ऑस्ट्रेलियात अनेकांना ओलीस धरणार्‍या हल्लेखोराचा खात्मा

0
94
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात सशस्त्र हल्लेखोराने एका कॅफेमध्ये ग्राहकांना ओलीस धरले. शेवटी कमांडो कारवाईत त्याचा खात्मा करण्यात आला.

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका लोकप्रिय कॅफेत घुसलेल्या एका सशस्त्र हल्लेखोराने भारताच्या इन्फोसिसच्या एका कर्मचार्‍यासह अनेकांना ओलीस धरले. यावेळी पाचजणांनी त्याचा डोळा चुकवून पलायन करण्यात यश मिळवले, मात्र हल्लेखोराने ओलीस धरलेल्या इतरांची उशिरा एका आक्रमक कमांडो कारवाईत मुक्तता करण्यात आली.या हल्लेखोराने सदर कॅफेत प्रवेश करताच शस्त्राच्या धाकावर सर्वांना हात उंचावून उभे राहण्यास भाग पाडले. काही ग्राहकांना खिडकीतून अरबी लिपीतील एक फलक फडकावण्यास सांगण्यात आले. त्यावर ‘‘अल्ला हाच सर्वांचा ईश्वर आहे. महंमद हा त्याचा प्रेषित आहे’’ असे लिहिलेले होते. त्यामुळे जिहादी दहशतवाद्याचा हा हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पायोनियर नामक दहशतवादविरोधी पथकाद्वारे सदर परिसर घेरण्यात आला. हल्लेखोराशी वाटाघाटींचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला हल्लेखोराने दाद न दिल्याने कमांडो कारवाई करण्यात आली.
या हल्ल्यामुळे सिडनी ऑपेरा हाऊसमधील कार्यक्रम रद्द करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासही बंद करण्यात आला. भारतीय दूतावास सदर कॅफेपासून फक्त ४०० मीटरवर आहे. जवळच भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि भारतीय पर्यटन विभागाचीही कार्यालये आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबोट यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा केली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.