Home बातम्या औपचारिक शिक्षण आणि कर्तृत्व

औपचारिक शिक्षण आणि कर्तृत्व

0

– सतीश दत्ताराम दळवी, शांतीनगर, फोंडा

माणसाने एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली व त्यात त्याला आवड निर्माण झाली की, तो नकळत त्या गोष्टीकडे ओढला जातो व त्यातच त्याला आनंद मिळतो. हळूहळू त्याचे त्याला ‘वेड’ वा ‘व्यसन’ लागते. ते नंतर काही केल्या सुटत नाही. त्या व्यसनापायी आपणाला फायदा होतो की नुकसान, आपण दुसर्‍यांना त्रास देतो का- कशाचेच त्याला मग भान राहत नाही.

आमच्या परिचयाचा एक माणूस आहे. त्याला लहानपणापासूनच कोर्टकचेरी करावी लागायची. करता करता तो इतका निर्ढावला की, साध्या साध्या गोष्टीवरून मामलतदार कोर्टापासून सिव्हिल कोर्ट व सिव्हिल कोर्टापासून सुप्रिम कोर्ट हा त्याच्या डाव्या हातचा मळ झाला. कोर्टकचेरी हे एक त्याचे ‘व्यसन’ होऊन बसले. इतके की, एखादेवेळेस तो माणूस कोर्टात दिसला नाही तर जज्ज विचारायचे,‘अमूक अमूक माणूस आज कोर्टात दिसत नाही. तो आजारी आहे काय? की आज त्याची ‘केस’ नाही? लोक त्याला ‘देमानिस्त’ म्हणून ओळखतात.

असेच व्यसन काही माणसांना ‘माहिती हक्क कायद्या’चे लागलेले आहे. हा कायदा वापरून आपण कोणाची कसली माहिती मिळवतो? कशासाठी? त्यातून आपल्याला कसला फायदा आहे काय? समाजाचे हित त्यातून साधते काय? त्या माहितीद्वारे कुणालाही काडीचाही फायदा नाही, पण उलट नुकसान तर होणार नाही ना? कशाचीच पर्वा त्याला असत नाही. ‘व्यसना’मुळे माणसाची सद्सद्विवेकबुद्धी, सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट झालेली असते. तो ‘माणूस’ राहत नाही. तो ‘भस्मासूर’ बनलेला असतो. असे ‘आर.टी.आय.’ भस्मासूर गोव्यात निर्माण होऊ पाहात आहेत. यांना वेळीच मर्यादेत ठेवले नाही वा बंधन घातले नाही तर गोव्यात कहर माजेल. कायद्याने आपण त्यांना थोपवू शकत नाही, पण प्रसार माध्यमे असल्या गोष्टींना जरूर लगाम घालू शकतात. आर. टी. आय. चा उपयोग वाईट कारणासाठी वा समाजाच्या हिताविरुद्ध होणार असे वाटत असेल तर त्याला अवास्तव प्रसिद्धी न देण्याचा संकल्प आपण करू शकता.

माणसाच्या कर्तबगारीचा त्याच्या औपचारिक शिक्षणाशी काडीचाही संबंध नसतो. आजचे शिक्षण घेऊन त्याच्या बळावर समाजमानसात अत्युच्च स्थान मिळवणारे फक्त एक टक्काच असतील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांसारखे. बाकीचे कुठेतरी खर्डेघाशी करीत असतील, अन्यथा कामगार, वा फारच तर इंजिनियर वा डॉक्टर वगैरे म्हणून रात्रंदिवस राबत असतील. याउलट स्वकर्तबगारीने वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकणारे तारे हे बहुतेक औपचारिक (शालेय) शिक्षण अर्ध्यावर टाकलेले वा त्यांच्या वाट्याला न गेलेलेच आपल्याला दिसतील. म्हणून कोणी त्यांना त्यांच्या शालेय शिक्षणाकडे बोट दाखवून हिणवायला लागले तर त्याचा अर्थ अशी माणसे अजून पूर्वीच्याच जमान्यात राहात आहेत.

