ऑस्ट्रेलिया-इंग्लंड उपांत्य सामना आज

0
113

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात आज विश्‍वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळविला जाणार आहे. भारताला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या न्यूझीलंडशी या सामन्यातील विजेता संघ रविवारी होणार्‍या फायनलमध्ये खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत द्वितीय स्थानासह तर इंग्लंडने तिसर्‍या स्थानासह ‘अंतिम चार’मध्ये प्रवेश केला होता. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या सामन्यात खेळणार नसून त्याची जागा पीटर हँड्‌सकोंब घेणार असल्याचे संघाचे प्रशिक्षक जस्टीन लेंगर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलिया संघात अजून बदल संभवत नाही. इंग्लंड देखील आपल्या शेवटच्या साखळी लढतीत खेळविलेला संघच उपांत्य सामन्यात खेळविणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मोईन अलीला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागू शकते. दोन्ही संघ आपल्या सलामी जोडीवर अधिक अवलंबून आहे.

कांगारूंना ऍरोन फिंच-डेव्हिड वॉर्नर जोडीने तर इंग्लंडला जेसन रॉय-जॉनी बॅअरस्टोव यांनी अनेक लढतींत चांगली सुरुवात करून दिली आहे. कांगारूंकडे स्टोईनिसच्या रुपात तर इंग्लंडकडे स्टोक्सच्या रुपात चांगला अष्टपैलू उपलब्ध आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ चार स्पेशलिस्ट गोलंदाज घेऊन खेळणार असल्याने स्टोईनिस व मॅक्सवेल यांना मिळून पाचव्या गोलंदाजाचा कोटा पूर्ण करावा लागू शकतो. दुसरीकडे इंग्लंडकडे गोलंदाजीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इंग्लंडची बाजू किंचित वरचढ वाटते. नाणेफेकीचा कौलदेखील निर्णायक ठरणार असून प्रथम फलंदाजी करणारा संघ सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे.