान नऊ माणसांना केव्हा ना केव्हा कंबरदुखी झालेली असते.
प्र दहापैकी पाच काम करणार्‍या माणसांची कंबर दरवर्षी दुखते.
प्र कामावर न जाणार्‍या लोकांपैकी ४०% लोक कंबरदुखीमुळे गैरहजर राहतात.
प्र तात्पुरते अपंगत्व आणणारे कंबरदुखी हे पहिले कारण जगभर दिसून येते.
कंबरदुखी म्हणजे कंबरेच्या (लंबर रिजन) मणक्यांची झीज झाल्यामुळे होते. तसेच सर्व्हायकल म्हणजे मानेचे (मानदुखी), थोरॅसिक म्हणजे छातीचे (पाठदुखी) आणि सॅक्रल म्हणजे माकडहाड!
कंबरदुखी किती दिवसांची असते?
१) ऍक्यूट – म्हणजेच तीव्र वेदना असणारी.
२) सबऍक्यूट – ६ ते १२ आठवडे.
३) क्रॉनिक – १२ आठवडे जुने.
वेदनेची तीव्रता – स्थानिक वेदना म्हणजे फक्त स्नायू, लिगामेंट किंवा त्याच्या सभोवती असते.
प्र रेडिक्युलर – एका भागातून दुसर्‍या भागाकडे जाणारी वेदना.
प्र मज्जातंतूमध्येही असते.
प्र वेगळ्या आजारामुळेही कंबरदुखी होऊ शकते. जसे कँसर किंवा संसर्ग (इन्फेक्शन).
९८% कंबरदुखीची कारणे साधी असतात. आणि २% कंबरदुखीची कारणे ही कँसरची लागण झाल्याने असतात. कँसरची वाढ हाडातही झालेली दिसते.
मणक्यांच्या विविध रोगांमध्ये कंबरेच्या मणक्यांमध्ये जास्त दिसून येतात.
कंबरदुखीची गंभीर कारणे ः-
१) आतड्यांचे किंवा मूत्राशयांचे रोग
२) अपघातात अस्थिभंग झाल्यामुळे किंवा पडल्यामुळे होऊ शकते.
३) केव्हा केव्हा स्तनाच्या, फुप्फुसाच्या व प्रोस्टेट ग्रंथीच्या कँसरमुळेही कंबरदुखी राहू शकते.
कंबरदुखीची इतर कारणे ः-
लंबर डिस्क हर्निएशन – कंबरेच्या मणक्यामधील तबकडी बाहेर आल्यामुळे वेदना होते.
डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज – मणक्यांमधील तबकडीची झीज झाल्यामुळे मज्जातंतूंवर दाब पडल्यामुळे वेदना होते.
कधी कधी कंबरदुखीची कारणे अगदी साधी असतात- जसे लचक भरणे. कधी कधी रोजच्या कामांमध्येही लचक भरते. साठी उलटल्यावर तीच पाण्याने भरलेली बादली उचलली तर मणका जागेवरून घसरू शकतो. तेव्हा सांभाळा हं!
कंबरदुखीचे निदान ः-
१. पाण्याने भरलेली बादली उचलल्याने कंबरेत लचक भरते. यावर प्रत्येक जण घरीच उपचार करतो….
जसे गरम पाण्याने शेकणे, वेदनाशामक मलम लावणे, एक दिवस घरी आराम करणे.
२. कंबरदुखीमुळे चालता येत नसेल तर – डॉक्टरचा सल्ला घेण्याशिवाय तरणोपाय नसतो. इन्जेक्शन, औषधे घेतल्यावर आराम वाटतो.
३. दर पंधरवड्यात किंवा महिन्यात कंबरदुखी ः-
प्रथम एक्स-रे काढला जातो. गरज भासल्यास स्कॅनिंग, एम्‌आर्‌आय् ही आलेच.