भारतातले औपचारिक शिक्षण हे अजून ब्रिटिशांनी त्या काळी त्यांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिक्षणाच्या धर्तीवर चालू आहे. मागच्या ६०-६५ वर्षांत फक्त तकलादू सुधारणा आपण करीत आहोत. जास्त भर हा उच्च शिक्षणावरच देत आहोत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबतीत वातानुकूलित खोलीत बसून ‘पास-फेल’ यांचे निकष कसे असावेत, यावर चर्चा झोडत आहोत. अशा वातानुकूलीत खोलीत तयार झालेला अभ्यासक्रम संपूर्ण भारतात उत्तर सीमेकडून कन्याकुमारीपर्यंत व पूर्व सीमेकडून अरबी समुद्रापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकायचा व तो शिकून त्यांनी ठरविलेल्या सगळ्या विषयांत पास (त्यांनी ठरविलेल्या टक्केवारीप्रमाणे) झालेच पाहिजे हा दंडक! एकीकडे आपण म्हणतो, जुळी मुले सुद्धा वेगळी निपजतात. पण हा नियम आपल्या शिक्षणक्षेत्रास लागू पडत नाही. स्वभावैशिष्ट्यामुळे एखाद्या विषयात एखाद्या मुलाला रस नसेल तर त्याच्या आवडीचा विषय घेऊन पुढे जाण्यास त्याला तशी संधी उपलब्ध नाही, त्यामुळे तो धडपडत असतो, रखडत असतो. शेवटी कंटाळून सोडून देतो किंवा समाजात तोंड दाखवू शकत नसल्यामुळे वेगळा मार्ग निवडतो. तेव्हा ‘नापास’ झाला म्हणजे सगळे काही संपत नाही. इतके म्हणून आपण गप्प बसतो. त्याला योग्य मार्ग दाखवून देण्यासाठी आपण काही करत नाही.

विद्यार्थ्याला समोर ठेवून त्याला प्राधान्य देऊन ‘मूल शिकते कसे’ हे शास्त्रशुद्ध पद्धतीने लक्षात घेऊन त्यावर आधारित समग्र शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी प्रयत्न करून सर्वांना सामावून घेण्यासाठी योग्य शिक्षणक्रम व शिक्षणपद्धतीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून एखाद्या ‘फेल्युअरने’ स्वतः प्रयत्न करून आपली बुद्धी व शक्ती वाढवली व समाजात दिमाखाने पुढे आला तर आपण त्याचा पूर्वेतिहास उकरून काढून त्याची खिल्ली उडवतो. हे फक्त भारतातच घडू शकते.

श्रीनिवास रामानुजनांसारखा गणिततज्ज्ञ याच शिक्षण पद्धतीमुळे सतत चार वर्षे ‘फेल’ झाला. शेवटी कंटाळून शिक्षण सोडून कुठेतरी कारकून म्हणून नोकरीला लागला. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याची केंब्रिज विद्यालयाचे प्राध्यापक प्रो. हार्डी यांच्याशी ओळख झाली. प्रो. हार्डींनी रामानुजनला त्याची गणितामधील चमक ओळखून आपल्याकडे लंडनला नेले. तिथे भारतातल्या या ब्रिटीशांनीच घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीतल्या ‘फेल्युअरला’ गणितातल्या संशोधनासाठी केंब्रिज विद्यालयाने ‘बी.ए.’ पदवी बहाल केली व तिथल्या प्रतिष्ठीत ‘रॉयल सोसायटी’ संस्थेने फॅलोशिप देऊन त्याचा सत्कार केला, तेव्हा कुठे आम्हाला ‘हिरा’ गवसला व श्रीनिवास रामानुजन हा ‘महान भारतीय गणितज्ज्ञ’ आहे असे जगाला अभिमानाने आम्ही सांगू लागलो.

जगाचा इतिहास असे अर्ध्यावर शिक्षण सोडलेले किंवा शाळेच्या पहिल्या पायरीवरून माघारी फिरलेले, पण स्वतःच्या हिंमतीवर व स्व – कर्तबगारीवर जगत्‌मान्य वैज्ञानिक-संशोधक-उद्योजक-क्रीडापटू झालेले आपण पाहतो. अशा शास्त्रज्ञांच्या अपूर्व संशोधनाच्या बळावर आज जग नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करीत आहे. नावच घ्यायचे झाले, तर हम्फ्री डेव्ही, मायकल फॅरेडे, थॉमस अल्वा एडिसन, बॉबी फिशर, सलीम अली….. असे अनेक आहेत. पण जगात कोणी त्यांच्या पूर्वेतिहासाकडे बोट दाखवून ‘तुम्ही संशोधन करायला अपात्र आहात’ म्हणून हिणवले नाही. तेव्हा ‘व्यसनाधीन’ माणसाला आपण व्यसनमुक्त जरी करू शकत नसलो तरी त्याला किती महत्त्व द्यायचे ते आपणच ठरवायचे आहे.