ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी विजय

0
113

>> डेव्हिड वॉर्नर, मुश्फिकुर रहीमची शतके

>> कडव्या संघर्षानंतर बांगलादेशची हार

बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियाने काल गुरुवारी विश्‍वचषक क्रिकेच स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा ४८ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३८२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने ८ बाद ३३३ पर्यंत मजल मारली.

डेव्हिड वॉर्नरच्या १६६ धावांच्या जोरावर कांगारूंनी धावपर्वत रचल्यानंतर माजी कर्णधार मुश्फिकुर रहीम याचे सातवे एकदिवसीय शतक तसेच तमिम इक्बाल व महमुदुल्ला यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने कांगारूंना झुंजवताना लढावू वृत्ती दाखवून दिली. रहीमने ९७ चेंडूंत नाबाद १०२ धावांची खेळी केली. यात ९ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. या पराभवामुळे बांगलादेशची उपांत्य फेरीची वाट बिकट बनली आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार ऍरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. मश्रफी मोर्तझाने टाकलेल्या डावातील पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सब्बीर रहमान याने ‘बॅकवर्ड पॉईंट’ला डेव्हिड वॉर्नरचा वैयक्तिक १० धावांवर झेल सोडला. या संधीचा पुरेपूर लाभ उठवत वॉर्नरने यानंतर बांगलादेशला काडीमात्र संधी दिली नाही. वॉर्नर-फिंच दुकलीने
पहिल्या गड्यासाठी १२१ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज सौम्य सरकारने फिंचला बाद करत ही जोडी फोडली. फिंचने यंदाच्या विश्‍वचषकातील आपले तिसरे व वनडे कारकिर्दीतील एकूण २४वे अर्धशतक ठोकताना ५३ धावांची खेळी केली. यानंतर मैदानात उतरलेल्या उस्मान ख्वाजाने वॉर्नरच्या साथीने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरताना दुसर्‍या यष्टीसाठी १९२ धावांची विशाल भागीदारी रचली. यादरम्यान वॉर्नरने आपले सोळावे वनडे शतकही साजरे केले. शतकानंतर काही वेळ सावध खेळ केल्यानंतर वॉर्नरने अक्क्रमक पवित्रा अवलंबताना आपली स्ट्राईकरेट वाढवली. वॉर्नरने १४७ चेंडूत १६६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. विश्‍वचषकात १५० पेक्षा जास्त धावा दोनवेळा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. २०१५च्या विश्‍वचषकात वॉर्नरने अफगाणिस्तानविरुद्ध १७८ धावांची खेळी केली होती. अखेरच्या षटकांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याकडे भर दिला. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्याने केवळ १० चेंडूंचा सामना करताना ३२ धावा फटकावल्या. ४९व्या षटकादरम्यान सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. काहीवेळाने पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. परंतु, यामुळे २४ मिनिटे वाया गेली. स्टोईनिसने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार ठोकत संघाला ३८१ धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या अखेरच्या १५ षटकांत १७३ धावांची लयलूट केली. बांगलादेशकडून सौम्य सरकारने ३, मुस्तफिझुर रहमानने १ बळी घेतला. कांगारुंचा एक फलंदाज धावबाद झाला.कांगारूंनी या सामन्यासाठी तीन बदल करताना केन रिचर्डसन, शॉन मार्श व जेसन बेहरनडॉर्फ यांना बाहेर बसवून नॅथन कुल्टर नाईल, मार्कुस स्टोईनिस व ऍडम झंपा यांना संघात सामावून घेतले. दुसरीकडे बांगलादेशचा यंदाच्या विश्‍वचषकातील सर्वांत यशस्वी गोलंदाज मोहम्मद सैफुद्दिन व अष्टपैलू मोसद्देक हुसेन यांना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झे. रुबेल गो. सरकार १६६ (१४७ चंेंडू, १४ चौकार, ५ षटकार), ऍरोन फिंच झे. रुबेल गो. सरकार ५३, उस्मान ख्वाजा झे. रहीम गो. सरकार ८९ (७२ चेंडू, १० चौकार), ग्लेन मॅक्सवेल धावबाद ३२, मार्कुस स्टोईनिस नाबाद १७, स्टीव स्मिथ पायचीत गो. मुस्तफिझुर १, आलेक्स केरी नाबाद ११, अवांतर १२, एकूण ५० षटकांत ५ बाद ३८१
गोलंदाजी ः मश्रफी मोर्तझा ८-०-५६-०, मुस्तफिझुर रहमान ९-०-६९-१, शाकिब अल हसन ६-०-५०-०, रुबेल हुसेन ९-०-८३-०, मेहदी हसन मिराझ १०-०-५९-०, सौम्य सरकार ८-०-५८-३

बांगलादेश ः तमिम इक्बाल त्रि. गो. स्टार्क ६२, सौम्य सरकार धावबाद १०, शाकिब अल हसन झे. वॉर्नर गो. स्टोईनिस ४१, मुश्फिकुर रहीम नाबाद १०२, लिटन दास पायचीत गो. झंपा २०, महमुदुल्ला झे. कमिन्स गो. कुल्टर नाईल ६९, सब्बीर रहमान त्रि. गो. कुल्टर नाईल ०, मेहदी हसन मिराझ झे. वॉर्नर गो. स्टार्क ६, मश्रफी मोर्तझा झे. मॅक्सवेल गो. स्टोईनिस ६, अवांतर १७, एकूण ५० षटकांत ८ बाद ३३३
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क १०-०-५५-२, पॅट कमिन्स १०-१-६५-०, ग्लेन मॅक्सवेल ३-०-२५-०, नॅथन कुल्टर नाईल १०-०-५८-२, मार्कुस स्टोईनिस ८-०-५४-२, ऍडम झंपा ९-०-६८-१

डेव्हिड वॉर्नर सहाव्यांदा दीडशेपार
डेव्हिड वॉर्नरने काल वनडे क्रिकेटमधील आपले सहावे दीडशतक ठोकले. केवळ भारताचा रोहित शर्मा (७) या बाबतीत वॉर्नरपेक्षा पुढे आहे. सोळावे वनडे शतक लगावलेल्या वॉर्नरला यासाठी ११० डाव खेळावे लागले. भारताचा विराट कोहली यालासुद्धा यासाठी एवढेच डाव लागले होते. केवळ दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला (९४ डाव) याने या द्वयीपेक्षा कमी डावात सोळा शतके पूर्ण केली होती.