कंबरेमध्ये एकावर एक असे मणके असतात. त्यावर स्नायू, त्यातून निघणारे मज्जातंतू. यांच्यापैकी कुठल्याही भागास इजा झाली तर कंबर दुखते.
आजकाल प्रत्येक माणसाची कंबर ही दुखतेच. कारण सुट्टीच्या दिवशी तो घरातील छोटी-मोठी कामे करतो, साफसफाई, झाडावर चढणे, लाकडे तोडणे, घराची शाकारणी इत्यादी कामे करतो. या सगळ्या गोष्टींची सवय प्रत्येकाला असेतच असे नाही. त्यामुळे अशी कामे केल्यानंतर त्याची कंबर दुखू लागते व वारंवार अशी कामे झाली की जास्तच दुखते.
त्याचबरोबर आज प्रत्येक जण स्कूटर, मोटरसायकल चालवतो. रस्त्यांवर हजारो खड्डे, गतिरोधक यांमुळे कंबरेला सतत झटके बसत असतात. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम बाराही महिने चालू असते. पण आत्ताचे डांबर थोडे पातळ झाले आहे त्याला सरकार तरी काय करणार? डागडुजीला वापरले जाणारे सामान पूर्वीसारखे मिळत नाही. त्यातच बोकाळलेला भ्रष्टाचार! तेव्हा खड्‌ड्यात पडणे किंवा त्यामुळे बसणार्‍या झटक्याचा आघात सहन करावाच लागतो. कधी कधी गतिरोधक इतके मोठे असतात की तुमची गाडी उडालीच म्हणून समजा. तेव्हा गतिरोधक आला तर गती शून्य करा, नाहीतर तुमची कंबर गमावून बसाल. कित्येकदा दुचाक्यांचे शॉक ऍबझॉर्बर्स निकामी झालेले असतात. ते आम्ही बदलवत नाही. मात्र दुचाकी आम्ही बडवत जातो मग ती आम्हाला बडवते. तेव्हा साध्या साध्या गोष्टीही शरीराला मारक ठरतात. मग एकदा का कंबरेच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली की मग वाया गेलातच. महिनोंमहिने कॉटवर पडून राहायला लागेल.. पायांना वजन बांधून.. पडून रहावे लागते. ही वेळ येऊ देऊ नका.
वयोमानाप्रमाणे शरीर हे झिजतेच. शरीराची काळजी, जोपासना करणे गरजेचे आहे. आम्ही दुचाकी, चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग करत नाही मग आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग कोण करणार?
आता प्रत्येक गावात, शहरात व्यायाम शाळा आहेत. अगदी अत्याधुनिक, सर्व सुविधा उपलब्ध, ट्रेनर्स (प्रशिक्षक)ही मिळतात. मसाज करणारेही आहेत. पाण्याने आम्ही आंघोळ करतोच. सोना बाथ, स्टीम बाथ घ्या. वयाबरोबर शरीराचे सांधे घट्ट होतात. त्यासाठी प्रत्येक सांध्याची हालचाल करा. नाहीतर इतके घट्ट होतील की त्यात हालचालच होणार नाही.
शेवटी या सर्व उपायांनी कंबरदुखी बंद होत नसेल तर शस्त्रक्रिया करावीच लागेल. पण असे फक्त २% लोकांमध्येच घडते. आम्ही त्या दोन टक्के लोकांमधील नाही. आपण कंबरेचे मणके सांभाळा. त्यांची योग्य ती काळजी घ्या. सरळ चाला, सरळ बसा, योग्य स्थितीत बसूनच टीव्ही पहा. नाहीतर वेडेवाकडे बसाल किंवा झोपूनच टीव्ही पहाल तर कंबर लचकेल, मानही लचकेल. खुर्चीवर, सोफ्यावर कसे बसायचे ते ठरवा. मग ती कंबरदुखी तुमच्या जवळ पोहोचणारही नाही याची हमी मी देतो!