ऑनलाईन जिहाद रोखण्यासाठी

0
129

इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी जाणार्‍या आणखी एका तरुणाला आपल्या गुप्तचर संस्थांनी हैदराबाद विमानतळावर अलीकडेच रोखले. त्यामुळे इंटरनेटवर किंवा ऑनलाईन जिहादचा प्रसार कसा केला जातो, त्याला तरुण कसे बळी पडत आहेत हे शोधणे महत्त्वाचे आहे. ताज्या अंदाजानुसार, भारतातून हजारो युवक आपल्या घरातून बेपत्ता झालेले आहेत. जिहादी प्रचाराला बळी पडून त्यातील एक-दोन टक्के युवक जरी वाईट कामासाठी गेले असतील तरीही हा धोका खूपच जास्त आहे. ऑनलाईन जिहादविषयी एवढे आकर्षण का?
मध्यंतरी, भारतीय सैन्याने केलेल्या अभ्यासातून तरुण दहशतवादी का बनत आहेत, याची काही कारणे शोधून काढली होती. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि कट्टरतावाद पसरवणार्‍या अनेक संस्था दहशतवादी संघटनांना मनुष्य भरतीसाठी मदत करत असतात. यासाठी अनेक युवकांचा बुद्धीभ्रंश करून त्यांची माथी भडकावली जातात. त्यानंतर त्यांना प्रेरणात्मक प्रशिक्षण देऊन इराण, अङ्गगाणिस्तान, सिरिया किंवा पाकिस्तानमध्ये मोठ्या दहशतवादी संघटनांमध्ये पाठवले जाते. तिथे त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीला प्रशासकीय कामे दिली जातात. त्यातून हा युवक चांगला दहशतवादी बनू शकतो असे लक्षात आले, तरच त्याची बॉम्बस्ङ्गोट, आत्मघातकी हल्ला यासाठी निवड केली जाते.
दहशतवादी होण्यामागची कारणे
साधारणपणे, ४० ते ४५ टक्के युवकांना बळजबरीने दहशतवादी संघटनेत पाठवले जाते; तर ४० ते ४५ टक्के युवक आर्थिक कारणामुळे दहशतवादाचा मार्ग अवलंबतात. कारण या दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर त्यांना प्रचंड प्रमाणात अर्थपुरवठा केला जातो. त्यांना एखाद्या नोकरीपेक्षाही अधिक पगार दिला जातो. तसेच एखादे मोठे दहशतवादी काम केल्यास अतिरिक्त पैसा मिळतो. याशिवाय, १० ते १५ टक्के लोक धार्मिक कारणामुळे दहशतवादी बनण्याची शक्यता असते. तसेच बेरोजगारी हेदेखील यामागचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे अशा युवकांना रोजगार दिला गेला तर त्यांना दहशतवादाकडे वळण्यापासून आपण रोखू शकतो.
इंटरनेटवरील दुष्प्रचार रोखण्याची गरज
सध्या ऑनलाईन किंवा इंटरनेटद्वारे प्रचंड प्रमाणामध्ये विखारी आणि विघातक प्रचार सुरू आहे. यामध्ये विशिष्ट धर्मावर आणि त्या धर्मियांवर कसा अन्याय होत आहे, हे सांगितले जात आहे. अशा प्रचारामुळे तरुणांमधील असंतोष वाढून त्याचे रुपांतर दहशतवादी कृत्यांकडे वळण्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रचाराला इंटरनेटवरच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे.
अनेक वेबसाईटस्, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग साईटस्, ईमेल्स, एसएमएसच्या माध्यमातून हा घातक प्रचार सुरू आहे. ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनच्या मदतीने आणि इंटरनेटवर देखरेख ठेवणार्‍या यंत्रणेच्या साहाय्याने हा प्रचार थांबवणे आवश्यक बनले आहे. बहुतेकदा, दहशतवादी हे सामान्य लोकच असतात. बरेचदा त्यांच्या मनावर अशा अतिरेकी विचाराचा तात्पुरता प्रभाव झालेला असतो. अनेकांना आयुष्यामध्ये अपयश आलेले असते. विशी-तिशीतील अनेक युवक हे अविवाहित असतात. त्यांचा काही कारणावरुन कुटुंबाशी असलेला संबंध कमी होत जातो. अशा तरुणांपैकी अनेकांना बंदुकीच्या बळावर समाजामध्ये स्थान मिळवणे, महत्त्वाचे वाटू लागते. त्यामुळे अशा युवकांच्या विकासासाठी आर्थिक व मानसिक सुधारणेचे उपाय केले गेले, त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल करुन आणता आला तर दहशतवादाकडे जाणार्‍या युवकांवर घात करणार्‍या बाह्य घटकांचा प्रभाव नक्कीच कमी करता येतील. यासाठी गरज आहे ती आर्थिक आणि मानसिक लढाई जिंकण्याची. दहशतवादाचे स्वरुप हे सतत बदलत असते. यामुळे त्यावरील उपाययोजना सक्षम, तत्पर आणि परिस्थितीनुरुप असणे आवश्यक आहे. आपल्याला दहशतवादाचा प्रसार करणार्‍या यंत्रणांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे.
