ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

0
188

>> पंतने सोडलेले झेल कांगारूंच्या पथ्यावर

ऋषभ पंत याने यष्टिमागे सोडलेल्या दोन झेलांमुळे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २ बाद १६६ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. पावसामुळे दिवसभरात केवळ ५५ षटकांचा खेळ होऊ शकला.

नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. संघात पुनरागमन केलेला डेव्हिड वॉर्नर मोहम्मद सिराजचा एका बाहेर जाणार्‍या चेंडूसोबत छेडछाड करण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये पुजाराकरवी झेलबाद झाला. त्याने केवळ पाच धावा केल्या. ट्रेव्हिस हेड याच्या जागी संघात स्थान मिळालेल्या विल पुकोवस्की व मार्नस लाबुशेन या दोघांनी डाव सावरताना दुसर्‍या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. यामध्ये विल पुकोवस्कीने ६२ धावांची खेळी केली. यात ऋषभ पंतचा मोलाचा वाटा होता. पंतने पुकोवस्कीचा पहिला झेल सोडला तेव्हा तो ६९ चेंडूंत २६ धावांवर खेळत होता. अश्विनचा हा चेंडू विल पुकोवस्कीच्या बॅटची कडा घेवून मागे गेला होता.

पंतच्या ग्लोव्जला लागल्यानंतर हा झेल सुटला. त्यानंतर अश्विन नाराज दिसून आला. पंतने हा झेल पकडला असता तर अश्‍विनला लय गवसली असती. यानंतर चाचपडणार्‍या स्मिथवर कुरघोडी करण्याची नामी संधी भारताला मिळाली असती. परंतु, पंतने झेल सोडत यावर पाणी फेरले. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पंतने पुन्हा एकदा दुसरा झेल सोडला. पंतने मागे झेपावत झेल घेतल्याचा दावा केला. परंतु, रिप्लेमध्ये चेंडू जमिनीवरून उचलण्यात आल्याचे स्पष्ट दिसले. यावेळी विल पुकोवस्की ८० चेंडूचा सामना करून ३२ धावांवर खेळत होता. भारताकडून कसोटी पदार्पण केलेल्या नवदीप सैनीने पुकोवस्कीला वैयक्तिक ६२ धावांवर पायचीत करत आपला पहिला कसोटी बळी मिळविला.
दिवसअखेर स्टीव स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे अनुक्रमे ३१ आणि ६७ धावांवर नाबाद होते.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः विल पुकोवस्की पायचीत गो. सैनी ६२, डेव्हिड वॉर्नर झे. पुजारा गो. सिराज ५, मार्नस लाबुशेन नाबाद ६७, स्टीव स्मिथ नाबाद ३१, अवांतर १, एकूण ५५ षटकांत २ बाद १६६
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह १४-३-३०-०, मोहम्मद सिराज १४-३-४६-१, रविचंद्रन अश्‍विन १७-१-५६-०, नवदीप सैनी ७-०-३२-१, रवींद्र जडेजा ३-२-२-०