कट्टरतावादाचा प्रतिकार कसा करावा?
गतवर्षी डिसेंबरमध्ये राज्यांचे डीजीपी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऑनलाईन जिहादवर विचार करण्यात आला. त्यामध्ये अशा प्रकारचा विखारी प्रचार थांबवण्याकरिता एक कृतीआराखडा (ऍक्शन प्लॅन) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही हे गुप्तचर संस्थांनी करायचे, रॉ ने करायचे की एनटीआरओने करायचे यावरूनच खल सुरू आहे. या भांडणामध्ये बराच काळ दवडण्यात आला आहे. वास्तविक, हे काम या सर्वांचेच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कारण इंटरनेटची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे एकच एक संस्था त्यावर पुरेसे लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळेच या संस्थांबरोबरच इतर देशप्रेमी नागरिकांचीही याकामी मदत घेतली गेली पाहिजे. आज भारतामध्येच जवळजवळ २० कोटींहून जास्त नागरिक इंटरनेटचा वापर करत आहेत. ङ्गेसबुक आणि इतर सोशल मीडियाशी जोडलेल्या युवकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच एखाद्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने इंटरनेटवर चालणार्‍या चॅटिंगवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज युट्युबसारख्या ऑनलाईन दृकश्राव्य संकेतस्थळावर अनेक व्हिडीओज अपलोड केले जात आहेत. तसेच चुकीची आणि चिथावणीखोर, भडकावू माहिती देणारे लेख विविध संकेतस्थळांवर आणि ब्लॉग्जवर प्रसिद्ध होत आहेत. या सर्व गोष्टी तात्काळ ब्लॉक करून संबंधितांना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे.
‘ऑपरेशन चक्रव्यूह’
आज अनेक संस्था ऑनलाईन भरती झालेल्या युवकांना भारतातच अतिरेकी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही संस्था आणि धर्म शिक्षक अशा प्रकारचे प्रशिक्षण या युवकांना भारतामध्येच देत आहेत. भारतामध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी आज परदेशामधून खास करून सौदी अरेबियामधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पुरवला जात आहे. याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. भारतामधील काही धार्मिक स्थळेदेखील अशा प्रकारचा दहशतवाद वाढवण्यासाठी पैसे खर्च करत असतात. या पार्श्‍वभूमीवर प्रचंड उत्पन्न असलेल्या धार्मिक स्थळांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यांना मिळणारा पैसा गैरकृत्यांसाठी वापरला जाणार नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनेक श्रीमंत व्यापारी आणि व्यक्ती आपल्या उत्पन्नातील काही पैसा अशा प्रकारचा दहशतवाद वाढवण्यासाठी देऊ करत आहेत. कल्याणमधील चार युवकांना इराकमध्ये पाठवण्यामागे तेथील काही व्यापार्‍यांचा हात असल्याचे समोर आले आहे. अशा व्यक्तींवरही लक्ष ठेवून त्यांना पकडून, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियामध्ये ऑनलाईन चॅट करण्यासाठी असंख्य साधने उपलब्ध आहेत. या माध्यमातून भडकावण्यात येणार्‍या युवकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘ऑपरेशन चक्रव्यूह नावाची एक ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.
इतर देशांकडून मदत घेण्याची गरज
आज भारतातच नव्हे तर जगातील बहुसंख्य देशांमध्ये हा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. विशेष करून, सौदीअरेबिया आणि युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या युवकांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्या देशांमधील कार्यपद्धतीचा आणि त्यांच्या अनुभवाचा वापर करुन आपण तात्काळ प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या देशांकडून अनेक उपाय आत्मसात करणे आवश्यक आहे. संशयास्पद वागणार्‍या अशा सर्वांवर लक्ष ठेवणे कठिण असते. कुटुंबियांनी, नातेवाईकांनी या युवकांवर नजर ठेवण्याची आणि काही संशयास्पद आढळल्यास पोलिस यंत्रणेला तात्काळ माहिती पुरवण्याची गरज आहे. कारण सर्वांनी एकत्रितरित्या लढल्याखेरीज या लढ्यामध्ये यश येणार नाही.